‘दे दे प्यार दे’ गाण्याचा रुना लैलाशी होता जवळचा संबंध; कोण आहे रुना लैला
‘ऋषिचे कूळ आणि नदीचे मूळ’ शोधू नये असे म्हणतात. त्याचप्रमाणे गाण्याच्या चालीचे मूळ देखील शोधायचे नाही का? एका लोकप्रिय गाण्याच्या चालीची मूळ कथा खूपच मनोरंजक आहे. रुना लैला (Runa Laila) या गायिकेने सत्तरच्या दशकामध्ये भारतीय संगीताच्या दुनियेत धुमाकूळ घातला होता. त्या काळात ती पाकिस्तान आणि बांगलादेशातमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
रुना लैलाचा जन्म (१७ नोव्हेंबर १९५२) पूर्व पाकिस्तानात झाला (आताचा बांगलादेश). साठच्या दशकाच्या उत्तरार्धात तिने गायला सुरुवात केली आणि चांगलीच लोकप्रिय ठरली. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर ब्रिज दिग्दर्शित ‘एक से बढकर एक’ या चित्रपटापासून तिने भारतीय चित्रपटात गायला सुरुवात केली. कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असलेला हा सिनेमा फारसा चालला नाही, पण यातील रुना लैलाने गायलेले शीर्षक गीत ‘बिनाका गीत माला’ मध्ये चांगलेच गाजले.
याच काळात भारतात डिस्को संगीताचे आगमन सुरू झाले होते. ‘कुर्बानी’ चित्रपटातील नाझीया हसन हिने गायलेले ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये’ हे संगीतकार बिडडू यांनी संगीतबद्ध केलेले डिस्को साँग प्रचंड लोकप्रिय ठरले. याच काळात बप्पी लहरी यांनी देखील डिस्को संगीत चित्रपटाच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली. नंतर सर्वच संगीतकार डिस्कोच्या पाठीशी लागले.
राहुल देव बर्मन पहिल्यापासूनच पाश्चात्त्य संगीताचे भोक्ते होते. त्यांनीदेखील डिस्को संगीताला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. ‘प्यारा दुश्मन’ या सिनेमातील उषा उथुप यांनी गायलेलं ‘हरी ओम हरी’ त्या काळात तरुणाईच्या ओठावर रेंगाळत होते. अरमान, डिस्को डान्सर, सनम तेरी कसम, हथकडी… या सिनेमातील डिस्को गाणी बेफाम गाजत होती. (Runa Laila)
या काळात डिस्को गाण्याचे अनेक प्रायव्हेट अल्बम देखील येऊ लागले. नाझिया हसन यांचा ‘डिस्को दिवाने’ हा अल्बम त्याकाळात खूप गाजला होता. या अल्बमला संगीत बिडडू यांचेच होते नाझिया हसन आणि तिचा भाऊ झोयेब हसन यांनी या अल्बममध्ये गाणी गायली होती.
या अल्बममधील ‘आओ ना प्यार करे’ आणि ‘डिस्को दिवाने’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. याची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक विनोद पांडे यांनी कुमार गौरव आणि रती अग्नीहोत्रीला घेवून याच वर्षी म्हणजे १९८२ साली ‘स्टार’ या चित्रपटाची निर्मिती केली. नाझिया हसन आणि संगीतकार बिडडू हेच कॉम्बिनेशन होतं.
डिस्कोची लोकप्रियता पाहून बप्पी लाहिरी यांनी रुना लैलाला (Runa Laila) घेवून याच वर्षी एक प्रायव्हेट अल्बम आणला होता. या अल्बमचं नाव होतं ‘सुपर रुना’. हा अल्बम म्हणजे सबकुछ ‘रुना लैला’ होता. यातली गाणी अंजान यांनी लिहिली होती. हा अल्बम त्या काळात ‘डिस्को दिवाने ‘ इतका चालला नाही. पण यातली गाणी भारी होती.
याच अल्बम मधील एक गीत बप्पी लहरी यांनी १९८४ सालच्या प्रकाश मेहरा यांच्या ‘शराबी’ चित्रपटात वापरलं आणि बंपर हिट ठरलं. रूना लैला (Runa Laila) यांच्या अल्बम मधील गाण्याची सही सही चाल इथे देखील वापरली होती. गाण्याचे बोल होते ‘दे दे प्यार दे प्यार दे’. या गाण्यात फक्त ‘हमे प्यार दे’ असा शब्द होता. मूळ अल्बम मध्ये ‘मालिक प्यार दे’ असा शब्द होता.
चित्रपटात ज्यावेळी हे गाणं पुरुष आणि स्त्री दोघांच्या स्वरात रेकॉर्ड करायचं ठरलं; त्यावेळेला सहाजिकच रुनाला हे गाणं आपल्या स्वरात रेकॉर्ड व्हावे असे वाटले कारण मूळ गाणे तिने गायले होते. पण नंतर काय चक्रे फिरली माहीत नाही, हे गाणे रुना लैलाला न देता आशा भोसले यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले.
========
हे देखील वाचा – जेव्हा सैफ अली खानने केली होती शशी कपूरची गुंडांपासून सुटका…
========
सिनेमातील किशोर आणि आशा यांच्या स्वरातील दोन्ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. रुना लैलाचे (Runa Laila) दुर्दैव पहा मूळ अल्बम दोन वर्षांपूर्वी आला, पण फारसा लोकप्रिय झाला नाही आणि तेच गाणे कॉपी करून जेव्हा चित्रपटातून आले तेव्हा त्या गाण्याला संपूर्ण देशभरात मोठी लोकप्रियता लाभली! नशीब नशीब म्हणतात ते असं.
या गाण्याच्या मूळ चालीचा शोध घ्यायला गेलं असताना असं दिसतं की, हे एक जुनं बांगला लोकगीत होतं ज्याची चाल या गाण्यासाठी वापरली गेली होती. या पूर्वी १९६५ साली सचिन द बर्मन यांनी देखील ही चाल ‘गाईड’ चित्रपटात ‘अल्ला मेघ दे पाणी दे’ या गाण्यासाठी वापरली होती. तेव्हा देखील ते फारसे गाजले नाही. शराबी च्या गाण्यांनी मात्र दंगा केला! नशीब असते एकेका गाण्याचं आणि गाणाऱ्याचं! (Runa Laila)