मराठी चित्रपट बदलतोय…चित्रपटात होतायत नवनवीन प्रयोग
साधारण सातेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रायटर्स असोसिएशनतर्फे यूट्यूब आणि त्याचा वापर यावर परिसंवाद ठेवला होता. या परिसंवादाला जायचा योग आला होता. त्यावेळी त्या चर्चेतून समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा असा होता की, हिंदीमध्ये यूट्यूबने स्वत:ला भरपूर एक्स्पोज केलं होतं. आता त्यांना प्रादेशिक भाषांमध्ये घुसायचं होतं. कारण, प्रादेशिक भाषांमध्ये असलेले वापरकर्ते ‘टारगेट’ झाले नव्हते. त्यात त्यांना मोठं ‘मार्केट’ दिसत होतं. (New Trends in Marathi movies)
थोड्याफार फरकाने आजच्या ओटीटीवाल्यांची स्थितीही अशीच झाली. इंग्रजी, हिंदीमध्ये पुरेसं ‘एक्स्पोजर’ मिळाल्यावर त्यांना प्रादेशिक भाषेचं मार्केट दिसू लागलं. कारण हिंदीच्या तुलनेत प्रादेशिक भाषांमधला यूजर तितकंसं ओटीटी वापरत नव्हता. त्याचवेळी प्रादेशिक भाषांमधल्या कलाकृतींनाही ओटीटीवर फारसं घेतलं जात नव्हतं. या ऑडिअन्सला टारगेट करायचं, तर त्या भाषेतल्या चित्रकृतींना ओटीटीवर आणायला हवं हे या प्लॅटफॉर्म्सनी ताडलं. म्हणून काही काळानंतर या सगळ्या प्लॅटफॉर्म्सनी प्रादेशिक भाषांमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरूवात केली, तर काही भाषांमध्ये अनेक स्थानिक ओटीटी उदयाला आले. कारण, या सगळ्यांना प्रादेशिक भाषांमधून ‘एक्स्पोज’ न झालेले वापरकर्ते अर्थात ‘मार्केट’ दिसत होतं.
हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण असं की, हीच गोष्ट आता चित्रपटांना लागू झाली आहे. प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपट त्या त्या राज्यांत पुरेसे एक्सपोज झाले आहेत. त्यांनी आपला असा ‘क्राऊड’ तयार केला आहे. ते चित्रपट आजही काही शे कोटींचा व्यवसाय करत असतात. ते समाधानी आहेत, आनंदी आहेत. पण व्यवसाय म्हणून त्यांना आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की, आपण केवळ प्रादेशिक चित्रपटापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर चाललेल्या स्पर्धेत उतरायला हवं. कारण, त्यांच्या चित्रपटांमध्ये मनोरंजन पुरेपूर होतं. (New Trends in Marathi movies)
हिंदी चित्रपट याच सिनेमांची कॉपी करु लागले होते. प्रभूदेवा, शंकर, मुरगोदास आदी अनेक मंडळी दाक्षिणात्य चित्रपटांचे ‘फ्रेम टू फ्रेम’ रिमेक करु लागले होते. म्हणजे, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषिकांना आपले चित्रपट आवडतात, हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि मग आता त्यांनी इतर राज्यांमधलं मार्केट काबीज करायचं ठरवलं ते हिंदीची कास धरून.
या सगळ्या स्पर्धेत मराठी चित्रपट काय करतो ते बघणं कुतूहलाचं होतं. एकिकडे आपल्याकडे एकापेक्षा एक चित्रपट येऊ लागले आहेत. पण तेवढं पुरेसं नाही. कारण, चित्रपट हिंदी असो किंवा तामिळ, तेलुगू या चित्रपटांची बजेट्स काहीशे कोटींची असतात. त्यामुळे त्यातला ‘तामझाम’ तसा असतो. मराठीचं तसं नाही. मग मराठी काय करणार हा मुद्दा होता. आता त्यात काही नव्या छटा दिसू लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ऋचा थत्ते यांचा ‘रचना’ हा चित्रपट ऑनलााईन प्रदर्शित झाला. अनेक व्हॉट्स ॲप ग्रुपवर त्याचे मेसेज फिरले. या चित्रपटाच्या उत्पन्नाचा काही भाग कर्करोगग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. शिवाय हा चित्रपट घरच्याघरी पाहता येणार आहे. एका तिकीटात संपूर्ण कुटुंब हा चित्रपट पाहू शकणार आहेत. एकदा वॉचवर तुम्ही प्रेस केलंत, की पुढचे सहा तास कधीही तुम्ही चित्रपट पाहू शकता. हे एक वेगळं पाऊल आहे. नवा ट्रेंड आहे. (New Trends in Marathi movies)
मराठी चित्रपट हे काही एसएस राजामौली यांच्या चित्रपटाशी स्पर्धा करु शकणारे नाहीत. त्यामुळे विषय कौटुबिक असेल, तर मराठी चित्रपट घरच्या होम थिएटरवर चित्रपट बघण्याचा आनंद देऊ शकतो. हे लक्षात घेऊनच कदाचित रचना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा.
ही बातमी येते न येते तोच आणखी काही चित्रपटही आता प्रादेशिक भाषांमध्ये घुसत असल्याचं लक्षात आलं आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो ‘हर हर महादेव’ या अभिजीत देशपांडे यांच्या बाजीप्रभूंच्या पराक्रमावर बेतलेल्या चित्रपटाचा. हा चित्रपट हिंदीसह तामीळ, तेलुगु या भाषांमध्येही रिलीज होणार आहे. ‘ऑपरेशन लंडन कॅफे’ हा चित्रपटही मराठीसह कानडी भाषेत बनतो आहे, तर काही आठवड्यांपूर्वी आलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या बाबतीतही काहीतरी नवी घडामोड घडते आहे. हा चित्रपट येत्या काळात अनेक भाषांमध्ये डब करण्याचा मनोदय निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. (New Trends in Marathi movies)
अनेक मराठी चित्रपट सतत हिंदीच्या मागे लागण्यापेक्षा आता काही प्रादेशिक भाषांवर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. चित्रपट चांगला असेल, तर दाक्षिणात्य भागांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो हे नागराज मंजुळे याच्या सैराटनेही दाखवून दिलं आहे. कारण तिथल्या प्रेक्षकांकडे चित्रपटांचं ‘कल्चर’ आहे, तिथल्या प्रेक्षकांची आपली अशी टेस्ट आहे.
दक्षिणेत फक्त गल्लाभरू चित्रपटच बनतात असं नाही. जय भीम सारखा चित्रपटही तिकडेच बनला होता आणि ‘सुपर डिलक्स’ सारखा चित्रपटही ही मंडळी बनवतात. कारण तिथेही पिढीबदल होतो आहे. अशा धर्तीवर मराठी भाषेतला चित्रपट त्यांचं मनोरंजन करत असेल, तर त्याचं मोल आहेच. अर्थात तिथे वितरणाची पद्धत आणि त्याचे नियम हे त्यांचे त्यांनी ठरवले आहेत. पण त्या नियमात आपण आपल्याला बसवून घेतलं तर एक नवं मार्केट आपल्याला खुलं होईल यात शंका नाही. (New Trends in Marathi movies)
हे ही वाचा: इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!
सावधान! सेलिब्रिटींचे ‘रीललाईफ’ कंटाळवाणे होते आहे…
मराठीत होणारे हे नवे प्रयोग स्वागतार्ह आहेत. हिंदीपुरतं अवलंबून न राहता कानडी, तामीळ, तेलुगु, मल्याळम इतकंच काय तर कोंकणी, गुजराती आदी भाषांमधलं मार्केट लक्षात घेऊन आपला चित्रपट त्या मार्केटमध्ये उतरवला, तर आपल्यासाठी नवं दालन खुलं होईल. मात्र एक लक्षात घ्यायला हवं, एकाच नियमानं सगळ्यांनी जाऊनही चालणारं नाही. हा निर्णय घेण्यासाठी नियम व अटी लागू असणार आहेत.