ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
तिकडे केके…. आता इकडे कोण???
झालं! पुन्हा एकदा भरत जाधव यांना पालिकेच्या आयुक्तांना फोन करावा लागला! पुन्हा ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग चालू असताना प्रेक्षकांना त्याचा आवाज नीट ऐकू येईना, त्यात एसीही बंद होता. प्रयोग थांबवून भरतने तिथल्या व्यवस्थापकांना फोन लावला आणि जोवर या गोष्टी ठीक होत नाहीत तोवर प्रयोग थांबवत असल्याचं सांगितलं. प्रयोग तब्बल दीड तास थांबला. (Drama Theatre in Maharashtra)
आता हे कुठं झालं.. कधी झालं.. याचे तपशील इथे देत नाही. कारण ते फार महत्त्वाचं नाही. आज तिकडे झालं, उद्या तुमच्या गावात होईल. तुमच्या गावात असा प्रकार यापूर्वीही झाला असेल. त्यानंतर ते आपणही विसरतो आणि तो कलाकारही विसरुन जातो. कलाकाराने विसरणं स्वाभाविक आहे. कारण, त्याचं काम थिएटर नीट करणं किंवा ते नीट आहे की नाही पाहणं हे नाहीच आहे. त्याचं काम आहे आपलं नाटक पाहायला आलेल्या रसिकाला नाटकाचा उत्तम अनुभव देणं. त्यात तो कुठे कमी पडत असेल, तर त्याची जबाबदारी त्याने घ्यावी. पण थिएटरमध्ये फॅन नाहीत, एसी नाही, साउंड नीट नाही म्हणून त्याने त्याचा पाठपुरावा करणं हे अपेक्षित नाहीये.
पुन्हा पुन्हा तेच तेच बोलूनही आपल्याला आता काहीच फरक पडेनासा झाला आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी गत मराठी नाट्यगृहांची झाली आहे. वारंवार विनंत्या करून.. वारंवार याबद्दल सोशल मीडियावर कलाकारांनी आवाज उठवूनही त्याचा काहीच फरक संबंधित पालिकांना पडेना झाला आहे. प्रशांत दामले, निर्मिती सावंत, भरत जाधव, सुमीत राघवन, आस्ताद काळे, विशाखा सुभेदार, वैभव मांगले यांसह बहुतेक सर्वच नाट्यकलावंतांनी वेगवेगळ्या प्रकारे नाट्यगृह व्यवस्थापनाला सांगूनही काहीच फरक पडला नाहीये. त्यामुळे आता मराठी नाट्यसृष्टीचा तारणहार अस्तित्वात आहे की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांची अवस्था फार बिकट झाली आहे. भली मोठी दर्शनीय थिएटर्स बांधून झाली आहेत. पण कुठे वातानुकुलन यंत्रणेची बोंब आहे, तर कुठे प्रेक्षागृहातल्या खुर्च्यांची. कुठे रंगमंचच अपुरा आहे, तर कुठे नेपथ्य व्यवस्था नीट नाही. या सगळ्यावर कडी म्हणून की काय पण महाराष्ट्रातल्या ९० टक्के नाट्यगृहांमधली स्वच्छतागृहं ही संशोधनाचा विषय असतात. पावसाळा आला की बांधलेल्या जवळपास सर्वच नाट्यगृहांमध्ये ओल येतं. अनेक ठिकाणी पाणी गळती लागलेली असते. (Drama Theatre in Maharashtra)
सर्वत्र फार उदास स्थिती आहे. हे कमी म्हणून की काय मुंबई-पुण्यात जी काही चांगली म्हणता येतील अशी नाट्यगृहं आहेत तिथे राजकीय मेळाव्यांनी आधीच रुमाल टाकून ठेवलेला असतो. ही नाट्यगृहं या राजकीय पक्षांनी घेतलेली असतात तीन तासांसाठी.. पण त्याचे सहा तास झाले तरी कुणीच कुणाला चला उठा म्हणत नाही. राजकीय पक्षासोबत पंगा घ्यायला नाट्यगृहं व्यवस्थापन तयार नसतं कारण त्यांच्या नाड्या पालिकेच्या हातात असतात.
अनेकदा नाटकाचा ठरलेला प्रयोग या राजकीय मेळाव्यांमुळे रद्द करावा लागला आहे, तर बऱ्याचदा या प्रयोगासाठी कलावंतांना आणि पर्यायाने नाट्यरसिकांना नाट्यगृहाबाहेर तिष्ठत उभं राहावं लागलं आहे. हे कमी म्हणून की काय, या मेळाव्यानंतर तिथे होणारा कचरा, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या या सगळ्याची स्वच्छता या कर्मचाऱ्यांना करावी लागते. शिवाय या दरम्यान खुर्च्या तुटल्या किंवा त्याच्यावरचं रेग्झिन फाटलं तर मग काय बोलायची सोय नाही. हे इतकं किळसवाणं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. यातून ठाण्याचं गडकरी रंगायतन सुटलेलं नाही की, पुण्याचं बालगंधर्व. (Drama Theatre in Maharashtra)
नाटक बघायला आलेला प्रेक्षक सर्वसाधारणपणे चारशे ते पाचशे रुपयाचं तिकीट काढून आलेला असतो. नाटक बघायला येताना तो कधीच एकटा येत नाही. किमान दोन आणि जास्तीत जास्त चार व्यक्ती सोबत असतातच. त्यामुळे तो खर्च साधारण एक ते दोन हजारांवर जातो. आता केवळ तीन तासांसाठी जी व्यक्ती दोनेक हजार खर्च करायची तयारी दर्शवते तिला आपण नक्की काय अनुभव देणार आहोत, याचा विचार नाट्यगृह व्यवस्थापनानं करायची वेळ आली आहे. (Drama Theatre in Maharashtra)
प्रश्न केवळ नाट्यानुभवाचा नाही कारण तो अनुभव चोख असण्यासाठी कलावंत, प्रकाशयोजनाकार आणि त्या त्या नाट्यप्रयोगाशी संबंधित असलेली मंडळी झटत असतातच. त्यांना मधल्यामध्ये त्रास झाला, तर तो प्रेक्षकांत वाजणाऱ्या मोबाईल्सचा असतो. पण कैक वर्षं वारंवार सूचना केल्यानंतर आता हे वाजणारे मोबाईल कमी झाले आहेत. एकदाच कुठे फोन वाजलाच तर आजूबाजूची मंडळी त्याला गप्प करू लागली आहेत. ही बाब झाली प्रेक्षकांत येणाऱ्या शहाणपणाची. पण नाट्यगृहांचं काय करायचं?
गेली कित्येक वर्षं वारंवार सांगूनही नाट्यगृहं काही सुधारायचं नाव घेताना दिसत नाहीत. नाटक बघायला येणाऱ्या रसिकाला किमान सुविधा देण्यातही ती अयशस्वी होताना दिसतायत. आता किमान सुविधा म्हणजे काय, असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. किमान सुविधा म्हणजे, प्रयोगाला किमान तीनशे रुपये खर्चून आलेल्या व्यक्तीला आधी गाडी पार्क करायला जागा मिळायला हवी. मग तो थिएटरमध्ये आल्यावर त्याला बसायला योग्य खुर्ची असणं, कोणत्याही अतिरिक्त आवाजाशिवाय वातानुकुलन यंत्रणा चालू असणं, रंगमंचावर चालू असलेल्या नाटकाचा आवाज प्रेक्षागृहातल्या शेवटच्या प्रेक्षकापर्यंत येईल अशी ध्वनी यंत्रणा तिथे असणं, मध्यंतरात या रसिकांसाठी स्वच्छ आणि नेटकी स्वच्छतागृहं उपलब्ध असणं, नाटक चालू असताना विजप्रवाह खंडित झाला, तर जनरेटरसारखी सुविधा असणं, एकूण नाट्यगृहं स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेलं असणं हेच सर्वात महत्वाचं आहे. पण या गोष्टी द्यायलाही प्रशासन कमी पडतं.
प्रशांत दामले यांनीही औरंगाबादच्या थिएटरवर रंगमंच झाडण्यासाठी झाडू हातात घेतला होता. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग चालू असताना वैभव मांगले चक्कर येऊन मंचावर कोसळले होते.
खरंतर आपलं काहीच होऊ शकत नाही. कोट्यावधी रुपये खर्चून पुन्हा नव्याने तयार केलेल्या दिनानाथ नाट्यगृहाला जर त्याच्या पुढच्याच वर्षी गळती लागणार असेल, तर त्याला कोण काय बोलणार? चांगलं उत्तम बांधकाम असलेलं बालगंधर्व थिएटर आहे म्हणता म्हणता ते पाडायच्या गोष्टी होऊ लागतात.. पण एकदा ते थिएटर पाडल्यावर पुढे काय, याचा निश्चित आराखडा कुणाकडे नाही. थिएटर पाडल्यानंतर नवं थिएटर पुढच्या अमुक दिवसांत उभं राहील याची गॅरंटी कुणी घ्यायला तयार नाही. रत्नागिरीमध्ये असलेल्या वीर सावरकर नाट्यगृहात तर एसीचाच पत्ता नाहीये. तरीही लोक तिथे येतात नाटकाचा आस्वाद घेतात.. पण ते पुरेसं नाही. (Drama Theatre in Maharashtra)
सर्वसाधारणपणे शहरातली नाट्यगृहं ही त्या त्या शहराची सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखली जातात. ही थिएटर्स जेवढी सुसज्ज तेवढा इथला समाज हा संवेदनशील आणि कलासक्त आहे, असं मानलं जातं. फार लांब जायची गरज नाही. कधीतरी जुहूच्या पृथ्वी थिएटरला भेट देऊन या. तिथे येणारा क्राऊड.. तिथे सादर होणारी नाटकं.. ती नाटकं सादर कऱणारे कलाकार.. या सगळ्यांनाच या थिएटरने सकारात्मक ऊर्जा वेळोवेळी दिली आहे. या उर्जेनेच या सर्वांची आयुष्यं उजळून निघाली आहेत. असं प्रत्येक थिएटरचं कधी होणार?
इकडे सांस्कृतिक कार्य संचालनालय तोंडात बोळा कोंबल्याप्रमाणे मूग गिळून गप्प आहे. अर्थात त्यात नवीन काही नाही. कारण, ते वर्षानुवर्षं तसंच आहे. आपल्या हद्दीत येणारी थिएटर्स सुसज्ज करावीत असं पालिका प्रशासनाला कधीच वाटत नाही. कारण, नाट्यकलेबद्दल अपार आदर आणि माहिती असलेली मंडळीच तिथे नाहीत. बरं, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही अशात त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजाला बोलवावं किंवा त्याचं मत घ्यावं असं म्हणताात. पण तिथेही आपल्यात सग्यासोयऱ्याला बोलावून त्याचे खिसे भरण्यात धन्यता मानणारी जमात आता पुरती फोफावून बोकाळली आहे. त्याला आता काय करणार? (Drama Theatre in Maharashtra)
========
हे देखील वाचा – मराठी चित्रपट बदलतोय…चित्रपटात होतायत नवनवीन प्रयोग
=======
फक्त पुरस्कार देऊन.. नाट्यस्पर्धा घेऊन आता काही होईल असं वाटत नाही. आता वटहुकूम जारी करण्याची गरज आहे. सक्ती आली की पाळली जाते हे कोरोनाने दाखवून दिलं आहे. नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी असाच आदेश वजा वटहुकूम गरजेचा आहे. जो या नाट्यगृहांना संरक्षण देईल. त्यांचं शोषण थांबवून त्यांना पुष्ट करेल. असं झालं तरच इथे होणारी नाट्यकला प्रसन्न होईल.. खेळेल, बागडेल.
बरं बाय द वे,
तो केके हा गायक कोलकात्यात गेला हे कळलं असेलच तुम्हाला. तुम्ही हळहळलातही त्यावेळी. पण तो कशाने गेला हे माहितीये ना तुम्हाला? त्या थिएटरमध्येही एसी नव्हता. तिथल्या थिएटरची व्यवस्थाही चोख नव्हती. तिथेही गरजेपेक्षा जास्त मंडळी आत येऊन बसली होती. त्याचा त्याला त्रास झाला असं प्राथमिक निष्कर्षात म्हटलं गेलं होतं.
आपल्या नाट्यगृहांची अवस्था फार वेगळी नाहीये. म्हणूनच ती सुधारायला हवी की, आपणही असाच एखादा बळी जायची वाट बघतोय?