Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाचा १४ वर्षांचा प्रवास सोपा नव्हता – अतुल कुलकर्णी
हॉलिवूडचा फॉरेस्ट गम्प, बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान आणि मराठमोळा राष्ट्रीय कलाकार अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) अशा जबरदस्त रसायनातून तयार झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे… यानिमित्ताने या सिनेमाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी ‘कलाकृती मीडिया’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सिनेमाच्या घडणीची गोष्ट सांगितली.
“काही माणसं झपाटल्यासारखी एखाद्या गोष्टीच्या मागे लागतात, कितीही अडचणी आल्या, तरी नेटाने ती गोष्ट पूर्ण करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा सिनेमा लाल सिंग चढ्ढा…” प्रसिद्ध अभिनेते आणि या सिनेमाचे लेखक अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) सांगत होते. आज हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर असला, तरी तो बनायला एक- दोन नाही, तर तब्बल १४ वर्ष लागली. पण आमच्या संयमाचं फळ मिळालं”, असं ते म्हणाले.
१९९४ मध्ये आलेला ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा सामान्य बुद्धीच्या मुलाचा असामान्य प्रवास गमतीदार पद्धतीनं मांडणारा सिनेमा आहे. टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आज इतक्या वर्षांनंतरही प्रेरणादायी मानला जातो. या सिनेमाचं भारतीय रूप म्हणजे अतुल कुलकर्णी लिखित लाल सिंग चढ्ढा. अतुल म्हणाले, “मी आणि आमीरची एकदा वेगवेगळ्या सिनेमांवरून चर्चा सुरू असताना त्यात फॉरेस्ट गम्पचा विषय निघाला आणि तेव्हा फॉरेस्ट गम्प हा आमच्या दोघांच्याही आवडीचा सिनेमा आहे, असं लक्षात आलं. त्यावेळी झालेल्या चर्चेतून यांना हा सिनेमा लिहायची प्रेरणा मिळाली.”

हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अतुल यांनी कथा लिहायला सुरुवात केली, मात्र सिनेमा प्रत्यक्षात आणण्यासाठी बराच वेळ गेला. कारण सिनेमाचे हक्क मिळवण्यासाठीच त्यांना आठ वर्ष लागली. त्यानंतरही कास्टिंग, कोविडमुळे पडलेला खंड, शूटिंग वगैरे नंतर जवळपास १४ वर्षांनी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर येत आहे.
‘रंग दे बसंती’ सिनेमाच्या काळात अतुल आणि आमीर यांच्यात झालेल्या मैत्रीला या सिनेमाच्या निमित्ताने लेखक- अभिनेता हे नवं परिमाण मिळालं. त्याविषयी विचारल्यावर अतुल म्हणाले, “मुळात माणूस म्हणून आम्ही कनेक्ट झालेलो आहोत. आमच्यात मुद्दाम किंवा ओढूनताणून असं काही नाहीये. लाल सिंग चढ्ढाच्या १४ वर्षांच्या प्रवासात आमचा सतत एकमेकांशी संवाद सुरू होता. या क्षेत्रात संयमी असणं एरवीही गरजेचं असतं आणि या सिनेमासाठी त्याची जास्तच गरज लागली. पण इतका वेळ लागत असूनही आमचे स्वभाव संयमी असल्यामुळे आणि आमच्यात असलेल्या प्रगल्भतेमुळे हा प्रवास सुसह्य झाला.”
फॉरेस्ट गम्पसारख्या प्रचंड गाजलेल्या सिनेमाचं भारतीयीकरण करणं किती आव्हानात्मक होतं यावर अतुल म्हणाले, “या सिनेमाची प्रत्येक फ्रेम आव्हानात्मक होती. या सिनेमाचा आवाका खूप मोठा आहे. त्यात कित्येक गोष्टी समाविष्ट आहेत. त्या सगळ्या पडद्यावर मांडणं सोपं नव्हतं. जरी याची कथा फॉरेस्ट गम्पवर आधारित असली, तरी हा एक पूर्णपणे नवा सिनेमा आहे आणि प्रेक्षक त्याचा भारतीय सिनेमा म्हणून आस्वाद घेतील याची मला खात्री वाटते.”

========
हे देखील वाचा – ‘या’ महान व्यक्तीच्या सल्ल्यामुळे राहुल देशपांडे ‘सी ए’ चा अभ्यास सोडून गाण्याकडे वळले
========
अतुल आणि आमिर अशा दिग्गज जोडीबरोबर या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे अद्वैत चंदन यांच्यासारख्या तरुण, नवख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी अतुल म्हणाले, “मी आणि आमीर एकाच वयाचे आहोत. आमचा जन्मही एकाच वर्षात झालेला आहे, पण अद्वैत आमच्यात एक वेगळा दृष्टीकोन घेऊन आला. त्याची तांत्रिक बाजू उत्तम आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव छान होता.”
– कीर्ती परचुरे