थिएटरमध्ये तेव्हा पहिल्या रांगेत बसून बघितलेला सिनेमा वेगळा दिसायचा ….
“लवकर बोल, पहिल्या रांगेतील तिकीट आहे….पिक्चर हाऊसफुल्ल होईल इतक्यात….” गिरगावातील सेन्ट्रल थिएटरला रवि टंडन दिग्दर्शित ‘अनहोनी’ (१९७३) चित्रपटाच्या स्टाॅलच्या तिकीटासाठी खिडकीत टाकलेला माझा हात पाहून बुकिंग क्लार्क मला विचारत होता. आणि मी ‘नाही’ म्हणणं शक्यच नव्हतं. माझ्या अगोदरच्याने ‘पहिल्या रांगेत बसून पिक्चर पाहायचा…नको रे….”,असा विचार करीतच नंबर सोडला होता. (Memories of Stall and Balcony)
फार पूर्वी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये स्टाॅलच्या मोजून तीन अथवा चार रांगा असत आणि माझ्यासारख्याला त्याचेच तिकीट परवडत असे. पडद्यासमोरच्या पहिल्याच रांगेत बसून चित्रपट पाहिला काय आणि बाल्कनीच्या शेवटच्या रांगेत बसून पाहिला काय, असा काय मोठा फरक पडतोय, हा प्रश्न पडण्याचा तो काळ सुरु होता. पहिल्या रांगेतच आपण बसणार आहोत, हा ‘माइंड सेट’ झाला होताच.
सत्तरच्या दशकात मी असे ‘पहिल्या अथवा सुरुवातीच्या तीन चार रांगात बसून’ अनेक मराठी व हिंदी चित्रपट एन्जाॅय केले, अनुभवले. काही डोक्यात घेतले, काही डोक्यावर घेतले. त्यामुळेच माझी चित्रपटाशी जवळीक वाढत गेली असावी. तेव्हा काही एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये नियमित शोला ‘स्टाॅलचे तिकीट’ होते एक रुपया पासष्ट पैसे, तर मॅटीनी शोला एक रुपया पाच पैसे असे होते, तर वातानुकूलित थिएटरमध्ये हेच तिकीट अनुक्रमे दोन रुपये वीस पैसे आणि एक रुपया पासष्ट पैसे असे होते. एकेक पैसा तेव्हा महत्वाचा वाटे.
त्या काळात एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे, दहा पैसे अशी नाणी होती. ती मुठीत धरून तिकीट खिडकीत आत द्यावी लागत. मुठीत मावणारे पैसे मनभर सिनेमाचा आनंद देणार आहे अशी त्या काळातील एक सर्वसाधारण भावना. त्यातही काही वैशिष्ट्ये असत.
स्टाॅलच्या तिकिटाच्या रांगेत शाळा काॅलेजमधील विद्यार्थ्यांपासून मध्यमवयीनपर्यंतचा वयोगट. विशेषतः मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गीय. कष्टकरी, कामगार तसेच आशावादी, स्वप्नाळू वर्ग, सिनेमाच्या तिकिटासाठीही खरोखरच घाम गाळण्यास तयार असणारा माझ्यासारख्यांचा वर्ग. या रांगेत शिस्त कमी पण गोंधळ जास्त. तीही एक परंपरागत रुजलेली ‘पब्लिक संस्कृती’ होती. तिकीट खिडकीत हात घातल्यावर ऐनवेळेस पाच पैसे कमी पडू नयेत या भीतीपायी काहीजण पैशाची नाणी पुन्हा, पुन्हा मोजत.
तिकीट खिडकी उघडताच रांगेला गती येई. लठ्ठालठ्ठी होई. ती करता यायला हवी. त्या काळात थिएटरला गेलो, चित्रपट पाहिला, असे इतके सरळ सोपे गणित नव्हतेच. आणि त्यातच खरी गंमत होती. चित्रपट असा अनेक वळणं घेत घेत एन्जाॅय करता येत होता. ते खरे चित्रपटांचे दिवस होते.
अखेर, हातात ‘तिकिट’ येतं आणि थिएटरच्या इमारतीत थेट प्रवेश मिळतो. स्टाॅलचे तिकीट काढल्यावर ‘बाहेरच्या जगा’शी पब्लिकचा संबंध राहू नये अशीच त्या काळातील अनेक सिंगल स्क्रीन थियेटरची रचना. अर्थात, हातात तिकीट येताच सिंगल स्क्रीन थिएटरच्या स्टाॅलच्या पब्लिकच्या मनात चित्रपट सुरु झालेला असे. चित्रपट पडद्यावर सुरु होण्यापूर्वी मनात दिसू लागे.
ताडदेवच्या डायना थिएटरमध्ये स्टाॅलचे तिकीट ६५ पैसे असे होते. पण त्याला तिकीट नंबर नसे. त्यामुळे कधी बरे एकदा तो जाळीचा दरवाजा उघडतोय आणि चौथ्या रांगेतली सीट पकडतोय असेच होई. अशातच आम्हा स्टाॅल तिकीटधारी हौशी पब्लिकच्या प्रेशरनेच तो दरवाजा तुटतोय की काय, अशीही भीती वाटे. डोअर किपर साखळीचा दरवाजा उघडायचा आणि जो तो धूम ठोकत खुर्ची पकडायला धावायचा. डायनाला कायमच रिपीट रनचे चित्रपट लागत. त्यामुळे काही पाहायचे राहून गेलेले आणि पुन्हा पहावेसे वाटणारे चित्रपट असे दोन्ही प्रकारचे चित्रपट पाहणे झाले. तेही पहिल्या रांगेत बसून!
आजच्या चकाचक मल्टिप्लेक्स कल्चरच्या युवा पिढीतील रसिकांना ‘स्टाॅलचा पब्लिक’ म्हणजे काय हे माहीत नसावे. खरंतर आपल्या चित्रपटाचा सर्वच स्तरांवरील इतिहास रंजक आहे. एकेकाळी हे एक अद्भूत आणि चमत्कारिक असे धमाल प्रकरण होते. (Memories of Stall and Balcony)
पूर्वी स्टाॅलच्या पब्लिकला पिटातला पब्लिक असे म्हटले जाई. स्टाॅल व अप्पर स्टाॅलच्या प्रेक्षकांना चित्रपट आवडला म्हणजेच तो सुपरहिट असंच जणू त्या काळात ‘बॅरोमिटर’ होते. हल्ली किती कोटीची कमाई झाली यावर ते ठरते. पण त्या आकड्यांची शहानिशा कोण करणार? आतमध्ये दहा प्रेक्षक नसूनही काही कोटीची कमाई कशी होते? काय जादू आहे? असो.
‘स्टाॅल व त्यामागचा अप्पर स्टाॅलचं पब्लिक इंपीरियल थिएटरमध्ये अलबेला (१९५१) मधील ‘भोली सुरत दिल के खोटे’ गाण्यावर पडद्यावर सुट्टे पैसे उडवायचा आणि पडद्यासमोर येऊन नाचायचा. त्याच्या गोष्टी आजही सत्तर वर्षानंतरही रंगवून खुलवून सांगितल्या जातात. इतरही काही चित्रपटांना असं गाण्याच्या वेळी पडद्यावर पैसे फेकण्याचे भाग्य लाभलं आणि डोअरकिपर्सची वरकमाई झाली. (Memories of Stall and Balcony)
तिरकस राजकुमारच्या डायलॉगला आणि अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ला पहिली शिट्टी आणि टाळी आम्ही स्टाॅलच्या पब्लिकनेच दिली. पडद्यावरच्या विश्वात हरवून जाणं आणि एखाद्या संवाद अथवा गाण्याला मनसोक्त मनमुराद दाद देणं, हा जणू आम्हा स्टाॅल आणि अप्पर स्टाॅलच्या पब्लिकचा आनंद आणि अधिकार. खरंतर अगदी पहिल्या रांगेत बसून चित्रपट पाहताना मानेवर आणि डोळ्यावर ताण पडायचा. पण पडद्यावरचे विश्व हे विसरायला लावायचे. पडद्यावरच्या आकृत्या उभ्या दिसत. तेही स्वीकारलं.
आम्ही स्टाॅल अप्पर स्टाॅलचे पब्लिक शो सुटता सुटताच बाहेर पडताना आपला ‘एका ओळीतील रिव्ह्यू ‘ देऊन मोकळे होत असू. सगळं कसं झटपट. चित्रपट पाहताना डोक्यात भिनलं जात असे…चित्रपट आवडला असेल, तर “काय भारी पिक्चर आहे” असे अगदी उत्स्फूर्तपणे बोलणार आणि जर आवडला नसेल, तर “कुछ दम नही, बहोत ही बोअर करती है”, असं प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार, ही आमची सवय, जणू हाच आमचा हक्क आणि हट्ट.
नवीन चित्रपटाच्या मेन थिएटरच्या ‘फस्ट डे फर्स्ट शो’नंतर बाहेर पडत असलेल्या आम्हा स्टाॅल अप्पर स्टाॅलच्या पब्लिकची मनमोकळी मते खूपच बोलकी (अनेकदा बोचरी) असत. चित्रपटसृष्टीतले बिझनेस पंडित याच ‘खुल्लम खुल्ला’ मतांनुसार अमकातमका चित्रपट किती यशस्वी ठरेल, याचे ठोकताळे बांधत. स्टाॅल आणि अप्पर स्टाॅलच्या पब्लिकला काय कळतंय, असं मानणारा अथवा असा गैरसमज असणारा एक वर्ग होता. पण त्यांच्याकडे पहा कशाला? (Memories of Stall and Balcony)
फर्स्ट रनचा चित्रपट प्रदर्शित करणार्या न्यू एक्सलसियर, मेट्रोपासून मिनर्व्हा- नाॅव्हेल्टी- सुपर वगैरे दक्षिण मुंबईतील जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटरचा स्टाॅल हा असाच भन्नाट सिनेमावेड्या पब्लिकने खचाखच भरलेला. या स्टाॅलच्या तिकिटाची आगाऊ तिकीट विक्री कुठेच नाही. सगळा मामला करंट बुकिंगचा. शो मॅटीनीचा असो अथवा नियमित, अनेकदा एक तास अगोदर लाईन लावण्याचा अलिखित नियमच होता जणू.
पूर्वीच्या मेट्रो थिएटरची स्टाॅलची पहिल्या चार रांगांची तिकिटे मरीन लाईन्सकडे जाण्याच्या मार्गावर मागील बाजूस मिळत. राज कपूरचा सर्वाधिक तरुण चित्रपट ‘बाॅबी’ (१९७३) च्या वेळेस मेट्रोत स्टाॅलचे तिकीट दोन रुपये वीस पैसे या दरात पाहिल्याचे आठवतेय. आम्हा त्या काळातील चित्रपटव्यसनींना आपण कोणता चित्रपट कोणत्या थिएटरमध्ये एन्जाॅय केला, तेव्हा तिकीट दर काय होते हे सगळे तपशील मनात कोरुन ठेवण्याची ‘फिल्मी’ सवय होती. (Memories of Stall and Balcony)
जवळपास सर्वच सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये ही स्टाॅलच्या तिकिटांच्या विक्रीची पध्दत ‘एका बाजूला अथवा अगदी साईडला’ अशी वेगळी का, याचा कधीच कोणी विचार केला नाही आणि आम्ही पब्लिकनेही या वेगळेपणाची कधी कसलीच तक्रार केली नाही. अॅडव्हान्स अप्पर स्टाॅल आणि बाल्कनीचे (काही ठिकाणी ड्रेस सर्कल, तर कुठे बाॅक्स असे.) तिकीट बुकींगलाच पिक्चर हाऊसफुल्ल असेल तर, स्टाॅलचे ऐन वेळेस मिळणारे तिकीट मात्र हुकमी असे. पण अप्पर स्टाॅलचा पब्लिक निदान कधीतरी स्टाॅलमध्ये येई, पण बाल्कनीच्या रसिकांची स्टाॅलमध्ये बसून चित्रपट पाहण्याची अजिबातच मानसिक तयारी नसे. त्याला ते डाऊन मार्केट वाटे. अथवा छे, छे त्या स्टाॅलच्या पब्लिकसोबत चित्रपट पाहायचा? त्यापेक्षा आपण ब्लॅकमार्केटमध्ये तिकीट घेऊन चित्रपट पाहू, याची त्याने घरुन निघतानाच मानसिक तयारी केलेली असे.
स्टाॅलच्या पब्लिकची एकूणच संस्कृती वेगळीच हे एव्हाना तुमच्याही लक्षात आले असेलच. याच स्टाॅल व अप्पर स्टाॅलच्या पब्लिकने सिनेमाचा इतिहास घडवला. पण त्यांचे महत्व अधोरेखित करीत तो लिहिला गेला नाही. आपल्याकडे ‘चित्रपट प्रेक्षक संस्कृती’वर फारसा फोकस पडला नाही. आजही पडत नाही. चित्रपट कसा पाहावा, हे आम्हा स्टाॅल/ अप्पर स्टाॅलच्या पब्लिकला कधीच सांगावे लागले नाही. (Memories of Stall and Balcony)
“कौन है वो माई का लाल, जिसने मेरे सोमू पे हाथ उठाया….” असे अमिताभ बच्चन म्हणजेच पडद्यावरचा विकी चित्कारताच पहिली हुकमी जोरदार टाळी स्टाॅल/अप्पर स्टाॅलमध्ये पडली आणि मग बाल्कनीवाल्यांनी त्या टाळ्यांच्या गजरात आपल्याही टाळ्या मिसळल्या. सिनेमा अर्थातच ‘नमकहराम’. अमिताभ बच्चन बराच काळ याच आम्हा स्टाॅल व अप्पर स्टाॅलच्या पब्लिकचा आवडता सूडनायक होता. हेच पब्लिक स्टार/ सुपर स्टार घडवतं अथवा नाकारतं. (Memories of Stall and Balcony)
राजेश खन्नाचे मेहबूब की मेहंदी,जोरु का गुलाम, शहजादा, हमशक्ल, दिल दौलत और दुनिया, राजा रानी, मलिक, छोटी बहू स्टाॅलच्या पब्लिकने नाकारले आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासाची जणू पटकथाच बदलली. या पडझडीत राजेश खन्नाने शर्मिला टागोरसोबत वेगळाच चित्रपट करायचा म्हणून बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ मध्ये भूमिका साकारली. पण हा चित्रपट बाल्कनीच्या प्रगल्भ रसिकांसाठी होता. बाल्कनीचा ऑडियन्स अशा चित्रपटातील कलात्मक मूल्ये व अभिनय यांचं मनापासून कौतुक करतो. पण त्यामुळे चित्रपट धो धो चालत वगैरे नसतो. कारण बाल्कनी भरलेली असली, तरी स्टाॅल व अप्पर स्टाॅल मात्र खाली (म्हणजेच रिकामे) असतील, तर त्याचा उपयोग तो काय हो? (Memories of Stall and Balcony)
वेगळ्या शब्दात आपण याला ‘मास अपिल’ म्हणूया. हाच मास त्या काळात या आपल्या अतिशय आवडत्या स्टार्सचे वृत्तपत्र, मासिके, फिल्मी मॅगझिन असे कुठेही प्रसिद्ध झालेले फोटो कापून त्याचे चक्क कलेक्शन करायचा, फार पूर्वी एक आण्यात (म्हणजेच फक्त सहा पैसे) चित्रपटाच्या गाण्याची मिळणारी पुस्तिका विकत घेऊन जपायचा. मलाही याची विलक्षण आवड होती. पाच पैशाच्या चाॅकलेटमध्ये नखाएवढ्या मिळणार्या स्टार्सच्या फोटोचेही त्या काळात विलक्षण अप्रूप वाटत असे.
आपल्या देशात चित्रपट हे स्वप्नाळू व आशावादी समाजाचे सोपे व स्वस्त मनोरंजन आहे, असं तेव्हा बोलण्यामागे ‘मास अपिल’ हेच कारण आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण पन्नासच्या दशकात छोट्या शहरात तर झालेच, पण मोठ्या शहरातीलही काही सिंगल स्क्रीन थिएटरमधील पडद्याच्या समोरच्या बाजूस चक्क ताडपत्री असत. अर्थात त्या काळातील प्रेक्षक हा चक्क खाली बसून चित्रपट एन्जॉय करे. त्यावरूनच ‘पिटातला पब्लिक’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. कालांतराने त्याजागी खुर्च्या आल्या, पण ‘स्टाॅलची खुर्ची’ कायमच डळमळीत. कुठे हात तुटलाय, तर कुठे फाटलेली. पण याचा कसलाही विचार न करता अथवा तक्रार न करता चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्यांनी पडद्यावर काय दिसतेय याला महत्व दिले. चित्रपट हा अशा कोणत्याही गोष्टीपेक्षाही मोठाच आहे असंच मनोमन मानलं.
============
हे देखील वाचा – अप्सरा थिएटर: या चित्रपटाच्या प्रीमिअरला चक्क कॉलेजच्या मुलांना आमंत्रित केलं होतं
============
हिंदीत मनमोहन देसाई, तर मराठीत दादा कोंडके यांनी हाच मास अपिल आपला खरा प्रेक्षकवर्ग आहे असं मानून आपल्या मनोरंजनाचा फोकस कायम ठेवला. हे पब्लिक नेमकं काय व कसं पसंत करताहेत त्यानुसारच त्यांनी आपल्या चित्रपटाची मांडणी/ बांधणी/ हाताळणी ठेवली. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असेही कौतुकाने म्हणायला काहीच हरकत नाही.
काही चित्रपट समिक्षकांनी मात्र मनजी अथवा दादांच्या चित्रपटाना दर्जाच नाही, असा कायमच टीकेचा सूर लावला. त्यांनी पडद्यावर काय दिसतेय याची समिक्षा केली वा चिरफाड केली. पण यांचे चित्रपट डोक्यात वा डोक्यावर घेणाऱ्यांनी मात्र याच पडद्यावरील महामनोरंजनाने आपले दुःख, तणाव विसरायला लावले याला महत्त्व दिले आणि म्हणूनच या दोघांचेही अधिकाधिक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
काळाच्या ओघात स्टाॅलचा पब्लिक आणि मुठीत तिकीट पकडण्याचा संघर्ष या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. पण कधी काळी ज्यांनी असा अथवा अशाप्रकारचा अनुभव घेतलाय ते मात्र एव्हाना त्या दिवसांच्या आठवणीत सहज रमले असतील. होय ना?