‘या’ सुपरहिट गाण्याच्या चित्रीकरणासाठी गेलेली श्रीदेवी तापाने फणफणली आणि…
दिग्दर्शक पंकज पराशरने १९८८ साली एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘चालबाज’. हा चित्रपट त्या वर्षीचा ‘बम्पर हिट’ चित्रपट होता. यामध्ये श्रीदेवी (Sridevi) दुहेरी भूमिकेत होती. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा हा किस्सा श्रीदेवीची कामावरील श्रद्धा, तिचं डेडीकेशन दाखवणारा आहे.
‘चालबाज’ रमेश सिप्पी यांच्या १९७२ सालच्या ‘सीता और गीता’ चित्रपटाचा रीमेक होता. हिंदी चित्रपटातील ‘बेस्ट डबल रोल मुव्हीज’ मध्ये याचा समावेश होतो. यामध्ये श्रीदेवी सोबत रजनीकांत आणि सनी देओल नायकाच्या भूमिकेत होते, तर ‘सारांश’ नंतर अनुपम खेर आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच ‘विचित्र’ अवतारात या चित्रपटात दिसले होते.
अनुपम खेर याने प्लास्टिकचे नकली नाक त्याच्या नाकावर बसवल्याने तो तर ओळखूच येत नव्हता. हे दोघेही सिनेमात नकारात्मक भूमिकेमध्ये होते. श्रीदेवी (Sridevi) या चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक होती कारण पहिल्यांदाच तिला अशा प्रकारच्या दोन विभिन्न व्यक्तिरेखा एकाच चित्रपटात साकारायची संधी मिळाली होती.
सनी देओल आणि रजनीकांत या दोघांच्या भूमिका श्रीदेवीच्या तुलनेने खूपच कमी लांबीच्या होत्या. पण सनी देओलसाठी हा चित्रपट भावनिकदृष्ट्या विचार करता खूपच महत्त्वाचा होता कारण ‘सीता और गीता’ मध्ये त्याच्या वडिलांनी म्हणजेच धर्मेंद्रने नायकाची भूमिका केली होती आणि त्याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये सनीला नायक म्हणून संधी मिळाली होती.
दिग्दर्शक पंकज पराशर पुण्याच्या ‘एफटीआय’चा (FTI) विद्यार्थी. १९८५ सालच्या दूरदर्शनवर गाजलेल्या ‘करमचंद’ या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. ‘चालबाज’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट ठरलेला चित्रपट. आता श्रीदेवीच्या मूळ किस्स्याबद्दल –
या सिनेमात एक गाणं होतं “ना जाने कहा से आई है, ना जाने कहा को जायेगी… ये लडकी.. ” कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं हे गाणं संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हे गाणं स्टीव्ह वंडर यांच्या ‘पार्ट टाईम लव्हर’ या गाण्याच्या चालीवर बनवलं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांची होती. यातील श्रीदेवीच्या डान्स स्टेप्स, गाण्याचा रिदम सर्वच अगदी ‘हटके’ म्हणावं असं होतं. या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण पावसात करायचे होते. तेव्हा पावसाळा नसल्यामुळे स्टुडिओमध्येच कृत्रिम पावसात चित्रीकरण होणार होते.
पहिल्याच दिवशी चित्रीकरणात दिवसभर सात ते आठ तास श्रीदेवी पाण्यात प्रचंड भिजली. दिवसभर पाण्यात भिजल्याने संध्याकाळी श्रीदेवीला ताप आला. सकाळी उठल्यानंतर तिचं अंग प्रचंड दुखत होतं आणि अंगात १०३ ताप होता. पण त्याही अवस्थेत औषध घेऊन ती सेटवर पोचली. (Dedication of Sridevi)
तिच्या मते चित्रीकरणाला जाणे गरजेचे होते. कारण मोठा सेट लागला होता. शिवाय सनी देवल सारख्या बिझी स्टारसोबत तिचे चित्रीकरण होत होते. पंकज पराशर, सरोज खान आणि सनी देओल यांनी श्रीदेवीची अवस्था पाहिली. आपण आजचे चित्रीकरण रद्द करूया असे सांगितले. पण श्रीदेवी म्हणाली “नको, मी चित्रीकरण करू शकेन!” सर्वांनी पुन्हा पुन्हा सांगून पहिले पण श्रीदेवी ऐकायला तयार नव्हती. अंगात १०३ ताप असताना प्रचंड त्रास होत असताना तिने दिवसभर पुन्हा सात -आठ तास पाण्यात भिजून उरलेले गाणे पूर्ण केले.
=====
हे देखील वाचा – अनिल कपूरने केली होती यश चोप्रांची पंचाईत! चक्क सेटवर दिला काम करण्यास नकार…
=====
आज आपण जेव्हा हे गाणे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात पण येत नाही की, हे गाणे चित्रित होत असताना श्रीदेवी आजारी होती, तिच्या अंगात ताप होता. तिचे डेडिकेशन, कामावरची श्रद्धा इतकी प्रचंड होती की, तिने आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून हे गाणे चित्रित केले. या गाण्यानंतर ती तब्बल दोन आठवडे अंथरुणावर पडून राहिली. तिला ‘फ्लू’ झाला होता. अंगात प्रचंड अशक्तपणा आला होता. पण ह्या गाण्याचं भाग्य थोर की, या गाण्याची गायिका कविता कृष्णमूर्ती, कोरिओग्राफर सरोज खान आणि अभिनेत्री श्रीदेवी या तिघींना त्या वर्षीचे फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले!