‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
असं काय घडलं की, न्यूरोसर्जन व्हायचं स्वप्न बघणारे डॉ. अमोल कोल्हे कलाक्षेत्राकडे वळले..
डॉ. अमोल कोल्हे म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण २००८ साली आलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेमधील त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. सध्या राजकारण आणि कला या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी असणारे डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) शाळेत असताना विद्यार्थी म्हणूनही प्रचंड हुशार होते.
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांचं आठवीपर्यंतचं शिक्षणही नारायणगावमधल्या शाळेतच झालं. आठवीला प्रज्ञा शोध परीक्षेत ते दुसरे आले होते. या कठीण परीक्षेत यश मिळाल्यावर त्यांच्या आई वडिलांची खात्री झाली की, आपला मुलगा बोर्डात येणार. म्हणून त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमोल यांना पुण्याला पाठवलं. पुण्याच्या आपटे प्रशालामध्ये त्यांनी नववी आणि दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. आई वडिलांच्या अपेक्षेनुसार दहावीमध्ये अमोल मेरिटमध्ये आले.
अमोल बारावीत असताना त्यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की, माझ्या आजारपणामुळे तुझे मार्क्स कमी आले, असं व्हायला नको. त्यामुळे अमोल फार दिवस घरी न राहता, पुण्याला परतले. त्याही परिस्थितीत त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि ते मेरिटमध्ये आले. बारावीनंतर त्यांना जी एस मेडिकल (के इ एम) या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजला ‘एमबीबीएस’ला ॲडमिशन मिळाले. (Untold Story of Dr. Amol Kolhe)
अनेकदा आपण ठरवतो काही वेगळं आणि होतं काही भलतंच. डॉ. अमोल कोल्हे यांना कलाक्षेत्राची आवड होतीच, पण त्यांचं स्वप्न मात्र वेगळं होतं. त्यांना न्यूरोसर्जन व्हायचं होतं. कलाक्षेत्राची आवड असल्यामुळे एमबीबीएसला असताना ते ‘अपूर्वावी; नावाचा कार्यक्रम करत असत. या कार्यक्रमासाठीचे कोरिओग्राफर होते सुबल सरकार. त्यावेळी अमोल यांचं काम बघून एका दिग्दर्शकाने त्यांना भेटायला बोलावलं. पण इतक्या लवकर या क्षेत्रात जायचा त्यांचा विचारच नव्हता. न्यूरोसर्जन होऊन वयाच्या चाळीशीनंतर कलाक्षेत्रात जायचं, असा विचार त्यांनी केला होता. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं.
एमबीबीएसला असताना एकदा ते घरी गेले होते. तेव्हा घरात बेडवर बँकेचं पासबुक पडलं होतं. सहज म्हणून त्यांनी ते उघडून बघितलं तेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या आर्थिक ओढाताणीची कल्पना आली. आपल्याला जाणीवही होऊ न देता आपले आई वडील आर्थिक ओढाताण सहन करतायत हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी त्यांचा विचार बदलला आणि कॉलेज करता करता कलाक्षेत्रातही काम करायचं ठरवलं. जसं आपल्या आई – वडिलांनी आपल्याला आर्थिक चणचणीची जाणीवही होऊ दिली नाही, तसंच आपणही त्यांना याबद्दल माहिती असल्याची जाणीव होऊ न देता आपलं काम करायला हवं, असा विचार त्यांनी केला आणि एमबीबीएसचा अभ्यास सांभाळून ते कलाक्षेत्रातही काम करू लागले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात झाली ती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीपासून. त्यावेळी त्यांनी सह्याद्री वाहिनीवर दोन कार्यक्रम केले ‘सांगा उत्तर सांगा’ आणि नंतर ‘आमची शाखा कुठेही नाही’. आमची शाखा कुठेही नाही या कार्यक्रमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळेच ते घराघरात पोचले. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. अभिनय क्षेत्रात त्यांची घोडदौड चालूच राहिली. (Untold Story of Dr. Amol Kolhe)
कलाकारांना आपली भूमिका साकारण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार आणि अभ्यास करावा लागतो. त्यात भूमिका एखाद्या देवतुल्य व्यक्तीची असेल, तर कलाकारावर खूप मोठी जबाबदारी असते आणि ती निभावताना अनेकदा मोठ्या दिव्यामधूनही जावं लागतं. असंच काहीसं झालं होतं डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबतीत..
त्यावेळी वसईला ‘शंभूराजे’चा प्रयोग होता. अमोल कोल्हे संभाजी महाराजांची भूमिका करत होते. ते बारीक असल्यामुळे त्यांना ‘पॅडिंग’ घालावं लागत असे. एकदा का ते स्टेजवर गेले की सलग ४५ मिनिटं स्टेजवरच असत. यावेळी मात्र त्यांच्यातल्या कलाकारचा कस लागला. (Untold Story of Dr. Amol Kolhe)
स्टेजवर गेल्यावर अमोल यांना जाणवलं की पॅडिंग घातलेल्या जागी आतमध्ये काहीतरी चावतंय. त्यांच्या लक्षात आलं की, सामान ठेवणाऱ्या व्यक्तीनं पॅडिंग योग्य ठिकाणी ठेवलं नसणार. पण स्टेजवर शंभूराजे साकारत असताना त्या भूमिकेचा, त्या व्यक्तिमत्वाचा मान ठेवायची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही त्रासदायक भाव न दाखवता, त्यांना होत असणारा त्रास कोणाला कळू न देता, सलग ४५ मिनिटं ते आपलं काम करत राहिले.
=====
हे देखील वाचा – थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…
=====
जेव्हा ते स्टेजवरचं काम संपवून बॅकस्टेजला गेले तेव्हा त्यांनी सर्वात आधी पॅडिंग काढलं आणि पाहिलं तर ते पॅडिंग लाल भुंग्यांनी भरलेलं होतं. एवढा त्रास सहन करूनही निव्वळ आपल्या भूमिकेचा मान राखण्यासाठी स्टेजवर तेवढ्याच आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने काम करण्याचं बळ डॉ अमोल यांना शंभूराजांनीच दिलं असावं. (Untold Story of Dr. Amol Kolhe)
आज अमोल एक लोकप्रिय अभिनेता आहे. विविधरंगी भूमिकांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्वाच्या भूमिका त्यांना साकारायला मिळाल्या आणि त्यांनी त्या तितक्याच जबाबदारीने निभावल्याही. त्यांचा प्रवास असाच चालत राहील यात काही शंकाच नाही.