दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
फर्स्ट डे फर्स्ट शोचा तो थिएटरबाहेरचा माहौल…
सनी देओल आणि अमृता सिंगचा पहिला चित्रपट ‘बेताब’चा रिलीजचा दिवस. नेमकी तारीख सांगायची तर, ५ ऑगस्ट १९८३. ठिकाण दक्षिण मुंबईतील डाॅ. भडकमकर मार्गावरील अप्सरा थिएटर. त्या दिवशी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ म्हणून मी आवर्जून अर्धा तास अगोदरच अप्सरावर पोहचलो. (First Day First Show)
खरंतर मी काॅलेजमध्ये असल्यापासूनच गिरगावातील आम्ही काही फिल्म दीवाने नवीन चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी मेन थिएटरवर जाऊ लागलो. कारण काय तर, थिएटर डेकोरेशन पाहायचे. ब्लॅक मार्केटमधला तिकीटाचा चढता दर पाहायचा, खरंतर तर ऐकायचा (आम्ही थोडेच ब्लॅक मार्केटमध्ये पिक्चरचे तिकीट घेण्याइतके पैसेवाले होतो), आगाऊ तिकीट विक्रीचा चार्ट पाहणे एखादे तरी एक्स्ट्रा तिकीट नक्कीच मिळेल अशा आशेवर असलेल्यांची धडपड/तगमग पाहणे, गाण्याची छोटीशीच पुस्तिका विकणाऱ्याचा विशिष्ट आवाज; या सगळ्याचे एक वेगळेच रंगीबेरंगी रसायन अनुभवत असायचो. आमच्याच सारखे आणखीन काही फिल्म दीवानेही त्या काळात होते, हे कालांतराने मला समजले.
अप्सरावरची ‘बेताब’ची गर्दी पाहून/अनुभवून सुखावलो. थिएटरवरच्या हाऊसफुल्लच्या फलकावरील ताज्या फुलांचा हार चमकत होता. शोच्याच वेळी मिळत असलेल्या स्टाॅलची तिकीटेही केव्हाच संपली होती. रसिकांच्या चेहर्यावर सकारात्मक भाव होते. थिएटरचे मेन गेट उघडण्याची उत्सुकता वाढत होती आणि एव्हाना थिएटरबाहेर ‘अबब’ म्हणावी अशी गर्दी वाढत जाऊन फूटपाथवरुन खाली उतरली होती आणि त्यामुळे टॅक्सी, मोटार, बसचा वेग कमी झाला होता. अशातच मेन गेट उघडताच झुंबड उडाली.
गर्द लाल, पिवळ्या, निळ्या तिकीटाचा अर्धा भाग डोअर किपरकडून कापून घेत पब्लिक आत जाऊ लागले. आता बरेच पब्लिक आत गेले तरी थिएटरबाहेर बरेच पब्लिक होते. कोणी ब्लॅकमध्ये बाल्कनीचे तिकीट वीस रुपयात घेत होते. (१९८३ साली मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक एक हजार रुपये पगार अगदी कन्फर्ट झोन होता. यावरुन वीस रुपयाची तेव्हाची किंमत ओळखा.) एखाद्याला एक्स्ट्रा तिकीट मिळताच तो सुखावायचा. आत चित्रपट सुरु होऊनही आता थिएटरबाहेर साधारण गर्दी होती. ती हळूहळू कमी झाली…
धर्मेंद्र निर्मित आणि राहुल रवैल दिग्दर्शित ‘बेताब’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा हा माहौल. हे एक उदाहरण झाले. मी तेव्हा मिडियात येऊनही जुन्या सवयीनुसार हा माहौल अनुभवला. त्या काळात अनेक चित्रपटाच्या पहिल्या दिवशी तर गर्दी असेच, पण तो सुपरहिट ठरल्यास अनेक आठवडे आणि पब्लिकला आवडले नाही तरी पहिले चार पाच दिवस नक्कीच अशी गर्दी आणि असा ‘शब्दात पकडता न येणारा माहौल’ हमखास असे. अगदीच पहिल्याच शोपासून थंड स्वागत हा प्रकारच नसे. अपवाद एखाद्या ‘मेहबूब की मेहंदी’ चित्रपटाचा.
त्या काळातील हिट चित्रपट सांगायचे तर, अप्सरा थिएटरबाहेरच शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अजनबी’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल’, फिरोज खान दिग्दर्शित ‘कुर्बानी’ , सावनकुमार दिग्दर्शित ‘सौतन’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’ अशा अनेक चित्रपटांच्या वेळी हाच थिएटरबाहेरचा शो पुन्हा पुन्हा रंगला. या चित्रपटांची पूर्वप्रसिध्दीही ‘फोकस्ड’ म्हणूनच प्रभावी. त्या काळातील अनेक थिएटरबाहेरचे हे गर्दीचे हुकमी चित्र. उदाहरणे द्यावी तेवढी थोडीच.
हे कल्चर कधी मी फिल्म दीवाना म्हणून अनुभवले, कधी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा पब्लिक म्हणून अनुभवले, तर कधी आम्हा चित्रपट समिक्षकाना ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चे तिकीट दिले तेव्हा आपण मूळ पब्लिकच आहोत हे आवर्जून लक्षात ठेवून अनुभवले. याच अप्सरा थिएटरमधील प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘शराबी’, मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’ यांच्या ‘फस्ट डे फर्स्ट शो’ची आम्हा समिक्षकाना जनसामान्यांसोबत चित्रपट पाहायची तिकीटे दिली आणि तेव्हाही थिएटरबाहेरचा तो माहौल अनुभवला.
नवीन चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासूनचा थिएटरबाहेरचा असा माहौल त्या काळात मिनर्व्हा, नाॅव्हेल्टी, इराॅस, मेट्रो, मराठा मंदिर अशा सर्वच थिएटरवर हमखास असे. त्यात फक्त पिक्चर हिट अथवा फ्लाॅपने दिवसांचे गणित बदलायचे इतकेच.
आता ते दिवस, तो थिएटरबाहेरचा माहौल अजिबात अनुभवायला मिळत नाही हो! पूर्णपणे हरवलीय ही गोष्ट. अपवाद पुष्पा, आरआरआर २, केजीएफ २ असे काही दाक्षिणात्य मसालेदार मनोरंजक चित्रपट. तुम्हालाही माहिती आहे, हे मूळ दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब झाले आहेत. त्याना सकाळच्या शोपासून गर्दी होतेय, तर मराठी व हिंदी चित्रपटांना का होत नाही हा वेगळा विषय आहे. त्यावर येथे चर्चा आणि चिंता नकोच. पण एकेकाळचा एकपडदा चित्रपटगृह अथवा सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेरचा तो उत्साह, वातावरणातील सकारात्मकता, चित्रपट कसा असेल याची उत्सुकता, कुतूहल आज मल्टीप्लेक्सबाहेर मला जाणवत नाही.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील माझ्या अशा दांडग्या अनुभवापुढे हे तर अगदीच शांत शांत वाटते. एकेकाळचा तो थिएटरबाहेरचा माहौल आपल्याला चित्रपटाच्या जवळ घेऊन जायचा. पडद्यावर काय काय असेल/दिसेल याचे विचारचक्र सुरु होई, डोळ्यासमोर या चित्रपटाचे कुठे कुठे पाहिलेले फोटो अथवा पोस्टर येतं.
आज डिजिटल युगात मोबाईलवर नवीन चित्रपटाची जणू पटकथेपेक्षा जास्त माहिती मिळते, गाणी तर इतक्यांदा पाहायला मिळतात की, पुन्हा ती चित्रपटामध्येही नकोत असे अनेकदा वाटते. काळासोबत अनेक गोष्टी बदलणे अगदीच स्वाभाविक आहे. तसाच हाही बदल झालाय. तो स्वीकारायला हवाच.
==========
हे देखील वाचा – रेसकोर्सच्या दुनियेशी जवळचा संबंध असणाऱ्या डायना थिएटरच्या रंजक आठवणी
==========
पडद्यावरचा चित्रपट खरंतर थिएटरबाहेरच्या गर्दीत सुरु होतो हे माझ्यासारख्यानी अनुभवलंय. पुन्हा पुन्हा त्या वातावरणातून गेलोय. तुमच्यातील अनेकजण एव्हाना त्याच आठवणीत गेला असाल. आजची थिएटरबाहेरची शांतता मनात एक प्रकारची निराशेची भावना निर्माण करते आणि आत गेल्यावर अनेकदा तरी दिसते पहिल्याच शोपासून गर्दीच नाही. मग तो माहौल तरी कसा असणार?
अहो पूर्वी अगदी फ्लाॅप चित्रपटालाही पहिले काही दिवस थिएटरबाहेर गर्दी असे (त्या काळात निदान चित्रपट पाहून मग तो चित्रपट पब्लिक पाडायचा) आता ‘समशेरा’ वगैरे अनेक बड्या चित्रपटांना पब्लिकने न पाहताच पाडलेय, तर तो माहौल तो कुठे असणार? “कहा गये वो दिन.. ” असे याबाबतही आहे हो!
1 Comment
Interesting nostalgia dilip