दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा इंग्रजी चित्रपटांचे थिएटर असणाऱ्या मेट्रो थिएटरमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होतो…
साठ आणि सत्तरच्या दशकातील ‘आमचे गिरगाव’ काही वेगळेच होते. आता उरल्यात त्या फक्त जुन्या गिरगाव आठवणी. गिरगाववर ठसठशीत असा मराठी मध्यमवर्गीय माणसाचा कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव होता. ‘आपलं गिरगाव’ म्हणजे धोबीतलाव ते गावदेवी असं मानलं जात असे. इथे मराठमोळ्या सण संस्कृतीपासून ते महाराष्ट्रीय पदार्थांची मनसोक्त मनमुराद रेलचेल होती. (Memories of Metro theatre)
म्हणजे बरेच काही होते. तो एक स्वतंत्र विषय आहे. त्यातच मराठी चित्रपटांचे हक्काचे असे मॅजेस्टिक थिएटर अगदी जवळच सेन्ट्रल, राॅक्सी आणि ऑपेरा हाऊस अशी थिएटर्स, तर नाटकासाठी साहित्य संघ मंदिर होते. पण धोबीतलावच्या नाक्यावरच्या मेट्रो थिएटरबाबत मात्र का कोण जाणे त्या काळात काहीसा परकेपणा वाटे. तेथून जाताना या थिएटरचा साहेबी थाटच दिपवून टाकत असे. मग ते तेथून रस्त्याने चालत जाणं असो अथवा घोडागाडी, ॲम्बेसेडर टॅक्सी अथवा डबल डेकर बस असो (त्या काळातील ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. फार पूर्वी मुंबईत ट्रामही होती. पण माझ्या अगदी लहानपणी ती बंद झाल्याने आजोबांकडून त्याच्या केवळ आठवणी ऐकायला मिळत.) (Memories of Metro theatre)
मेट्रो थिएटरचा स्पाॅट अतिशय परफेक्ट असा. एकीकडे गिरगावातून तर दुसरीकडून काळबादेवीकडून येणारे गजबजलेल्या वस्तीचे रस्ते, तर क्राॅफर्ड मार्केटही अगदी जवळ. एका बाजूला मरीन लाईन्सची श्रीमंती वस्ती आहेच. सिनेमा थिएटर असावे तर अशा जागी. मेट्रोत त्या काळात प्रामुख्याने इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत असल्यानेही (आणि तो चित्रपट आपला नाही, आपल्याला समजणार नाही अशी मध्यमवर्गीय मानसिकता असल्याने) ते परके वाटे.
आम्हा गिरगावकरांना मेट्रो थिएटर आपलेसे वाटले ते १९६९ साली उदय चित्र या बॅनरखाली निर्माण झालेला निर्माता आणि दिग्दर्शक सदाशिव जे. रावकवी यांचा ‘अन्नपूर्णा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा!! त्यातही काही विशेष गोष्टी आहेत. खरंतर हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात ‘अन्न आणि अन्न ‘ या नावाने प्रदर्शित झाला होता, पण त्याला अजिबात प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचे पुन्हा संकलन करण्यात आले आणि चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच सुलोचनादीदींवर चित्रीत झालेले ‘तुझ्या कांतीसम रक्त पताका’ हे गाणं ठेवून काही दृश्यात काटछाट करत मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. (Memories of Metro theatre)
नेमक्या त्याच वेळी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक चित्रपटगृहात वर्षभरात किमान चार आठवडे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा असा नियम अंमलात आणला गेला आणि मेट्रो थिएटरने त्याची पूर्तता केली ती ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटाने. त्यामुळे आलिशान आणि साहेबी थाट असलेल्या मेट्रो थिएटरमध्ये पहिल्यांदा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि आम्हा गिरगावकरांचे मराठी मन विलक्षण आनंदले. आम्ही गिरगावकर आणि मेट्रो थिएटर यातील अंतर कमी होण्यातील हे पहिले महत्त्वाचे पाऊल ठरले.
‘अन्नपूर्णा’ हा त्या काळातील हा मल्टी स्टार कास्ट मराठी चित्रपट. सुलोचना, चंद्रकांत, रमेश देव, सीमा, डाॅ. काशिनाथ घाणेकर, श्रीकांत मोघे, विवेक, चंद्रकांत गोखले, शरद तळवळकर, मा. सचिन असे मराठी समाजात मानाचे स्थान असलेले हे कलाकार एकाच चित्रपटात हे विशेष होते. (Memories of Metro theatre)
असे हे मेट्रो थिएटर, मुंबईतील जुन्या सिंगल स्क्रीन अर्थात एकपडदा थिएटरपैकी एक वातानुकूलित थिएटर (पूर्वी अशी एअर कंडीशन्ड थिएटर अगदी मोजकीच होती म्हणून असा उल्लेख). हे थिएटर इंग्रजांच्या काळात ८ जून १९३८ रोजी सुरु झाले. हाॅलीवूडच्या Metro Goldwyn Mayer (MGM ) या संस्थेने १९३५ साली कोलकाता येथे मेट्रो थिएटरची उभारणी केल्यावर १९३८ साली मुंबईत मेट्रो थिएटर स्थापन केले. याचे उद्घाटन म्युझिकल काॅमेडी ब्राॅडवे मेलडीने झाले. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमधील ख्यातनाम आर्टिटेक्चर थाॅमस व्हाईट लॅम्ब यांनी या वस्तूची रचना केली आणि त्यांच्या जोडीला आर्ट डेको डिझाईनचे (मुंबई) अतुलकुमार होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी या थिएटरची वास्तू रचना आदर्श म्हणून ओळखली जाते. यावरुन या थिएटरचे वैभव आणि वैशिष्ट्य लक्षात येते. (Memories of Metro theatre)
त्या काळातील अगदी प्रत्येक चित्रपटगृहाला आपलं स्वतःचे असे व्यक्तीमत्व असे, ओळख असे. इतकेच नव्हे तर, अनेक चित्रपट रसिकांचे स्वतःचं असं आवडतं चित्रपटगृह असे. कळत नकळतपणे एखाद्या चित्रपटगृहाशी भावनिक नाते निर्माण होई. मी मेट्रो थिएटरमध्ये फार पूर्वी प्रेक्षक म्हणून आणि ऐशीच्या दशकापासून एक समिक्षक आणि विश्लेषक म्हणून अनेक चित्रपट पाहिले, तरी मला कायमच तेथे आपण उच्चमध्यमवर्गींच्या गराड्यात परके आहोत असेच वाटत आले. कदाचित हा अगदी लहानपणापासून मेट्रोकडे ‘ते तर मोठ्या लोकांचे थिएटर’ असं मनावर ठसल्याने होत असेल.
जस जसं मला चित्रपटांचे आकर्षण वाटू लागलं तस तसं लक्षात आलं की, चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित “जल बिन मछली नृत्य बिन बिजली” हा चित्रपट मेट्रो थिएटरमध्ये रिलीज झाला असून, त्याचे डेकोरेशन आवर्जून पाहण्यासारखे आहे याबद्दल कानावर आलं. कालांतराने मला समजलं की, आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कोणते मुख्य थिएटर अगदी योग्य आहे, तेथे डेकोरेशन कशा पद्धतीने करता येईल, तेथे रसिकांना साधारण कोणत्या स्वरुपाचे चित्रपट आवडतात, याबाबत खुद्द व्ही शांताराम अतिशय जागरुक असत. त्यांचे आत्मचरित्र ‘शांतारामा’ वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते आणि त्या काळातील चित्रपटाने झपाटलेली व्यक्तिमत्वं आपल्या चित्रपटाचा कसा बहुस्तरीय विचार करत हेही लक्षात येतं. जुन्या काळातील अशा ‘सिनेमामय व्यक्तिमत्वां’कडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. असो. (Memories of Metro theatre)
मी मेट्रोत पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित बाॅबी ( १९७३). त्या काळात ‘अबब’ म्हणावी अशी ‘बाॅबी’ची विलक्षण ‘क्रेझ’ होती. आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डिंपल कापडियाने सुपरस्टार राजेश खन्नाशी अनपेक्षितपणे लग्न केलं, हा त्याकाळात जबरा फिल्मी धक्काच होता. (हे लग्न १९७३ ला मार्च महिन्यात झाले आणि त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी ‘बाॅबी’ झळकला आणि पहिल्याच शोपासून त्याला रसिकांनी उत्फूर्त रिस्पॉन्स दिला.)
त्याकाळात गर्दीत सुरु असलेला बहुचर्चित चित्रपट आपणही सहकुटुंब पाहायला हवा अशी एक सर्वसाधारण सामाजिक मानसिकता होती. मेट्रोत ‘बाॅबी’च्या वेळी स्टाॅलचे तिकीट दर दोन रुपये वीस पैसे (ते थिएटरच्या मागच्या बाजूला करंट बुकिंगला म्हणजे शोच्या वेळीच मिळे आणि ते घेऊन थिएटरमध्ये जायचे अशी रचना होती. स्टाॅलच्या सुरुवातीच्या फक्त चार रांगा होत्या.) अप्पर स्टाॅलचे तिकीट दर तीन रुपये तीस पैसे, बाल्कनी चार रुपये चाळीस पैसे आणि ड्रेस सर्कल पाच रुपये पन्नास पैसे असे होते. त्या काळात ‘सिनेमाचे तिकीट दर’ हादेखील एक चाळीच्या खाली अथवा नाक्यावरचा गप्पांचा विषय असे. मेट्रोचे एक विशेष मुंबईसह देशात सगळीकडे शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला तरी मेट्रोत पहिल्यापासूनच गुरुवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागला. (Memories of Metro theatre)
हळूहळू मेट्रो थिएटर ओळखीचे होत गेले. यश चोप्रा दिग्दर्शित कभी कभी, सेतूमाधवनचा ज्युली , मोहनकुमार दिग्दर्शित अवतार वगैरे चित्रपट प्रदर्शित होत जात होते आणि मी ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीला मिडियात आलो. १९८४ साली भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते तेव्हा मेट्रो त्याचे प्रमुख केंद्र होते आणि त्या काळात १० जानेवारी ते १९ जानेवारी असे वीस दिवस या इफीचे आयोजन असे. साहजिकच सलग वीस दिवस मेट्रोला जाऊ लागलो आणि मेट्रोशी जवळीक वाढली.
या इफीचा उदघाटनाचा चित्रपट मृणाल सेन दिग्दर्शित ‘खंडहर’ होता. पण माझ्यासाठी जास्त आकर्षण होते ते अनेक बड्या स्टार्सची मंदियाळी. असा देखणा आणि ग्लॅमरस योग मला पहिल्यांदाच येत होता आणि मी हरखून गेलो. पहिल्या दिवसानंतर मात्र समांतर अथवा कलात्मक चित्रपटात भूमिका साकारत असलेले कलाकार, दिग्दर्शक येऊ लागले. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा मुंबईत इफीचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हाही मेट्रो थिएटर हेच मुख्य केंद्र होतं. (Memories of Metro theatre)
दोन्ही वेळा मिडिया सेंटर मेट्रोच्या बाल्कनीतील एका बाजूला होतं. एकेक पायरी चढत जातानाही त्या वास्तूचे मोठेपण जाणवत असे. मी फक्त ‘चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जात राहिलो, असं नाही, तर त्या प्रत्येक थिएटरचे अनुभवही घेतले. मेट्रोत पाऊल टाकताना एका साहेबी थाटाच्या वास्तूत आपण पाऊल टाकतोय हे भान कायमच राहिले.
समीक्षक म्हणून या मेट्रोत विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, बिंदा ठाकरे निर्मित आणि पार्थो घोष दिग्दर्शित ‘अग्निसाक्षी’ असे अनेक चित्रपट पाहिले. या चित्रपटाचे एखाद्या मिनी थिएटरमध्ये आम्हा सिनेपत्रकारांसाठी वेगळे शो न करता आम्हाला फस्ट डे फर्स्ट शोच्या प्रेक्षकांसोबत दाखवले हा अनुभव अगदी वेगळा. (Memories of Metro theatre)
यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’च्या मेट्रोतील प्रीमियर शोचा ‘लाईव्ह’ अनुभव मी आजही विसरु शकत नाही. तेव्हा मध्यंतरामध्ये पडद्यासमोर आलेल्या विनोद खन्ना, ऋषि कपूर आणि श्रीदेवी यांचे अगदी शालीन वागणं आणि वावरणं खूपच ‘इम्प्रेसिव्ह’ होतं. आजही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे.
एस. रामनाथन निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘गंगा जमुना सरस्वती’च्या फस्ट डे फर्स्ट शोमध्ये आम्हा सिनेपत्रकाराना पब्लिकसोबत बसवले तेव्हा त्यांची चित्रपटाबद्दलची निराशा लक्षात आली. मध्यंतरामध्ये आम्हा समीक्षकांना भेटायला आलेल्या मनमोहन देसाईंवरचा तणाव जणू आपल्या या चित्रपटाचे भवितव्य ते जाणून आहेत, असाच होता आणि तसेच घडले; चित्रपट आपटला. मेट्रोत चित्रपट आपटणे म्हणजे केवढी मोठी चर्चा आणि मोठा आवाज काही विचारु नका. (Memories of Metro theatre)
मेट्रोच्या काही विशेष आठवणी सांगायच्या तर, सुनील दत्त निर्मित आणि अमरजित दिग्दर्शित ‘राॅकी’चे मेन थिएटर ‘गंगा’ असले तरी त्याचा भावपूर्ण प्रीमियर मेट्रो थिएटरमध्ये झाला. तेव्हा सुनील दत्त व संजय दत्त यांच्यामधली जागा नर्गिसजीना श्रध्दांजली म्हणून रिकामी ठेवण्यात आली. दुर्दैवाने ३ मे १९८१ रोजी नर्गिसजींचं निधन झालं आणि लगेचच अवघ्या काही दिवसांत ८ मे रोजी ‘राॅकी’ प्रदर्शित झाला. त्याचा मेट्रोतील प्रीमियर भावपूर्ण होता.
सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’साठी मेट्रोचे बाल्कनीचे तिकीट दर पंचवीस रुपये आहेत, ही बातमी एका मराठी वृत्तपत्राने पहिल्या पानावर दिली. चित्रपटाचे तिकीट किती महाग? असा त्या बातमीचा सूर होता. १९९१ सालची ही गोष्ट. तेव्हा मुंबईत मध्यमवर्गीय माणसाला मासिक अडिच हजार रुपये पगार कन्फर्ट झोन होता. (Memories of Metro theatre)
मेट्रोत अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित होत राहिले. त्यातील काही हिट ठरले तर काही फ्लाॅप. मेट्रोत मॅटीनी शोला कायमच नवीन चित्रपट प्रदर्शित होत. काही नावे सांगायची तर, मंथन, तृष्णा, कथा, भूमिका, मनपसंत, यह है जलवा, राम नगरी, फलक, दिल है के मानता नही, इ. तर, जावई विकत घेणे आहे, धाकटी बहिण, बायानो नवरे सांभाळा, हा खेळ सावल्यांचा, सरकारनामा, जबरदस्त, पछाडलेला इत्यादी अनेक मराठी चित्रपट येथे प्रदर्शित झाले.तर राज्यभर विक्रमी गर्दी म्हणूनच विक्रमी यश प्राप्त केलेला ‘माहेरची साडी ‘ हा चित्रपटही विजय कोंडके यांनी येथेच प्रदर्शित केला होता. मेट्रोत आपला चित्रपट प्रदर्शित होणं हे केवढं तरी प्रतिष्ठेचं होतं.
पूर्वीच्या या चौदाशे आसनसंख्या असलेल्या या चित्रपटगृहाच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यात येऊन त्याला कालांतराने मल्टीप्लेक्सचे स्वरुप देण्यात आले. त्यात चार स्क्रीन आहेत. मूळची मजा नाही. पण मूळ मेट्रो सहजी विसरता येत नाही. उच्च दर्जाचे आणि तारांकित फिल असणारे असे जुने मेट्रो होते. तेथील अनेक हिंदी चित्रपटांचे प्रीमियर येथेच रंगले. ‘बाॅबी’चा प्रीमियर तर खूप गाजला. (Memories of Metro theatre)
======
हे देखील वाचा – थिएटरमध्ये तेव्हा पहिल्या रांगेत बसून बघितलेला सिनेमा वेगळा दिसायचा ….
======
मेट्रोने मल्टीप्लेक्स रुप धारण केल्यानंतरच्या दोन आठवणी. एक म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपटाबाबत येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात मीही होतो. ज्या थिएटरमध्ये आपण लहानपणापासून चित्रपट पाहिले त्याच वास्तूत अशी संधी मिळणं मला विलक्षण सुखावणारं, तर दुसरी आठवण, मोनिष बाबरे निर्मित ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या फस्ट लूकचा सोहळा येथेच रंगला आणि मा. भगवानदादांच्या भूमिकेतील मंगेश देसाई लक्षवेधक ठरला…
मेट्रो थिएटर असे अनेक गोष्टींचे साक्षीदार आहे. चित्रपटगृहांमध्ये कोणते चित्रपट यशस्वी ठरले, कोणते फ्लाॅप झाले, यापलीकडेही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असेतच असते. मेट्रोचं तर निश्चित आहे.