दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Ananya Movie Review: जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘अनन्या’
‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’ असं म्हणणारी ‘अनन्या’ आता रंगमंचावरून सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर आली आहे. जरी ती जुनी असली; अनेक प्रेक्षकांच्या परिचयाची असली तरी ती कुठेही कालबाह्य वाटत नाही. किंबहुना लेखकाने ती सुरुवातीलाच अशा पद्धतीनं लिहिलीय की, ती कधी मागे पडणार नाही. स्वतः अनन्या ही व्यक्तिरेखा देखील तशीच आहे; तिच्या कथे सारखी. प्रारंभी एकांकिकेच्या चौकटीत असताना तिनं अभिनेत्री स्पृहा जोशीला आपलंस केलं. दोन अंकी नाटकाच्या चार भिंतीत ती अभिनेत्री ऋतुजा बागवे सोबत मोठी झाली. आणि आता सिनेमाच्या चंदेरी पडद्यावर अभिनेत्री हृता दुर्गुळेला माध्यमातून तिनं भव्य रूप धारण केलंय. जे स्वतःमध्येच अनन्य साधारण असल्याची प्रेक्षकांना आठवणी करून देतं. (Ananya Movie Review)
सिनेमात एक वाक्य आहे. ‘देव कधीही चूक करत नाही; तो नेहमी जादू करतो.’ हीच जादू या ‘अनन्या’ सिनेमात दडलेली आहे. आणि या जादूचा जादूगार आहे लेखक, दिग्दर्शक, पटकथा आणि संवाद लेखक प्रताप फड. प्रतापचा हा पहिला सिनेमा आहे. पण, तरीदेखील सक्षमपणे त्यानं त्याची रंगमंचीय जादू प्रभावीपणे मोठ्या पडद्यावर सादर केलीय.
आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत ‘अनन्या’ जिद्दीने आणि खंबीरपणे कशी लढत आहे. हे आपल्याला सिनेमात जरी पाहायला मिळणार असलं; तरी मानवी नाते संबंध कसे? कधी? का? बदलतात. याचं उत्तरही हा सिनेमा आहे. हा सिनेमा म्हणजे एका तरुणीने आपल्यातल्या शारीरिक उणिवेवर मात करत जगण्याच्या केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. पण म्हणून ती काही केवळ दुर्दम्य इच्छेची कहाणी किंवा प्रतिकूलतेवर विजय मिळवत साकारलेली यशोगाथा नाही. तशी ती असती तर एका सर्वसामान्य सिनेमा पर्यंत ती मर्यादित राहिली असती. तिचा परिणाम देखील रंजकतेपुरता मर्यादित राहिला असता.
पण, इकडेच हा सिनेमा असामान्य ठरतो. गोष्टीचाच विचार करायचा झाला तर ही जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट आहे. सोबतच प्रेम म्हणजे काय या प्रश्नावर काहीसा आड-वाटा घेऊन बोलू पाहणारी ही कथा आहे. खरंच आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करतोय का? की त्या व्यक्तीला प्रेम दाखवण्याचा नादात आपण आपला स्वार्थ पाहतोय? हा विचार लेखकाने सिनेमांच्या उपकथानकात केलेला दिसतो. (Ananya Movie Review)
मोठ्या मानसिक आणि शारीरिक आघातानंतर खचून गेलेल्या अनन्याला कसा? कोण? कधी? का? आधार देतो. त्यामागे त्या-त्या व्यक्तीचा काय विचार असतो? स्वतः अनन्या हा आधार घेते का? अशा बऱ्याच प्रश्नांची बोधपूर्ण आणि रंजक उत्तर तुम्हाला सिनेमा पाहताना टप्या टप्याने मिळतील.
संपूर्ण सिनेमाभर प्रताप फडने त्याची पात्र भक्कमपणे योग्य ठिकाणी उभी केली आहे. अनेक ठिकाणी प्रसंगांच्या दिग्दर्शनात तो डगमगतो. काही प्रसंगांमध्ये संवादांची लांबट लागते. ते कंटाळवाणे होतात. पण, त्याकडे दुर्लक्ष करून कलाकारांचे सादरीकरण आपलं लक्ष वेधून घेतात. पण, दिग्दर्शकीय पातळीवर प्रतापनं अधिक बारकाईनं नक्कीच येत्या काळात मेहनत घ्यायला हवी. कारण, तो त्या ताकदीचा दिग्दर्शक आहे. (Ananya Movie Review)
हा सिनेमा तुम्ही जरूर बघायचा आहे. असं मी इकडे बोल्ड मध्ये लिहितोय. कारण, उपरोक्त लिहिल्या प्रमाणे तो बोधपूर्ण आहे आणि लेखन-दिग्दर्शनाच्या पातळीवर उजवा आहे. आता बघण्यासाठीच अजून एक कारण म्हणजे, स्वतः ‘अनन्या’… अनन्या ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हृता दुर्गुळे हिने आपल्या सिनेपदार्पणात स्वतःची पुन्हा एकदा दखल घ्यायला भाग पाडलं आहे. तिच्या कामात मानसिक, भावनिक, शारीरिक आणि कलात्मक मेहनत प्रामुख्याने दिसून येते. तिनं ज्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे ही व्यक्तिरेखा साकारली आहे की, खरंच अनन्या आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभी राहते. त्यात हृताचे बोलके डोळे सिनेमा संपल्यावरही आपल्या स्मरणात राहतात. यात दिग्दर्शकाचं देखील कौतुक आहे.
हृतानं भूमिकेतील चढ-उतार अचूकपने पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कथानकात तिचं उल्हसित होणं, खचणं, भरारी घेणं, आत्मविश्वास मिळवत उभं राहणं ह्या अवस्थांतरासाठी आवश्यक असलेले आवाजातले बदल, शब्दफेक, नजरेचा वापर तिने एका संयमाने आणि हीरोइझमच्या जराही आहारी न जाता केले आहेत. त्यामुळे तिची व्यक्तिरेखा अत्यंत विश्वासार्ह वाटते. ती कुठेही चमत्कार ठरत नाही.
दुसरीकडे अतिशय तन्मयतेने अभिनेता अमेय वाघ याने त्याची छोटीशी पण प्रभावी व्यक्तिरेखा जय दीक्षित साकारली आहे. जय दीक्षित हे पात्र हा खरंतर ऑथरबॅक आहे. तो प्रेक्षकांना सहज आवडणारा असा लव्हेबल रोमँटिक हीरो आहे. पण अमेयनं त्यातला हीरोइझम एका वास्तववादी पातळीवर आणायचा प्रयत्न केलाय; जे विशेष महत्वपूर्ण आहे. सोबतीला सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा विशेष आपल्या नजरेत भरते. शेखर (चेतन चिटणीस), प्रियांका (ऋचा आपटे), अविनाश (योगेश सोमण), धनंजय (सुव्रत जोशी), सुनील अभ्यंकर आणि रेणुका दफ्तारदार या सर्व व्यक्तिरेखा आपल्या स्थानी दमदार आहेत. (Ananya Movie Review)
या सिनेमांचं आणखी एक बलस्थान म्हणजे सिनेमांचं पार्श्वसंगीत आणि गीते. विशेष म्हणजे सिनेमातील प्रत्येक गीत हे सिनेमासोबत लयबद्ध पद्धतीने चालतं. ते कथानकाशी एकरूप झालेलं आहे. याचं श्रेय गीतकार अभिषेक खणकर याला द्यायला हवे. या गीतांना ज्याचं संगीत लाभलं आहे; तो संगीतकार समीर सप्तीसकर यानं अफलातून काम केलं आहे. केवळ गीतांच संगीतरचनाच नव्हे तर सिनेमाला एक सूर दिला आहे. सिनेमा प्रवाही राहण्यात पार्श्वसंगीताचे मोठं योगदान आहे.
==========
हे देखील वाचा – हृता दुर्गुळे: अनन्या साकारताना शिकले ‘अशा’ गोष्टी ज्याची कधी कल्पनाच केली नव्हती..
==========
सिनेमा कलात्मक दृष्ट्या सरस झाला आहे. पण, हा सिनेमा तितकाच तांत्रिक देखील आहे. ‘व्हिएफक्स’चा वापर सिनेमात करताना बजेटच्या मर्यादा अनेक ठिकाणी जाणवतात. पण, मराठी सिनेमांच्या पटलावर अपेक्षित समाधानकारक काम या सिनेमात नक्कीच झालं आहे. याहूनही अधिक चांगलं काम झालं असतं. यात स्वतः दिग्दर्शकाचंही दुमत नसेल. पण, निर्मात्यांनी अशा विषयावर विश्वास ठेवून हा सिनेमा निर्माण केला यात त्यांचही कौतुक आहे. येत्या काळात विविधांगी भूमिकेत हृतानी सक्षमपणे दिसत राहायला हवं आहे. लेखक-दिग्दर्शक प्रतापनं असेच आव्हानात्मक विषय पडद्यावर साकारत राहायला हवं. (Ananya Movie Review)
सिनेमा : अनन्या
निर्मिती : ध्रुव दास, रवी जाधव, संजय छाब्रिया
लेखन, दिग्दर्शन : प्रताप फड
कलाकार : ऋता दुर्गुळे, अमेय वाघ, चेतन चिटणीस, ऋचा आपटे, योगेश सोमण, सुव्रत जोशी
संगीत : समीर सप्तिस्कर
गीतकार : अभिषेक खणकर
छायांकन : अर्जुन सोरटे
दर्जा : चार स्टार