परपुरुषाचा स्पर्श नको म्हणून ‘या’ अभिनेत्रीने नाकारली चक्क नायिकेची भूमिका…
रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींचे बदललेले स्वरूप पाहून अचंबा वाटतो. एकेकाळी सिनेमात स्त्री पात्र सादर करण्यासाठी स्त्रिया मिळत नसत. त्यामुळे पुरुषांनाच स्त्रीपात्र करावे लागायचे. सिनेमामध्ये काम करणे म्हणजे पाप करणे अशीच भावना महिला गटात झाली होती. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटात तर वेश्यांनी देखील काम करायला नकार दिला होता. तेव्हा ख्रिश्चन किंवा अँग्लो इंडियन मुली सिनेमात काम करायला तयार व्हायच्या. त्यांना भरपूर मानधन मिळत असे. सुलोचना तथा रूबी मायर्स हिला तर त्याकाळी मुंबईच्या गव्हर्नरपेक्षा जास्त पगार होता. (Leela Mishra)
याच काळात उत्तर प्रदेशातून राम प्रसाद मिश्रा नावाचे एक अभिनेते चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला आले होते. नाटकांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. नंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील मुंबईला आणले. दादासाहेब फाळके चित्रपट संस्थेच्या मामा शिंदे यांनी एकदा राम प्रसाद मिश्रा यांना विचारले “तुमच्या पत्नी आपल्या चित्रपटात काम करतील का?” त्यासाठी त्यांनी पाचशे रुपये प्रति महिना पगार देखील सांगितला.
फाळके चित्र संस्थेत रामप्रसाद मिश्रा यांना १५० रू. प्रति माह पगार होता. त्यांनी पत्नीला चित्रपटात काम करण्यासाठी उद्युक्त केले. चित्रपट होता ‘सती सुलोचना’ या चित्रपटात रामप्रसाद मिश्रा रावणाची भूमिका करत होते. तर त्यांच्या पत्नी मंदोदरीची भूमिका करणार होत्या. पहिल्या दिवशी हे मिश्रा पती-पत्नी एकत्रपणे चित्रीकरणासाठी आले. मेकअपमन पुढे आला आणि मिश्रा यांच्या पत्नीला तयार करू लागला. (Leela Mishra)
परपुरुष आपल्या गालाला रंग लावतो आहे; या भावनेने त्या भयंकर चिडल्या आणि त्यानी सगळा राग त्या मेकअपमनवर आणि आपल्या पतीवरही काढला. “या सेटवर मी एक मिनिट देखील रहाणार नाही कारण एक परपुरुष माझ्या गालाला रंग लावत आहे.” राम प्रसाद मिश्रा यांनी त्यांना हर तऱ्हेने समजावून सांगितले, “सिनेमात काम करायचं असेल, तर चेहऱ्याचे रंगरंगोटी करणे गरजेचे आहे.” परंतु सुलोचना यांना असला प्रकार अजिबात आवडला नाही. आणि त्या तडक घरी निघून गेल्या. (Leela Mishra)
निर्मात्यांनी मिश्रा आणि त्यांच्या पत्नीला सिनेमातून काढून टाकले. पुढे कोल्हापूरच्या एका चित्रपट संस्थेने या दोघांना चित्रीकरणासाठी तिकडे बोलावले .तिथे मास्टर विनायक यांची नायिका म्हणून मिश्रा यांच्या पत्नीला घेतले. एका प्रसंगात नायिकेला नायकाच्या गळ्यात हात टाकून प्रेमालाप करायचा होता. पुन्हा मिश्रा यांच्या पत्नीचे मस्तक भडकले आणि परपुरुषाच्या बाहुपाशात मी कसे हात टाकू, असे म्हणून चित्रपटातून बाहेर पडल्या. मिश्रा यांच्या पत्नीने नायिकांच्या अशा दोन सुवर्ण संधी सोडल्या.
आता मिश्रा यांनी पत्नीच्या भावना ओळखल्या. परपुरुषाचा स्पर्श देखील होणार नाही अशाच भूमिका ते शोधू लागले. त्याचवेळी त्यांना एक चित्रपट मिळाला. १९३६ सालचा हा चित्रपट होता.‘होनहार’. यात मिश्रा यांच्या पत्नीने वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आईची भूमिका केली. या चित्रपटात त्यांचा मुलगा होता शाहू मोडक! बस या भूमिकेपासून आईच्या भूमिकेचा त्यांच्यावर शिक्का बसला व पुढची पन्नास वर्षे त्या फक्त आई, मावशी, काकू, आजी अशाच भूमिका करू लागल्या. त्यांनी अडीचशेहून अधिक भूमिका केल्या. यात त्यांची ब्लॉकबस्टर शोले सिनेमातील ‘मौसी’ची भूमिका प्रचंड गाजली. (Leela Mishra)
आता तुमच्या लक्षात आलेच असेल या अभिनेत्री होत्या लीला मिश्रा! यांचा जन्म १ जानेवारी १९०८ ला उत्तर प्रदेशात रायबरेली जवळील खेड्यात झाला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. सतराव्या वर्षी त्या दोन मुलींच्या आई झाल्या. त्यांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी पटापट होत गेल्या. रुपेरी पडद्यावरील त्यांच्या भूमिकांनी मात्र त्यांनी चांगलीच छाप पाडली. बातो बातो में, गीत गाता चल, चष्मेबद्दूर,दुल्हन वही जो पिया मन भाये, किनारा, लीडर, अनाडी, महबूबा, अमर प्रेम, नदिया के पार ,कथा, पहेली, अबोध मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
=======
हे देखील वाचा – चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा प्रेम चोप्रा यांना कोणीच ओळखले नाही तेव्हा घडलं असं काही…
=======
वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांना ‘नानी माँ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘मास्को फिल्म फेस्टीव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. काही भोजपुरी सिनेमातही त्यांनी काम केले. सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमात त्यांची भूमिका होती. १७ जानेवारी १९८८ रोजी लीला मिश्रा यांचे निधन झाले. (Leela Mishra)