De Dhakka 2 Movie Review: निखळ हास्याचे २ तास
काही सिनेमे असे असतात ज्यातील पात्र कायम स्वरुपी, त्या व्यक्तिरेखांच्या नावानिशी लक्षात राहतात. आज चौदा वर्षांनंतर देखील ‘दे धक्का’ सिनेमांच्या बाबीत हे खरं ठरतं. धनाजी (सिद्धार्थ जाधव), मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे), मकरंदची बायको सुमती (मेधा मांजरेकर), तात्या सूर्यभान जाधव (शिवाजी साटम) आणि मकरंदची दोन पोरं पहलवान किसना आणि नृत्यांगना सायली. या रंगारंग व्यक्तिरेखांचा शिक्का प्रेक्षकांच्या मनावर बसलेला आहे. एक तप उलडून गेलं तरी या व्यक्तिरेखांची ‘टमटम’ चाललेली धमाल मस्ती आणि त्यांच्यातील ते भावनिक नातं आजही स्मरणात आहे. हीच मंडळी आता पुन्हा एडका ‘दे धक्का २’ या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला भेटायला आली आहेत. पण, यावेळी ते पुरते चकचकीत झाले आहेत. थेट गावाकडून लंडनला पोहोचले आहेत. (De Dhakka 2 Movie Review)
सध्या मराठी सिनेनिर्मितीत ‘लंडन’ हे शहर सातत्याने सिनेमांमध्ये दिसतंय. त्या मागची आर्थिक कारणं आणि गणित वेगळी असतील. पण, या बाबीची गंभीर दखल राज्यातील सांस्कृतिक धोरणात घ्यायला हवी. कारण, एका शेतकऱ्याच्या शेतात भुईमुगाचे पीक वारेमाप आलं म्हणून, त्याचं पाहून इतर शेतकऱ्यांनी देखील भुईमुगच लावला; तर त्या शेंगदाण्याच्या भाव पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता वेळीस मराठी सिनेनिर्मात्यांनी, दिग्दर्शक लेखकांनी यापुढे परदेशातील वेगळी शहर सिनेमासाठी शोधायला हवी. असो.
तर पुन्हा सिनेमा टर्न घेऊया… जाधव कुटुंबीय आता लंडनमध्ये गेलं आहे. पण, एक मोटार मॅकेनिक एवढा श्रीमंत झाला कसा, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ज्यांनी ‘दे धक्का’ सिनेमा पाहिला असेल त्यांना सिनेमाचा मूळ भाव अचूक ठाऊक आहे. पण, ज्यांनी पहिला सिनेमा पाहिला नाही; त्यांच्यासाठी यंदाचा ‘ दे धक्का २’ कॉमिकमय आहे.
यावेळी दुसऱ्या पर्वाची गोष्ट तिथूनच सुरु होते जिथे पहिला पर्वाची गोष्ट संपली होती. गावचा सर्वसामान्य मोटार मकरंद (मकरंद अनासपुरे) याने बनवलेला पार्ट आता इतका हिट झालाय की, मकरंदची स्वतःची कोट्यावधी रुपयांची कंपनी आहे. सोबत तो स्वतःच्या ब्रँडची नवी गाडी देखील लॉंच करणार आहे. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की, हे प्रस्त किती मोठं झालं आहे. पण, आता त्याच छोट्या ‘पार्ट’मुळे ‘दे धक्का २’मध्ये धमाल मस्ती उडाली आहे. (De Dhakka 2 Movie Review)
उपरोक्त म्हटल्याप्रमाणे जाधव कुटुंब काही कारणास्तव लंडनला गेलं आहे. तिकडे त्यांना नीरज नावाच्या एका गृहस्थाने फसवलं आहे. त्या पार्टचे हक्क मिळवण्यासाठी हा कपटी नीरज (विद्याधर जोशी) उलथापालथ करतोय. त्याच्या सोबतीला मल्लेश विजयवाडा (प्रवीण तरडे) आहे. जो या जाधव कुटुंबियांना गोड-गोड बोलून स्वतःच्या ‘पॅटर्न’मध्ये अडकवतो. त्यामुळे आता या अतरंगी पॅटर्न मधून सुटण्यासाठी जाधव कुटुंबीय कर्मधर्म संयोगाने पुन्हा एकदा खटारा गाडीत बसून लंडनचे रस्ते पालथे घालतात. हाच चकचकीत, पण रंगदार प्रवास यावेळी दिग्दर्शक सुदेश मांजरेकर, महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का २’मध्ये रेखाटला.
सिनेमांचा कथाविस्तार पूरक झाला आहे. पण, पटकथा आणि त्यातील तर्क डगमगले आहे. त्याकडे तुम्ही वास्तविक नजरेने पाहू शकत नाही. तसं केल्यास तुम्हाला सिनेमा अवाजवी दिसेल. त्यामुळे अक्षरशः ‘मॅड कॉमिक कॉमेडी’ म्हणून ‘दे धक्का’कडे तुम्हा प्रेक्षकांनी पाहायला हवं. हेच लेखक दिग्दर्शकाला अपेक्षित असावं. (De Dhakka 2 Movie Review)
सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यावेळीही यशस्वी झाली आहे. पण, सर्वांमध्ये सर्वाधिक रंगदार भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचे अतिरिक्त संवाद लिहिले आहेत. परिणामी ही त्यांच्या भूमिका पडद्यावर अधिक जिवंत होते आणि प्रेक्षकांना भावते.
दुसरीकडे सिद्धार्थ जाधव आणि त्याचा क्लेप्टोमेनिया आपल्याला पोट धरुन हसवतात. अक्षरशः आपण त्याच्या सीन्सला टाळ्या पिटतो. बाकी शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी, विद्याधर जोशी, संजय खापरे, अभिजित देशपांडे यांनी आपापल्या परीनं उत्तम काम केलं आहे. (De Dhakka 2 Movie Review)
=========
हे देखील वाचा – Ekda Kaay Zala Movie Review: बाप-लेकाच्या नात्याचा नितांतसुंदर, हळवा प्रवास
=========
सायली ही व्यक्तिरेखा साकारणारी ‘गौरी’ तिच्या नृत्यसादरीकरणामुळे सिनेमानंतर विशेष लक्षात राहते. लहान वयात तिनं केलेला नृत्याविष्कार दखलपात्र आहे. आता हा सिनेमा चहूबाजूंनी धमाल मस्ती घडवणारा असला तरी; यात तुम्ही तुमचे वस्तुनिष्ठ तर्क लावायला जाऊ नका. नाहीतर तुम्ही म्हणाला लंडनचा पीएम त्याच्या झेड सिक्युरिटीविना बेधडकपणे कसा फिरतो? इकडे आमच्या एकदा एका आमदाराच्या मागे-पुढे लांबच्या लांब गाड्यांची रांग लागलेली. त्यामुळे प्रेक्षकहो वास्तवाशी कथेला थेट जोडू नका. ‘सटायर’ म्हणूनच त्याकडे रंजक दृष्टीने पाहा आणि हा सिनेमा संपल्यावर थेट थिएटर बाहेर पडू नका. क्रेडिट लिस्ट सुरु असताना; शेवटचा सिन बघायला विसरु नका.. तो तुमच्या थोतरीत मारल्याशिवाय राहणार नाही.
सिनेमा : दे धक्का २
निर्माते : स्वाती खोपकर, अमेय खोपकर, यतीन जाधव
कथा/ पटकथा : महेश मांजरेकर
दिग्दर्शक : महेश मांजरेकर, सुदेश मांजरेकर
संवाद : गणेश मतकरी
कलाकार : मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी
छायांकन : करण रावत
दर्जा : तीन स्टार