‘कोणाच्या घरी टी. व्ही. आहे का टी. व्ही’…एक छान आठवण
माझ्या पिढीने दूरचित्रवाणीचा संच सर्वप्रथम पाहिला तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात आणि तो ही दुकानाबाहेर उभे राहून…. नेमके सांगायचे तर, २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन या माध्यमाचे आगमन झाले. तत्पूर्वी ‘या’ नवीन गोष्टीबद्दल तेव्हाच्या समाजात एकूणच कुतूहल आणि उत्सुकता होती. एव्हाना या गोष्टीला पन्नास वर्षे झाली पण आजसाठीच्या आतबाहेर असलेल्या पिढीला सत्तरच्या दशकातील ‘कोणाच्या घरी टी. व्ही. आहे का टी. व्ही. ‘ याचा शोध घेण्यातील धडपड आजही आठवतेय. त्या काळातील प्रत्येकाचा त्यात एक छान फ्लॅशबॅक आहे.(Memories of old time TV)
ते दिवस कसे होते माहिती आहे ? त्याच्या काही वर्षांपूर्वीच माझ्या वडिलांनी घरी नुकताच रेडिओ आणलाय हे समजताच गल्लीतील माझे अनेक बालसवंगडी तो रेडिओ पाहण्यासाठी खेळ तसाच अर्धवट ठेवून आले आणि घरी रेडिओ आणला म्हणून आईने सर्वांच्या हातावर चिमूटभर साखर ठेवली असे तेव्हाचे वातावरण होते. आणि जुन्या पिढीतील अनेकांचा असाच अनुभव आहे. अगदी एखाद्याच्या घरी पंखा आणला तरी त्याचा नवा नवा वारा खायला अख्खी चाळ जमे. एकोपा म्हणतात तो हाच. अशातच वृत्तपत्रात आलेल्या ‘मुंबईत दूरदर्शन येतेय’ या बातमीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरणात विलक्षण कुतूहल होते. मला आठवतय, तेव्हा काही ठिकाणी दूरचित्रवाणी संचाच्या आकर्षक जाहिराती लागल्या. रेडिओचे धाकटे भावंड असे या माध्यमाकडे पहिले जाई. दूरचित्रवाणी संच म्हणजे ती वस्तू. ज्याला शाॅटफाॅर्ममध्ये ‘टी. व्ही. संच’ म्हणतात आणि त्यावर जी पहिली वाहिनी ते दूरदर्शन. आज टी. व्ही.चा आकार अनेक इंचांनी वाढलाय आणि जगभरातील अनेक उपग्रह वाहिन्या त्यावर चोवीस तास आहेत. असा काही विकास अथवा प्रगती होईल असे पन्नास वर्षांपूर्वी कोणालाही वाटले नव्हते. सुरुवातीला टी. व्ही. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट होता तरी तेही भारीच वाटायचे.
त्या काळात अगदी सुरुवातीपासून आपल्या आसपास कोणाकडे बरे टी. व्ही. आहे, याचा शोध घेणे ही जणू सामाजिक गरज झाली होती. अख्ख्या चाळीत एकाच घरात टीव्ही असला तरी अख्ख्या चाळीलाच दिलासा मिळायचा. घरात टेलिफोन आणि टी. व्ही. असणे हे प्रतिष्ठेचे विशेष लक्षण होते आणि अशा कुटुंबाशी सगळेच गोडी गुलाबीने वागत. सकाळीच येत असलेल्या नळाच्या पाण्यावरुन त्यांच्याशी कोणीही चुकूनही वाद घालत नसे. न जाणो, क्वचित कधी तरी त्यांच्याकडे आपल्यासाठी आलेला फोन आपल्याला द्यायचे नाहीत आणि आता तर त्यांच्याकडे टी. व्ही. आलाय. गुरुवारचे हिंदी चित्रपटाच्या गाण्यांचे छायागीत, शुक्रवारचे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीचा तब्बसूमचा फूल खिले है गुलशन गुलशन कार्यक्रम, शनिवारचा जुना मराठी चित्रपट, रविवारचा जुना एकादा हिंदी चित्रपट हे कुठे बरे पाहायचे असा प्रश्न पडायचा. आणखी बरेच अनेक प्रकारचे कार्यक्रम असत. त्यात समाज प्रबोधन, सामाजिक बांधिलकी या गोष्टीना प्राधान्य असे. माध्यमाचा तोच ठळक हेतू हवा. त्या काळात सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा या वेळेत प्रक्षेपण असे. दिवसभर टी. व्ही. शांत असे. गुपचूप. आणि त्यावर छान कपडा. लाड लाड म्हणतात ते हेच तर असतात.(Memories of old time TV)
माझ्यासारख्या चित्रपट रसिकाला टी. व्ही. म्हणजे माहिती व मनोरंजनाचे मोठेच दालन उघडले होते. ते माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे वय. आणि त्याच वेळेस चित्रपट पाहणे आणि त्या विश्वाबद्दल जेथे जेथे जे जे वाचायला मिळेल ते वाचणे. फोटो पाहणे. कात्रणे कापून ठेवणे. या सगळ्याला टी. व्ही. सपोर्ट सिस्टीम ठरला.
लहानपणापासून जी गाणी रेडिओवर विविध भारती आणि रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला इत्यादीत ऐकत होतो ती गाणी आता छायागीतमध्ये पाहायला मिळू लागली, जणू बोनसच. अर्थात जे चित्रपट थिएटरमध्ये अथवा गल्ली चित्रपटात पाहिले होते त्याची गाणी पुन्हा एन्जाॅय करता येत होती. अशातच एकदा छायागीतमध्ये राजेश खन्नाने ( Rajesh Khanna ) अमिताभ बच्चनला ( Amitabh Bachchan ) उद्देशून साकारलेले ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ ( १९७३) मधील दिये जलते है फूल खिलते है हे गाणे दाखवायला सुरुवात करताच एकाच वेळेस आनंद, आश्चर्य, गलका, कौतुक अशा मिश्र भावना उमटल्याचे आठवतेय. मागच्याच शुक्रवारी रिलीज झालेल्या पिक्चरमधील गाणे असे टी.व्ही.वर पाहायला मिळतेय म्हणजे कमालच तर झाली असेच वाटले. असे मग अधूनमधून घडायचे. जुन्या चित्रपटाच्या संगीताचा खजिना तसा पुन्हा पुन्हा अनुभवावा असाच होताच म्हणा.(Memories of old time TV)
अनेक जुने मराठी व हिंदी चित्रपट आता टी.व्हीवर पाहायची सोय आणि सवय झाली. आपल्याला आता आठवड्यातून दोन चित्रपट असे पाहायला मिळत आहेत तर मग थिएटरमध्ये जाण्याचा खर्च, वेळ आणि शक्ती वाचली हे उघड होतेच. मॅटीनी शोच्या जुन्या पिक्चरची आता अशी सहज सोय होऊ लागली आणि फिल्मवाल्यांच्या मुलाखती वाचण्याऐवजी दिसू लागल्या. मूळ रंगीत चित्रपट टी. व्हीवर ब्लॅक अँड व्हाईट दिसला तरी हवासा वाटे. हे सगळे पाहायचे तर एकाच वेळेस टी. व्ही. असणारी आसपासची अनेक घरे माहित हवीत. आमच्या स्वतःच्या वाडीत त्याची संख्या सुरुवातीला फार असण्याची शक्यताच नव्हती. म्हणून तर कुठे खिडकीबाहेर उभे राहून तर कुठे घरात घेतले जाई तेथे हे सगळे ‘सिनेमा दर्शन ‘ घेऊ लागलो. आज कदाचित आश्चर्य वाटेल, पन्नास वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी संचाची दोन हजार रुपये किंमत मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरची होती. याचे कारण अर्थातच एकट्या कुटुंब प्रमुखाच्या पगारात मासिक पाचशे ते सातशे रुपये पगारात संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करावे लागे. पती, पत्नी, तीन चार मुले आणि वृध्द आई वडील असे तेव्हा कुटुंब असे. आणि घरे अगदीच छोटी. तात्पर्य, बरीच वर्षे ‘आपल्या घरात टी. व्ही. संच शक्य होईलसे वाटत नाही’ अशीच सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक स्थिती होती..
असो. ज्या घरात टी. व्ही. पाहायचा योग येई आणि त्यासह आनंद मिळे तेथे सिनियर सिटीजन्सकडून जुन्या चित्रपट आणि गाण्यांबद्दल बरीच माहितीही आयती मिळे. त्या काळात ‘मी सांगतो ऐक’ अशी अनेकांची भावना असे आणि आता तर जुनी गाणी अथवा चित्रपट दाखवताना जणू परवानाच मिळाला होता. त्यात अनेक फिल्मी गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा, गाॅसिप्स असा सगळा खच्चून मसाला असे आणि त्यावरुन त्यांची चित्रपटाची आवड, भरपूर वाचन आणि संभाषण कला याचा उत्तम प्रत्यय येई. त्या तेवढ्याश्या खोलीत अगदीच दाटीवाटीने बसून, कोणाच्या मानेवरुन तर कोणाला मान खाली ठेवायला सांगून हे सगळे होई. समाज असाही जोडला गेला.(Memories of old time TV)
काही वर्षांनी ‘एका महिन्यात एकाच दिग्दर्शकाचे हिंदी चित्रपट ‘ असे केलेले आयोजन छान होते. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम, याचे यात नेमके आणि चांगलेच भान ठेवले होते. व्ही. शांताराम ( दो आखे बारह हाथ, गीत गाया पत्थरोने वगैरे) , राज कपूर ( बरसात, श्री ४२० वगैरे), बी.आर. चोप्रा ( नया दौर, साधना, गुमराह वगैरे), बिमल राॅय ( मधुमती, सुजाता, बंदिनी, दो बिघा जमीन), सोहराब मोदी ( पुकार वगैरे) यांचे एकेका महिन्यात चित्रपट पाहणे म्हणजे त्यातून एक प्रकारची चित्रपट माध्यम, मनोरंजनातून प्रबोधन याची जणू शिकवण होती. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत समाजाला आस्था, आदर आणि प्रेम असे. सत्तरचे दशक अशाच अनेक गोष्टींतून घडले, आकार घेत राहिले. हळूहळू टी. व्ही. संच असणारी घरे वाढत गेली. टी. व्ही. संच आर्थिक आवाक्यात आला. १९७७ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल सलग दोन दिवस टी. व्ही. वर दाखवताना अधेमधे मिळून पाच चित्रपट दाखवले. पिक्चरमध्ये मोठा ब्रेक घेऊन निकाल वृत्त असायचे असे म्हटले तरी चालेल. काय चंगळ होती हो पिक्चर पाहण्याची. अनेकांना हा अनुभव लक्षात राहिलाय.(Memories of old time TV)
======
हे देखील वाचा : नाक्यावरील, चौकातील होर्डींग्सच्या आठवणी…
======
अशातच १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हीसीआर/ व्हिडिओ कॅसेट यांचे आगमन होताच ब्लॅक अँड व्हाईट टी.व्हीचा काळ हळूहळू मागे पडत गेला. तरी आणखी काही वर्षे त्यात गेलीच. आणि आता टी. व्ही. संच असलेली घरेही वाढली. ते काही असो, ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल टी. व्ही.चा काळ अनेक बाबतीत फारच रंगीत होता. त्यात एक रंग हा असा फिल्मी होता….रुपेरी पडद्यावरील चित्रपटाला रसिकांच्या घरात आल्याची ती झक्कास सुरुवात होती. एखाद्या नवीन गोष्टीची कधी तरी सुरुवात होतच असते. आणि व्हायलाही हवीच….याच छोट्या पडद्याने आज मोठ्या पडद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न काही प्रमाणात निर्माण होत चाललाय….