कालजयी सावरकर: सर्वसामान्यांना अपरिचित असणारे सावरकरांचे आयुष्य उलगडणारा लघुपट
सामान्यतः लघुपट किंवा माहितीपट बनवताना सर्वात मोठं आव्हान असतं ते सादरीकरणाचं. कारण याचा निश्चित असा कुठलाही ढाचा नसतो. माहितीच्या अगणित भांडारामधून लोकांपर्यत केवळ महत्त्वाची आणि सर्वसमावेशक माहिती पोहोचवण्यासाठी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. ठराविक प्रसंग गोष्टीरूपाने दाखवताना निवेदन आणि गोष्टीरूपाने दाखवण्याजोग्या प्रसंगांचा सुयोग्य मेळ घालणं आवश्यक असतं. शिवाय माहितीपट कंटाळवाणा न होता रंजक व्हायला हवा, याचीही काळजी घ्यावी लागते.
नुकताच प्रदर्शित झालेला ‘कालजयी सावरकर’ (Kaljayi Savarkar) हा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य अवघ्या एका तासात मांडताना त्यांच्या बालपणापासूनचे अनेक महत्त्वाचे प्रसंग यामध्ये मांडण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जे प्रसंग सर्वसामान्यांना माहिती नाहीत असे प्रसंग व त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्व आभाळाएवढं मोठं आहे आणि तेवढंच ते विवादितही. पण इथे लेखक अमोघ पोंक्षे आणि डॉ समीरा गुजर व दिग्दर्शक गोपी कुकडे यांचं विशेष कौतुक करायला हवं. कारण यामध्ये कोणत्याही विवादित मुद्द्यावर टीका अथवा भाष्यही करण्यात आलं नाही. उलट सावरकरांच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे विचार अत्यंत मुद्देसूदपणे आणि प्रभावीपणे मांडले आहेत. मुळात या लघुपटाचा मुख्य उद्देश लोकांपर्यंत सावरकरांचे आयुष्य, त्यांचे विचार पोचवणं हा आहे त्यामुळे विवादित मुद्द्यांकडे वळायचा प्रश्न येत नाही. हा सुज्ञपणा सादरीकरणामध्येही अधोरेखित झाला आहे. (Kaljayi Savarkar)
वाल्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट तर अनेकांनी ऐकली असेल, पण या लघुपटामध्ये अंदमानच्या जेलमध्ये सावरकरांच्या सहवासात राहून सुधारलेल्या एका अत्यंत निष्ठुर अपराध्याची आणि त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलाची गोष्टही दाखवण्यात आली आहे. या अपराध्याची ही गोष्ट अनेकांना माहिती नसेल. पण ती माहिती होणं आवश्यक आहे.
चित्रपट, मालिकांमध्ये प्रेमासाठी त्याग केलेल्या अनेक त्यागमूर्तीं आपण बघितल्या असतील. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात आपल्या दिराच्या शिक्षणासाठी आपले सर्व दागिने विकून लंकेची पार्वती झालेली त्यागमूर्ती वहिनी पाहताना डोळे पाणावतात. लघुपट बघतना तुरुंगाच्या चार भिंतींच्या आत एकटेपणाने जगणं म्हणजे किती मोठी शिक्षा असेल, याची नव्याने प्रचिती येते. (Kaljayi Savarkar)
या लघुपटामध्ये अभिनेता सौरभ गोखले यांनी सावरकरांची भूमिका साकारली आहे. त्याचे स्पष्ट उच्चार आणि चेहऱ्यावरचे हावभाव कौतुकास्पद आहेत. त्याची मेहनत स्पष्टपणे जाणवते. मनोज जोशी यांचं निवेदनही उत्तम. तेजस बर्वे या कलाकाराची भूमिका मुद्दाम इथे उघड करत नाहीये कारण ते एक ‘सरप्राईज पॅकेज’ आहे. सावरकरांच्या आयुष्यावर कलाकृती घडवताना सावकर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा लघुपट बघताना त्याच्याशी संबंधित प्रत्येकाचा सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास ठळकपणे जाणवतो. (Kaljayi Savarkar)
काही प्रसंग बघताना डोळे पाणवतात, तर काही प्रसंग बघताना आजही समाज १९४७ पूर्वीच्याच विचारसरणीत अडकून पडलाय याची जाणीव होते. इतिहासातल्या त्या गोष्टी ज्या शाळा कॉलेजमध्ये कधीही शिकवण्यात येत नाहीत, कोणत्याही चित्रपटातून कधीही अधोरेखित केल्या गेल्या नाहीत त्या गोष्टी या लघुपटातून समजतात. सावरकरांचे विचार काळाच्या खूप पुढे होते, ही गोष्ट लघुपट पाहताना ठळकपणे जाणवते आणि पटतेही! (Kaljayi Savarkar)
==========
हे देखील वाचा – त्या रात्री पाऊस होता: डोळ्यांना जे दिसतं ते सत्य असतंच असं नाही
==========
एकूणच ज्याला खरा इतिहास समजून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हा लघुपट आवर्जून पाहावा. खास करून शाळेतल्या मुलांना तर हा आवर्जून दाखवायलाच हवा. कारण त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी देशभक्त आणि क्रांतिकारकांनी किती मोठा त्याग केला आहे, हे त्यांना समजायला हवं. ही मुलं देशाचं भविष्य आहेत आणि ही मुलंच घडवणार आहेत अभिनव भारत. पण त्यासाठी स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळायलाच हवी, जी या लघुपटातून सहज समजेल.
लघुपट: कालजयी सावरकर
दिग्दर्शक: गोपी कुकडे
लेखक: डॉ समीरा गुजर, अमोघ पोंक्षे
निर्मिती : विवेक समूह, विवेक व्यासपीठ
कलाकार: मनोज जोशी, सौरभ गोखले, तेजस बर्वे आणि इतर
संकलन : समीर अन्नारकर
संकल्पना : दिलीप करंबेळकर
संशोधन सहाय्य: अक्षय जोग