तब्बल दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून बनले ‘हे’ अजरामर प्रार्थना गीत!
कलावंताची प्रतिभा कधी रुसेल आणि कधी जागृत होईल याचा काही नेम नसतो. त्यामुळे बऱ्याचदा एखादी कलाकृती साकार होण्यासाठी काही क्षणांपासून कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो. गीतकार अभिलाष यांना एका गाण्यासाठी असेच तरसावे लागले. तब्बल दीड ते दोन महिना रोज एकाच सिच्युएशन वरील गाणे लिहीत होते. पण त्यांना हवे तसे शब्द सापडत नव्हते. अखेर दोन महिन्याच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर त्यांच्या मनासारखे गाणे तयार झाले. (Lyricist Abhilash)
आज तीस पस्तीस वर्षांनंतर देखील हे गाणे भारतातील अनेक शाळा व महाविद्यालयांमधून प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. कोणते होते हे गीत? काय होता हा किस्सा? हा किस्सा सांगण्यापूर्वी गीतकार अभिलाष यांच्याबाबत थोडीशी माहिती घेणे गरजेचे आहे.
अत्यंत प्रतिभावान पण कमनशीबी गीतकार असे त्यांचे वर्णन करावे लागेल. गीतकार अभिलाष यांचे खरे नाव होते ओम प्रकाश. १३ मार्च १९४६ चा जन्म. दिल्लीचे रहिवासी. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासूनच त्यांनी काव्यलेखन, गजल लेखनाचा प्रारंभ केला. गीतकार साहिर लुधियानवी यांच्या काव्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
एकदा दिल्लीत एका मुशायरामध्ये त्यांनी साहीर साहेबांना आपल्या कवितांची वही दाखवली. साहीर यांनी त्यांच्या या शायरीचे कौतुक केले आणि त्यांना आणखी मेहनत करण्याचा आणि भरपूर वाचन करण्याचा सल्ला दिला . गीतकार अभिलाष यांनी मग उर्दू हिंदी साहित्य वाचायचा सपाटाच लावला. साहीर यांनी त्यांना सल्ला दिला होता “जादा पढो काम लिखो” त्याप्रमाणे त्याने सर्व साहित्य बारकाईने वाचायला सुरुवात केली. (Lyricist Abhilash)
काही वर्षानंतर ते मुंबईला आले. त्यांनी साहीर यांची भेट घेतली. काही निर्मात्यांची ओळख करून दिली. पण मुंबईचा संघर्ष मोठा होता. तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो तसा त्यांच्या वाट्याला आला. साहीर यांनी सांगितले, “माझ्यामुळे तुम्हाला पहिले काम नक्की मिळेल, पण नंतर मात्र तुमच्या कर्तुत्वाने तुम्हाला पुढे जावे लागेल.”
मुंबईत त्यांनी गीत लेखनासाठी ‘अभिलाष’ हे नाव घेतले. गीतकार अभिलाष यांना पहिला ब्रेक के महावीर यांनी दिला. ही गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती. त्यांनी सलील चौधरींसोबत काम केले. १९७५ साली ‘रफ्तार’ या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे गाणे होते ‘संसार है एक नदिया सुख दुख दो किनारे है..’ गाणे गाजले, पण चित्रपट फारसा न चालल्यामुळे अभिलाष यांचा संघर्ष चालूच राहिला. (Lyricist Abhilash)
१९८४ साली त्यांना एन. चंद्रा यांनी ‘अंकुश’ या चित्रपटातील गाणी लिहिण्यासाठी बोलावले. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. तसेच नाना पाटेकर यांचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. यातील बाकी गाणी लिहिली फक्त एक प्रार्थनागीत राहिले होते. एन चंद्रा यांनी सिच्युएशन सांगितली. या गाण्याने मात्र अभिलाष यांना खूप तरसवले. ते जंग जंग पछाडले.
रोज तीन-चार गाणी लिहून म्युझिक रूम मध्ये जात असत. तेथे नाना पाटेकर ,संगीतकार कुलवंत सिंग तसेच दिग्दर्शक एन चंद्रा उपस्थित असायचे. त्यांना काही केल्या अभिलाष यांनी लिहून आणलेले गाणे पसंत पडत नव्हते. जवळ जवळपास दोन महिने दीड-दोनशे गाणी लिहिल्यानंतर शेवटी गीतकार अभिलाष कंटाळले. आणि हात जोडून त्यांना विनंती केली “कृपया आपण हे प्रार्थना गीत दुसऱ्या कोणाकडून तरी लिहून घ्या. मला आता जमणार नाही. शिवाय आता माझा आत्मविश्वास देखील कमी होत चालला आहे”. असे म्हणून ते उदास मनाने स्टुडीओ बाहेर पडले. ते स्वत: वरच चिडले होते. का साजेसे शब्द सुचत नाहीत? का जमत नाही? (Lyricist Abhilash)
संगीतकार कुलवंत सिंग त्यांच्या पाठोपाठ बाहेर आले. त्यांनी गाडीत अभिलाष यांना सांगितले, “अरे यार अभिलाष, तुम अपना विश्वास क्यू खो रहे हो? तुम्हारी काबिलीयत को मै जानता हूं. बहुत अच्छी है . तुम्हारी शब्दो में ‘शक्ती’ है. ‘मन’ मे दुबारा ‘विश्वास’ पैदा करो और गीत लिखो.”
अभिलाष संगीतकार कुलवंतचा प्रत्येक शब्द ऐकत होते. त्याच वेळेला त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. खिशातून डायरी काढली. आत्ता संगीतकाराने सांगितलेल्या शब्दातूनच त्यांना प्रार्थना गीताच्या ओळी सुचल्या! “इतनी शक्ती हमे दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना…” त्यांनी लगेच त्या ओळी कुलवंत सिंगला सांगितल्या. कुलवंतला खूपच आवडल्या. (Lyricist Abhilash)
========
हे देखील वाचा – …यामुळे बिग बींनी बस स्टॉपवर असहाय्य अवस्थेत असलेल्या भारत भूषण यांना दिली नाही लिफ्ट
========
कुलवंत यांनी गाडी वळवली आणि परत म्युझिक रूमकडे नेली. एन चंद्रा आणि नाना पाटेकर ही मंडळी तिथे बसली होती. त्यांनाही या ओळी आवडल्या. सर्वांनी अभिलाषचे कौतुक केले आणि “हेच तर आपल्याला हवे होते” असे म्हणत लवकर गाणे पूर्ण करायला सांगितले. त्या रात्रीच अभिलाश ते संपूर्ण गाणे लिहून काढले. जवळपास दोन महिन्यांपासून चाललेली तळमळ, संघर्ष अखेर संपला. प्रतिभा पुन्हा जागृत झाली. ‘अंकुश’ चित्रपटातील हे प्रार्थना गीत पुष्पा पागधरे, सुषमा श्रेष्ठ, मुरलीधर रोडे यांनी गायले.
प्रार्थना गीत म्हणून भारतातील अनेक शाळा, कॉलेज मधून हे गीत आजही मोठ्या भक्ती भावाने गायले जाते. २७ सप्टेंबर २००० या दिवशी अभिलाष यांचे निधन झाले.