आत्महत्या करायला निघालेला हा गायक परत फिरला आणि बनला ‘सुपर सिंगर’
असं म्हटलं जातं की, नियतीने लिहून ठेवलेलं प्राक्तन कुणीही पुसू शकत नाही. उर्दूमध्ये एक खूप लोकप्रिय शेर आहे ‘मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुर ए खुदा होता है…..’ कलावंतांच्या बाबतीत तर या गोष्टीचा प्रत्यय कायम येत असतो. ७ ऑक्टोबर १९७३ रोजी जन्मलेल्या एका उत्तर प्रदेशातील लोकसंगीत गाणाऱ्या कलावंताच्या मुलाच्या वाट्याला असंच आयुष्य आलं होतं. (Lesser Known story of Bollywood singer)
हा मुलगा घरीच संगीताचे बाळकडू मिळाल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून गात होता. अतिशय मोकळा खडा पहाडी आवाज त्याला लाभला होता. त्यामुळे लोकसंगीत त्याच्या आवाजातून खूप छान पद्धतीने येत होतं. शाळेत असताना हा कायम लोकगीते गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असे. हा मुलगा जेव्हा १४ वर्षाचा झाला त्यावेळी त्याने गाण्यातच करिअर करायचे ठरवले. परंतु घरून अर्थातच या निर्णयाला विरोध झाला. ‘गाणं छंद म्हणून ठीक आहे; व्यवसाय म्हणून करायचा असेल तर भिकेच्या डोहाळे लागतील!’ असं त्याला म्हणू लागले. पण याच्या मनात जिद्द अफाट होती. गाण्यातच करिअर करायचं हे त्याने ठरवलंच होतं.
घरातून पळून जाऊन त्याने दिल्ली गाठले. इथे त्याने संगीताचे क्लासेस सुरू केले. त्यातून होणाऱ्या अर्थाजनातून तो स्वतः देखील संगीताचे पुढचे शिक्षण घेऊ लागला. खूप मोठा संघर्ष होता. स्वतःला प्रस्थापित करायचे होते. हाती काहीही पैसा नव्हता. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले ‘काहीतरी जोडधंदा सुरू कर’ म्हणून त्याने हॅंडीक्राफ्ट वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
दिल्लीच्या प्रगती मैदानावर स्टॉल घेऊन त्याने या व्यवसायाचा श्री गणेशा केला. यासाठी बँकेकडून कर्ज देखील काढले. पण यात त्याला मोठा तोटा झाला. देणेकरी दारात उभे राहिले. सगळीकडून पैशाचा तगादा सुरू झाला. यातून तो प्रचंड नैराश्यामध्ये गेला. आपल्या हातून काहीच घडू शकत नाही, याची त्याला जाणीव झाली. आपण या जगात जगण्याच्या लायकीचे नाही अशी भावना त्याच्या मनात येऊ लागली. यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतला आणि तो आत्महत्या करायला निघाला. पण एका भल्या माणसाने त्याला आत्महत्या पासून परावर्तन केले आणि वाचवले! (Lesser Known story of Bollywood singer)
तिथून तो थेट ऋषिकेशला गेला. साधुसंतांसोबत राहून तो भजने गावू लागला. खड्या आवाजातील त्याची भजने लोकप्रिय होऊ लागली. आपल्याला गाणे गायला जमू शकते. याची त्याच्या मनाने परत उभारी घेतली आणि त्याने दिल्लीला जायचा निर्णय घेतला. २००१ साली दिल्लीहून तो मायानगरी मुंबईला आला.
मुंबईत आल्यानंतर पुन्हा त्याचा संघर्ष सुरू झाला. दारोदार तो भटकू लागला. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित हृदयनाथ मंगेशकर या सर्वांचा तो एकलव्यासारखा शिष्य होता. या सगळ्यांच्या गाण्यांचा त्याचा प्रचंड अभ्यास होता. यातूनच त्याचा गळा तयार झाला होता. परंतु या काळातील भारतीय चित्रपट संगीत एका वेगळ्या लाटेतून चाललो होते. तिथे हा आवाज मीसफिट होत होता. मन पुन्हा एकदा नैराश्याने भरकटून जाऊ लागले, पण यावेळी पूर्वीसारखं व्हायचं नव्हतं. त्याला एक जिंगल गीत गायला मिळाले. हे जिंगल खूप लोकप्रिय ठरले. नंतर अनेक रेडिओ आणि टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये त्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू पैसाही मिळू लागला.
२००३ साली ‘वैसा भी होता है’ या नावाचा एक चित्रपट आला. चित्रपट चालला नाही. आज या चित्रपटाचे नाव देखील कोणाला आठवणार नाही. पण विशाल शेखर यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील या गायकाने गायलेल्या एका गाण्याने मात्र इतिहास घडवला. (Lesser Known story of Bollywood singer)
आज देखील हे गाणे या गायकासाठी त्याचे ‘सिग्नेचर सॉंग’ बनले आहे. यानंतर मात्र त्याला मागे वळून पाहावे लागले नाही. भारतातल्या प्रमुख भाषांमध्ये तो झपाट्याने गाऊ लागला. हिंदीमधील तो प्रस्थापित झाला. देश विदेशात त्याच्या गाण्याच्या मैफिली होऊ लागल्या.
===========
हे देखील वाचा – दिलीपकुमारने बारसं केलेलं अनोखं ‘कॉकटेल’ एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झाले होते
===========
एकेकाळी आपल्याला काहीच जमत नाही, आपण जगण्याच्या लायकीचे नाही, अशी भावना होऊन आत्महत्या करायला गेलेल्या या गायकाला नियतीने यशाच्या शिखरावर नेऊन बसवले. यशाची दारे सताड उघडणाऱ्या या गायकाने गायलेले गाणे होते ‘अल्ला के बंदे हंस दे अल्ला के बंदे…..’ आणि हा गायक होता कैलाश खेर!