Sri Sri Ravi Shankar : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात ‘हा’ अभिनेता

Zhapuk Zhupuk Review : मोठ्या पडद्यावर वाजतोय सुरजच्या ‘गुलीगत’ पॅटर्नचा डंका
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या भरघोस यशानंतर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन ‘हिरो’ या चौकटीच्या बाहेर असणा-या ‘रील स्टार’ला ‘टॉपचा किंग’ बनवण्यासाठीचं हे वेगळं धाडस करण्यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. (Zapuk Zhupuk Review)
‘प्रत्येकजण कलाकार होऊ शकत नाही. पण, एक कलाकार जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातुन येऊ शकतो. कदाचित ही त्याचीच सुरूवात आहे.’ या ओळी सुरूवातीलाच पडद्यावर आणण्यामागचं नेमकं कारण काय याचं उत्तर चित्रपट संपताना तुम्हाला नक्कीच मिळेल.
चित्रपटाची सुरूवात काहीशी वेगळ्या पद्धतीने होते. आपल्यासमोर अचानक येतो तो ‘सुरजवीर’! आपण नेमकं काय बघतोय या मजेशीर विचारात असतानाच सुरू होते, चित्रपटाची मुळ कथा! एका गावात सुरज व त्याची बहीण (पायल जाधव) राहात असतात. गावातील नामवंत शाळेत सुरज (Suraj Chavan) शिपाई म्हणून काम करत असतो. एक दिवस, गावातील पंजाबराव पाटील (मिलींद गवळी) यांची लेक नारायणी (जुई भागवत) मुंबईहून शिक्षण संपवून परत येते व त्याच शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होते जिथे सुरज शिपाई असतो. तो बघताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. या प्रेमात लव्हलेटर्स लिहीण्यासाठी त्याला त्याच्या चित्रकार मित्राची शेखरची (इंद्रनील कामत) मदत होते. याच दरम्यान, शेखरच्या आयुष्यातही त्याचं जुनं प्रेम पुन्हा येतं. दुसरीकडे, नारायणीला तिच्या प्रेमाची खरी जाणीव झाली असतानाच तिच्या सावत्रं आईच्या (दिपाली पानसरे) कारस्थानामुळे तिचं लग्न राजकुमार (हेमंत फरांदे) बरोबर लावण्याचा निर्णय घेतला जातो. या सगळ्यात त्या ‘पत्रांचं’ व या ‘पात्रांचं’ नेमकं कनेक्शन काय आणि ‘गुलीगत धोका’ नक्की कोणाला मिळतो याचं रंजक पद्धतीने उत्तर देणारा सिनेमा म्हणजे ‘झापुक झुपूक’!

नारायणीच्या भूमिकेत अभिनेत्री जुई भागवत तिच्या सुंदर अभिनयामुळे अगदी चपखल बसली आहे. तर, शेखरच्या भूमिकेला अभिनेता इंद्रनील कामतने त्याच्या सहज वावरामुळे योग्य तो न्याय दिला आहे. सुरजच्या बहिणीची भूमिका साकारताना अभिनेत्री पायल जाधव हिने घेतलेली मेहनत दिसून येते. अगदी एका सीनमध्ये भांडी घासताना हाताचा वापर कसा करावा, कसं बसावं या लहानात लहान पण महत्वाच्या गोष्टी तिने सुंदरपणे साकारल्या आहेत. पुष्कराज चिरपुटकरने साकारलेला प्राध्यापक शेवटपर्यंत मजा आणतो! बाकी, अभिनेते मिलींद गवळी, अभिनेत्री दिपाली पानसरे व अभिनेता हेमंत फरांदे यांनी आपापल्या भूमिका पार पाडल्या आहेत. आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो सुरजबरोबर असणा-या बच्चेकंपनीचा; त्यांनी या चित्रपटात अक्षरशः धमाल केली आहे. (Zapuk Zhupuk Review)
आता वळूया, सिनेमाच्या हिरोकडे, अर्थात सुरज चव्हाणकडे! चित्रपटात सुरज कुठेही अभिनय करतोय असं वाटणार नाही इतक्या सहजतेने तो वावरला आहे. त्याची बोलण्याची स्टाईल, अनोखे गमतीशीर हावभाव, गावरान पॅटर्न, काहीसे अस्पष्ट व बोबडे उच्चार, त्याच्यातील आत्मविश्वास आणि या सगळ्याला त्याच्या इनोसन्सचा टच या ख-या गोष्टी तश्याच ठेवल्या जाणं हीच या सिनेमाची जमेची बाजू आहे. आणि म्हणूनच की काय, तो सिनेमाच्या ‘चौकटीतला हिरो’ न वाटता आपल्यातलाच एक वाटतो. प्रत्येक सीनसाठी सूरजने घेतलेली व त्याच्याकडून करवून घेतलेली मेहनत दिसून येते. मग ते भावनिक सीन असो वा ॲक्शन सीन्स! त्याची एनर्जी व पडद्यावरील बिनधास्त, सहजसुंदर वावर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. आणि म्हणूनच की काय, कदाचित त्याचा हाच ‘गुलीगत’ पॅटर्न त्याला उद्याचा ‘टॉपचा किंग’ बनवू शकतो.
सुरजनं उत्तम काम केलं यासाठी त्याचं कौतुक तर आहेच, पण त्याच्याकडून हे काम करवून घेणं, तो हे करू शकतो हे बळ देणं व त्यावर प्रचंड विश्वास दाखवून तशी मेहनत घेणं या सगळ्या गोष्टींत दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी ‘सुरज’ला हिरो बनवण्याचं वचन स्वतःला दिलं, ते धाडस केलं व त्यात आता ते यशस्वीही झाले आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून’ कायमच चांगल्या गोष्टी हेरल्या जातात याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण! त्याचप्रमाणे, सुरजसाठी आर्टिस्ट मेंटॉर म्हणून काम केलेल्या ‘अभिषेक करंगुटकर’ याचंही विशेष कौतुक! ‘बिग बॉस’साठी सुरजचं कास्टिंग करण्यापासून आज त्याच्या मोठ्या पडद्यावरील प्रवासापर्यंत त्यानेही सुरजमधील ‘माणुस’ घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. (Zapuk Zhupuk Review)
चित्रपटातील सर्वच गाणी कमाल झाली आहेत. प्रत्येक गाण्याचा बाझ वेगळा असूनही तो सुरजच्या स्टाईलला शोभत आहे. डायलॉग्सच्या बाबतीत लेखक ओंकार दत्त व ऋषिकेश तुरई यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे! त्यांनी लिहिलेले डायलॉग हे वेगळे असले तरी सुरजच्या तोंडून ऐकताना अगदी आपल्यातले वाटतात. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये “आता सुरज काय वेगळं बोलणार?” याची उत्सुकता वाढली नाही तर नवलंच! चित्रपटाचं कथानक इंटरेस्टिंग असल्यामुळे चित्रपट वेगाने पुढे सरकतो, उगाच रेंगाळणारा वाटत नाही. याशिवाय, सुरजच्या ख-या आयुष्यातील काही घटनांचा, संदर्भ जोडून कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला आहे. उदयसिंग मोहिते यांचं छायांकन कमाल! केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय बोलावं? प्रत्येक सीनमध्ये वेगळी फ्रेम दाखवण्याची योग्य ती काळजी त्यांनी याही सिनेमात घेतली आहे. मग तो सुरज-शेखरचा सायकलवरून जातानाचा सीन असो, मंदिरातील प्रसंग असोत, नाहीतर सुरजचं रडणं, ॲक्शन सीन्स! सारंच छान!
आता वळूया, सिनेमातील काही त्रुटींकडे! चित्रपटात वापरण्यात आलेले VFX म्हणावं तेवढी छाप पाडू शकले नाहीत. एका सीनमध्ये जुईने देवाला नमस्कार केल्यावर पडणारं फुल हे ती मागे वळल्यावर पुन्हा देवाच्याच माथी दिसतं. ही लहानशी गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. दिपाली पानसरे यांच्या तोंडी असलेला गावरान Accent सिनेमाभर उगाच वाटत राहतो. ॲक्शन सीन्स चांगले झाले असले तरी एखाद्याला सुरा खुपसून डोक्यात शस्त्रानी घाव घातल्यानंतरही या सगळ्याचा बदला घेऊन, त्या जागेवरून बाहेर पडून, मनातलं सगळं व्यवस्थित बोलून मग त्या व्यक्तीने प्राण सोडताना पाहणं या गोष्टी प्रेक्षकांना अतिशयोक्ती वाटू शकतात. बाकी, ‘सुरजवीर’ काय आहे हे जाणून घेण्यासाठी सिनेमाच पाहायला हवा. त्याबद्दल सांगितलं, तर त्यातली मजा कमी होईल. (Marathi Entertainment)
============
हे देखील वाचा : Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?
============
सुरज सारख्या सामान्य मुलाचा मोठ्या पडद्यावरील हा असामान्य प्रवास अनेकांंना थक्क करणारा, प्रेरणा देणारा, निखळ मैत्रीची नवी व्याख्या मांडणारा, स्वतःतील ‘आतला आवाज’ शोधण्याची दिशा देणारा व आयुष्यातील ‘गुलीगत’ धोक्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे, केवळ एक कथा म्हणून हा चित्रपट न पाहता, मनोरंजन करत त्यातून काहीतरी संदेश देणारा सिनेमा म्हणून याकडे प्रेक्षकांनी पाहिलं तर तो नक्कीच आवडेल, हसवेल व शिकवेलही यात शंका नाही. आपल्या लाडक्या ‘सुरज चव्हाण’चा ‘झापुक झुपूक’ पॅटर्न मोठ्या पडद्यावर काय जादू दाखवतो हे कळावं यासाठी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी पाहाच…
‘कलाकृती मीडिया’ ‘झापुक झुपूक’ या सिनेमाला देत आहे 4 स्टार्स!
-मधुरा वि. शिधये