किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
या पाकिस्तानी चाहत्यामुळे हेमा मालिनीने गमावली आपली जवळची व्यक्ती..
कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम हवंच असतं. फॅन फॉलोअर्स त्यांच्यासाठी ‘उर्जा केंद्र’ असतं, टॉनिक असतं. पण कधीकधी चाहत्यांकडून प्रेमाचा अतिरेक होतो आणि त्यातून भयंकर अशा घटना घडतात. अभिनेत्री हेमा मालिनी यांना याबाबत आलेला हा अनुभव खूप काही सांगून जाणारा आहे. हा अनुभव त्यांच्यासाठी इतका कटू होता की, त्यातून हेमा मालिनीला आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमवावे लागले. काय होता हा किस्सा? (Dream Girl Hema Malini)
राज कपूर सोबत १९६८ साली महेश कौल दिग्दर्शित ‘सपनोंका सौदागर’ या चित्रपटातून हेमामालिनीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘ड्रीमगर्ल’ अशी तिची मीडियाने ओळख करून दिली. खरोखरच हेमा मालिनीने हिंदी सिनेमाचा रुपेरी पडदा आणखी देखणा केला होता. लोभस रूप, सुंदर भाव मुद्रा, टप्पोरे डोळे, नृत्य निपुणता आणि घायाळ करणारे सौंदर्य! त्या काळातील प्रत्येक हिरोला आपली नायिका हेमा मालिनी असावी, असं वाटायचं. (Dream Girl Hema Malini)
जॉनी मेरा नाम, सीता और गीता, नया जमाना या चित्रपटातून हेमा रसिकांना सौंदर्य आणि अभिनयाच्या माध्यमातून आपलंसं करत होती. या काळातील तिचा फॅन फॉलोईंग प्रचंड होता. असंख्य रसिक दिवाने हेमाचं दर्शन घडावं म्हणून तिच्या स्टुडिओभोवती, बंगल्याभोवती कायम जमा झालेले दिसायचे. हेमाने संपूर्ण हिंदुस्थानात आपल्या सौंदर्याने एक जादू निर्माण केली.
हा किस्सा साधारणतः १९७८ सालचा आहे आहे. त्याकाळी हेमा मालिनी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. तिच्या चाहत्यांमध्ये भारताप्रमाणेच इतर देशातील लोकही होते. तिचा एक पाकिस्तानमधील चाहता तिला भेटण्यासाठी भारतात आला होता. हा तिचा ‘डायहार्ड फॅन’ होता. हा चाहता रोज हेमामालिनीच्या बंगल्याभोवती घुटमळत असायचा. (Dream Girl Hema Malini)
एकदा तरी हेमा मालिनी आपल्याला दिसेल या आशेने तो तिथे कायम असायचा. तिथल्या सिक्युरिटीने त्याला बऱ्याचदा हटकले, पण हा चाहता ‘कम्प्लीट नादखुळा’ होता. रोज सकाळी हेमा तिच्या कारमधून त्याच्या डोळ्यासमोरून निघून जायची, पण कारच्या काळ्या ग्लासमुळे हेमामालिनी त्याला दिसत नव्हती. हा चाहता रोज तळमळायचा. एकदा त्याने तिच्या कारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण सिक्युरिटीने त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यामुळे चिडून त्याने ‘आज रात्री काही करून तिच्या बंगल्यात शिरण्याचा’ निर्णय घेतला!
रात्री बंगल्यातले सर्व दिवे मालवल्यानंतर मध्यरात्री हा पाकिस्तानी चहाता ‘कंपाऊंड वॉल’वरून उडी मारून हेमामालिनीच्या बंगल्याच्या आवारात शिरला. हेमामालिनीची बेडरूम वरच्या मजल्यावर असेल असे समजून तो वरच्या मजल्यावर गेला. पण ती बेडरूम हेमामालिनीची नव्हती, तर तिच्या भावाची होती. तिच्या भावाच्या छोट्या मुलाला घरातील मोलकरीण झोपवत होती. तिला बंगल्याच्या आवारात काहीतरी हालचाल जाणवली. तिने पटकन लाईट लावले. पाहिले तर व्हरांड्यात तिला हा पाकिस्तानी चाहता दिसला.
या मोलकरणीने आरडाओरडा करून सर्व नोकरांना उठवले. नोकरांनी झडप मारून त्या व्यक्तीला पकडलं. हा पाकिस्तानी चाहता ओरडून ओरडून सांगत होता “मी चोर नाही मला फक्त हेमामालिनीला भेटायचं आहे.” परंतु नोकरांनी त्याला चोप द्यायला सुरुवात केली. मग या व्यक्तीने तिथे टेबलवर पडलेला एक चाकू हातात घेतला आणि पुन्हा पुन्हा जोरात सांगू लागला “मी चोर नाही मला फक्त एकदा भेटू द्या. मी निघून जातो.” नोकरांनी त्याला बदडणे चालू ठेवले. (Dream Girl Hema Malini)
या सर्व गोंधळाने हेमामालिनीचे वडील (व्ही एस आर चक्रवर्ती) यांना जाग आली. नोकरांनी एका व्यक्तीला पकडले असून, त्या व्यक्तीच्या हातात चाकू आहे हे पाहून ते प्रचंड घाबरून गेले. ते थरथर कापू लागले. आणि पोलिसांना फोन करण्यासाठी ते फोनकडे जाऊ लागले. आधीच अर्धवट झोपेत त्यात प्रचंड भीती आणि बीपी शुगरचा त्रास असल्यामुळे ते फोनजवळ जाण्याआधीच त्यांना हार्ट अटॅक आला आणि तेथेच कोसळले. (Dream Girl Hema Malini)
===========
हे देखील वाचा – ‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!
===========
यानंतर ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि त्या पाकिस्तानी चाहत्याला पोलिसांच्या हवाली केलं. हेमा मालिनीच्या वडिलांनी मोठा धसका घेतला होता आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तिकडे पोलिसांनी त्या चाहत्याला काही फटके देऊन सोडून दिले कारण त्याने तसा काहीच गुन्हा केला नव्हता. पण या सर्व प्रकाराची शिक्षा कुटुंबाला झाली. हेमा मालिनीच्या पित्याला प्राण गमवावे लागले.