त्या रात्री पाऊस होता: डोळ्यांना जे दिसतं ते सत्य असतंच असं नाही
एक चौकोनी कुटुंब. एकमेकांवर खूप प्रेम करणारे पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं. एका गावात जाऊन स्वतःचा कारखाना चालू करून यशस्वी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या दोघांचं आयुष्य अचानक बदलून जातं. एक राजकीय पुढारी त्यांचा संसार उद्ध्वस्त करतो. आणि बघता बघता नजरेसमोर सारं काही संपून जातं. (Tya Ratri Paus Hota)
एक निर्भीड पत्रकार एका गावामध्ये येतो. गावातील राजकीय पुढाऱ्याचा पर्दाफाश करण्यासाठी, पण त्याच्याकडेच बंदी बनून कैद होतो. आपल्या आईचा पराकोटीचा तिरस्कार करणारा हा पत्रकार आपल्या वडिलांवर मात्र मनापासून प्रेम करत असतो.
एक अनाथ तरुण मुलगी आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारी. ही मुलगी शिकार असते या राजकीय पुढाऱ्याची; शरीर आणि मनाने उद्ध्वस्त झालेली, लहान वयातच बरंच काही झेललेलं असल्यामुळे थोडीशी विक्षिप्त पण मनातून तेवढीच दुःखी.
कोण असतो हा पुढारी? का करतो तो हे सगळं? राजकारणासाठी? नाही… तो हे करतो फक्त स्वतःच्या वासनेसाठी, स्वतःचा अहंकार जपण्यासाठी. अत्यंत स्वार्थी मनोवृत्तीच्या आणि गावामध्ये तसंच राजकारणातही मोठा दबदबा असणाऱ्या या पुढाऱ्याला शह देणं ही सोपी गोष्ट नसतेच मुळी. मग काय करतो तो पत्रकार, ती मुलगी आणि त्या कुटुंबाचं काय होतं? (Tya Ratri Paus Hota)
गायत्री आणि विश्वास,एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं सुशिक्षित आणि सुसंस्कृत जोडपं. अविनाश आणि रावी या मुलांसह सुखाचं आयुष्य जगत असतात. पण यांच्या सुखावर नजर पडते ती गावातला राजकीय पुढारी शिरपतराव यांची. सुरुवातीला शिरपतरावांना देव समजणाऱ्या गायत्री आणि विश्वासला त्यांच्यातल्या सैतानाची जाणीवही होत नाही. पण जेव्हा त्यांचं हे रूप समोर येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घायला हवी. तसंच अनेकदा जे डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं. सत्य खूप भयानक, अकल्पित असू शकतं. त्यामुळे समोर दिसतंय ते सत्य असेलच असं नाही. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा परिस्थिती अशी का आहे, त्याची कारणं काय आहेत हे समजून घेणं आवश्यक असतं. पण विश्वास इथेच चुकतो आणि गायत्री आणि रावीला तिथेच सोडून अविनाशसह निघून जातो. या दोघी काय नरकयातना भोगत असतील याची त्याला आणि अविनाशला कल्पनाच नसते. (Tya Ratri Paus Hota)
अविनाश शिकतो, पत्रकार होतो, तर रावी म्हणजे वाया गेलेली, व्यसनाधीन विक्षिप्त मुलगी. पण तिच्या या विक्षिप्त वागण्याचं कारण असतं, लहान वयात शरीर आणि मनावर झालेले आघात. रावी हा आघात विसरायचा प्रयत्न करत जाते. तिच्या मनात असतं अतीव दुःख, जे कोणालाच दिसत नाही. आपल्या आईचा प्रचंड तिरस्कार करणाऱ्या अविनाश आणि रावीची भेट होते तेव्हा पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेलं असतं. डोक्यावरचं मात्यापित्याचं छप्पर उडालेलं असतं.
ही कथा आहे २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘त्या रात्री पाऊस होता’ या चित्रपटाची. संपूर्ण चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. अविनाश आणि रावीच्या मनातील द्वंद्वाचं रूपक म्हणजे पाऊस. जेव्हा दोघं समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावना प्रखरपणे व्यक्त होतात. एकमेकांचे गैरसमज दूर करताना या भावना कधी मुसळधार पावसाप्रमाणे बरसतात, तर कधी वास्तव समोर आल्यावर डोळ्यात थिजून राहतात, मूकपणे ओघळत राहतात. भावभावनांचे चढ-उतार पावसाच्या सरींसारखे बरसत राहतात. अखेर मुसळधार पावसानंतर जसं सगळं स्वच्छ होतं तसंच सत्य त्यांच्यासमोर येतं. मनातले सगळे गैरसमज दूर होतात आणि दोघं एक होऊन लढायचं ठरवतात. (Tya Ratri Paus Hota)
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली ,कुलकर्णी, सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका सुखी कुटुंबाची वाताहत करून ताठ मानेनं जगणाऱ्या राजकीय पुढाऱ्याची (शिरपतराव) व्यक्तिरेखा साकारली आहे सयाजी शिंदे यांनी. चित्रपट बघताना शिरपतरावांबद्दल मनात प्रचंड चीड निर्माण होते. अर्थात यातच त्यांना त्यांच्या भूमिकेची पोचपावती मिळाली आहे. गायत्रीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने अगदी जीव ओतून काम केलं आहे. भूमिका कोणतीही असो ती सहज सुंदर साकारण्याचं कसब या अभिनेत्रीमध्ये आहे. सुबोध भावेचा अविनाश उत्तमच, पण अभिनयाच्या बाबतीत सरस ठरते ती अमृता सुभाषने साकारलेली रावी. चित्रपट संपल्यानंतरही रावी डोक्यातून जात नाही.
========
हे देखील वाचा – दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…
========
चित्रपटात शेवटी काय होतं, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायलाच हवा कारण याचा शेवट सांगून समजणार नाही प्रत्यक्ष बघून त्याची अनुभूती घ्यायला हवी. तसंही हा चित्रपट यु ट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे तो कधीही अगदी फुकट बघता येईल. एवढी दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल युट्युबचे आभारच मानायला हवेत. (Tya Ratri Paus Hota)