
Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ की देवमाणूस; कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झाले. यात महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’ चित्रपटाला सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने जोरदार टक्कर दिली आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याला हिरो करण्याचं वचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पूर्ण केलं असून अखेर त्याचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट रिलीज झाला आहे. जाणून घेऊयात बॉक्स ऑफिसवर नेमकी कोणत्या चित्रपटाने अद्याप बाजी मारली आहे. (Marathi movies news)

सोशल मिडियासह सर्वत्रच सुरज चव्हाणच्याच ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची गेले अनेक दिवस हवा होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पहिल्या दिवशी तितकी कमाई करु शकला नाही आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २७ लाखांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर-रेणुका शहाणे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘देवमाणूस’ ची (Devmanus) परिस्थितीही काही वेगळी नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ लाखांची कमाई केली आहे. (Entertainment)

इतक्या वर्षांचा इंडस्ट्रीच्या दांडगा अनुभव असणाऱ्या महेश मांजरेकरांच्या देवमाणूस चित्रपटाला सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने मागे टाकले आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर या वीकेंडपर्यंत हे चित्रपट किती कमाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर, २५ एप्रिललाच ‘ग्राउंड झीरो’, ‘फुले’ (Phule) असे चर्चेत असणारे चित्रपट रीलिज झाले आहेत. या चित्रपटांचं अनुक्रमे बॉक्स ऑफिस कलेक्शन १ कोटी आणि २१ लाख इतकंच आत्तापर्यंत झालं आहे. याशिवाय अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर 2’, सनी देओलचा ‘जाट’ यातही तगडी स्पर्धा पाहायला मिळते आहे.
============
हे देखील वाचा : Zhapuk Zhupuk Review : मोठ्या पडद्यावर वाजतोय सुरजच्या ‘गुलीगत’ पॅटर्नचा डंका
===========
‘झापूक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकर, दीपाली पानसरे हे कलाकार आहेत. तर ‘देवमाणूस’ (Devmanus) मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.(Marathi movies box office collection)