‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जिंदगी विराट: जिद्द ‘बाप’हट्ट पुरवण्याची
“…आख्खा बाप शोधून काढलास. पन हाय, अजून थोडा बाकी हाय. प्रत्येक बाप थोडा थोडा बाकी उरतोच. सापडंल सापडंल, तू बाप झालास म्हंजी तुला सापडंल.” – दत्तोबा, (जिंदगी विराट, २०१७)
बाप काय असतो हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. वयात आल्यावर पोरगा बापाच्या चपलेत आपला पाय घालून बघतो मात्र बापाने आपल्यासाठी उचललेली पावलं आणि त्यामागचा आत्मविश्वास त्याला असा सहजासहजी संपादन करता येत नाही. आई व मुलाचं नातं जितकं जास्त बोलकं तितकाच, कदाचित त्याहूनही जास्त कोरडेपणा बापलेकाच्या नात्यात कायम दिसून येतो. दोघांच्याही कित्येक गोष्टी एकमेकांशी बोलायच्या राहूनच जातात. काळ निघून गेल्यावर मग मात्र त्याचं ओझं वाटू लागतं. मग लेकाची धडपड सुरू होते, बाप समजून घेण्याची.. नकळत निर्माण झालेला शुष्क दुरावा दूर करण्याची..
हे देखील वाचा: बाबू बँड बाजा: आस्था-अनास्थेची वाजंत्री
अंजनेय साठे यांची निर्मिती असलेला सुमित संघमित्र दिग्दर्शित ‘जिंदगी विराट’ (Zindagi Virat) हा २०१७ला आलेला चित्रपट अश्याच एका आगळ्यावेगळ्या ‘बाप’हट्टाची कथा मांडतो. विनोदी ढंगाचा हा चित्रपट कधीकधी हलकेच डोळ्यात पाणी आणतो. किशोर कदम (Kishor Kadam), अतुल परचुरे (Atul Parchure), ओम भूतकर (Om Bhutkar), उषा नाईक(Usha Naik) आणि स्वतः सुमित संघमित्रही (Sumit Sanghamitra) या चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवतात.
कोल्हापूरच्या एका छोट्याश्या खेड्यात घडणारी ही कथा. गवंडी कामं करणारा संतोष उर्फ संत्या (ओम भूतकर) आपला बाप दत्तोबा (किशोर कदम) सोबत राहत असतो. अश्यातच एक दिवस दत्तोबाचा मृत्यू होतो आणि संत्या कायमचा अनाथ होतो. परिस्थितीने अंगात भिनलेला निगरगट्टपणा संत्याला बाप गेल्याचं दुःख आणि मग आलेलं त्याचं एकटेपण पचवायला मदत करतो. असिफ उर्फ असफ्या (सुमित संघमित्र) हा संत्याचा एकमेव जिगरी यार. बापाचं दिवसकार्य करायला गेल्यावर जेव्हा पिंडाला कावळा शिवत नाही, तेव्हा संत्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहतो.
बापाच्या आवडीच्या सगळ्या वस्तू देऊनही शेवटपर्यंत कावळा शिवत नाही. हताश झालेला संत्या असफ्यासोबत नेहमीसारखाच दारू पिऊन ही निराशा लपवण्याचा प्रयत्न करतो. त्याच रात्री नशेत चूर झालेल्या संत्याच्या स्वप्नात त्या बेवडा बाप त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवतो. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट तो संत्याकडे धरतो. आणि इथूनच सुरू होतो बापाची जन्मतारीख शोधण्याचा मनोरंजक प्रवास. असफ्याला सोबत घेऊन संत्या त्याच्या बापाच्या शेवटच्या हट्टासाठी जी धडपड करतो, ती धडपड उलगडणारा हा ‘जिंदगी विराट’..
हे वाचलंत का: ‘वंदनीय’ स्वभावाचे माणिक मोती / साधेपणा जपणाऱ्या वंदना गुप्ते
किशोर कदम यांनी साकारलेला दत्तोबा हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य. कायमच दारू पिऊन झिंगलेला दत्तोबा त्यांनी छान रंगवलाय. अतुल परचुरेंचा जोशी बुवा, चंद्रकांत धुमाळांचा बापू नाना आणि भाऊ कदमने उभा केलेला आण्णा सरपंच, अशी इरसाल पात्रं संत्याच्या खाजगावचं अतरंगीपण दाखवतात. उषा नाईक यांनी गौराक्काच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. आणि यावर कळस म्हणजे, संत्या आणि असफ्या ही जय-विरुची जोडी! चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या सुमितने असफ्याच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचीदेखील चांगलीच छाप पाडलेली आहे.
खास कोल्हापुरी गावठी बाजाचे संवाद आणि सुरज – धीरज या जोडीचं उत्सुकता वाढवणारं पार्श्वसंगीत ही या चित्रपटाच्या जमेची बाजू. जावेद अलीच्या जादुई आवाजातलं ‘दाटे धुके’ हे गाणं संत्याच्या प्रवासाला आणखीनच बहार आणतं. अनावश्यक वाटत असलं तरी डोळ्यांना आणि कानाला सुख देणारं श्रेया घोषाल व सोनू निगमच्या आवाजातील ‘मखमली’ हे एक प्रेमगीतही असंच. सत्यजित शोभा श्रीराम यांच्या कॅमेऱ्यातून दिसणारं कोल्हापूर व बेळगावचं मनमोहक चित्रण आपल्याला खाजगावच्या प्रेमात पाडतं.. हा चित्रपट जरी विनोदी ढंगाचा असला तरी संथ गतीने कथानक पुढे सरकत असल्याने यातले विनोद सुमार वाटतात. अनावश्यक पात्रं व उपकथानकं फक्त चित्रपटाची लांबी वाढवतात, रंजकता नाही. असं असलं तरीही किशोर कदम आणि ओम भूतकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीसाठी हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे.
– प्रथमेश हळंदे