दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!
२००१ साली आलेला ‘रहना है तेरे दिल मे’ अर्थात RHTDM हा चित्रपट आठवतोय का? अर्थात आठवणारच! हा चित्रपट आठवणार नाही असं म्हणणारा त्या काळातला तरुण (आणि अर्थातच) तरुणी एखादीच असेल. हा चित्रपट तर सुपरहिट झालाच होता. पण त्यासोबतच या चित्रपटामुळे आर माधवन समस्त तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता.
‘रहना है तेरे दिल मे’ (RHTDM) या चित्रपटात त्या काळातले कोणतेही स्टार कलाकार नव्हते. आर माधवन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्यापैकी चमकला होता, पण बॉलिवूडमध्ये त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. दिया मिर्झा तर, टॉपच्या नायिकांमध्ये कधीच गणली गेली नव्हती. या चित्रपटात सैफ अली खानची सहायक अभिनेत्याची भूमिका होती. अर्थात सैफही तेव्हा आपलं स्थान बळकट करण्यासाठी खरं तर मिळविण्यासाठी धडपडत होता. एकंदरीतच ‘बिग बजेट’ किंवा ‘तगडी स्टारकास्ट’ असणारा हा चित्रपट अजिबातच नव्हता.
चित्रपटात कोणतेही बडे स्टार नव्हते तसंच चित्रपटाचे दिग्दर्शक होते गौतम वासुदेव मेनन. एक मेकॅनिकल इंजिनिअर. दिग्दर्शनाचा अनुभव सांगायचा तर नाही म्हणायला एका तामिळ चित्रपटाचा अनुभव गाठीशी होता. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. पण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक हॅरिस जयराज यांचाही हा पहिला हिंदी चित्रपट होता याआधी त्यांनी एकमेव तामिळ चित्रपट केला होता तो ही दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांच्या सोबत.
चित्रपटाचे लेखन केले होते विपुल शहा आणि गौतम वासुदेव मेनन यांनी. विपुल शहा यांनी आधी एकाच तामिळ चित्रपटाचे लेखन केलं होतं. तर या सर्वानी एकत्र काम केलेला एकमेव चित्रपट होता ‘मिन्नले (Minnale)’. या चित्रपटाचाही नायक होता आर माधवन. होय! ‘रहना है तेरे दिल मे’ हा चित्रपट ‘मिन्नले (Minnale’) या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व तरुण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होते. (RHTDM)
चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन मेकॅनिकल इंजिनीअरिंग करत असतानाच त्यांना मनोरंजनची दुनिया खुणावत होती. त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलं, पण करिअर मात्र मनोरंजनाच्या दुनियेत करायचं हा निर्णय पक्का होता. अर्थात त्यांच्या कुटूंबियांनीही त्यांना साथ दिली.आणि त्यांचा प्रवास सुरु झाला.
गौतम यांनी लिहिलेली ‘रहना है तेरे दिल मे’ ची कथा एका महाविद्यालयीन मुलाची प्रेमकथा होती. या मुलाच्या भूमिकेसाठी त्यांना एक रोमँटिक चेहऱ्याचा नायक हवा होता. हा मुलगा त्यांना सापडला तो ही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. हो! आर माधवन आपलं इंजिनिअरिंग (बीएस्सी – इलेकट्रॉनिक्स) पूर्ण करूनच या क्षेत्रात आला होता.
गौतम चित्रपटाची कहाणी घेऊन माधवन यांच्याकडे गेले. माधवनने आपले गुरू मणिरत्नम यांच्याकडून या चित्रपटाबद्दल सल्ला मागितला. मात्र मणिरत्नमना चित्रपटाची कथा फारशी रुचली नाही त्यामुळे त्यांनी माधवनला नकार देण्याचा सल्ला दिला. परंतु, माधवनला मात्र हा चित्रपट करायचा होता. द्विधा मनस्थितीत असताना त्यांना मणिरत्नम यांनी पूर्वी दिलेला सल्ला आठवला. त्यांनी सांगितलं होतं, “वाटल्यास चार चित्रपट इतरांसाठी कर, पण त्यानंतर स्वत:साठी किमान एक चित्रपट तरी कर.” (RHTDM)
माधवनला हा चित्रपट स्वतःसाठी करायचा होता. त्याने गौतमला होकार दिला. माधवन तेव्हा दक्षिणेत बऱ्यापैकी यशस्वी होता. त्यामुळे निर्मात्यांकडून त्याला नकार येण्याचं प्रश्नच नव्हता, पण निर्माते दिग्दर्शकाचं नाव ऐकून मात्र या चित्रपटासाठी तयार होत नव्हते.
अनेक निर्मात्यांचा नकार पचवल्यावर आर माधवन डॉक्टर मुरली यांच्याकडे गेले. त्यांना कथा आवडली पण दिग्दर्शकाचं नाव ऐकून ते म्हणाले, “तू माझं नुकसान करायचंच असं ठरवलं आहेस का? त्यांनतर कला दिग्दर्शकाबद्दल विचारलं, तर ते ही नवीन. हे ऐकून मुरली यांनी डोक्याला हात लावला. पण माधवनने त्यांना चित्रपटाच्या यशाची खात्री दिली आणि ‘मिन्नले’ तयार झाला. दक्षिणेत या चित्रपटाने कमाल केली.
==========
हे देखील वाचा – कार चालवायला शिकवणाऱ्या आपल्या गुरुला मुक्ताने दिली होती ‘अशी’ गुरुदक्षिणा
==========
यानंतर या नवख्या कलाकारांच्या प्रतिभेवर विश्वास दाखवला तो बॉलिवूडमधले अनुभवी निर्माते वासू भगनानी यांनी. त्यांनी याच टीमला घेऊन ‘मिन्नले’चा हिंदी रिमेक बनवला – ‘रहना है तेरे दिल मे’. अर्थात रिमेक करताना त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते. सुरुवातीला ‘रहना है तेरे दिल मे’ फ्लॉप म्हणूनच घोषित करण्यात आला होता. पण नंतर मात्र चित्रपटाने गर्दी खेचली आणि चित्रपट हिटच्या यादीत जाऊन बसला. दक्षिणेप्रमाणेच बॉलिवूडमध्येही या चित्रपटाने कमाल केली. आजही आर माधवन ‘मॅडी’ म्हणून ओळखला जातो. (RHTDM)