मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
एका सिनेमाचा मृत्यू…दिग्दर्शक जोडीला धक्का!
वॉर्नर ब्रदर्स या बलाढ्य हॉलिवूड स्टुडिओने ‘बॅटगर्ल (Batgirl)’ हा चित्रपट आपण बासनात गुंडाळत आहोत, असं जाहीर केलं आणि हॉलिवूडमध्ये जणू खळबळच उडाली. खरंतर, चित्रपटाचं काम बंद पडण्याचे किंवा शूटिंग सुरु होण्यापूर्वीच प्रोजेक्ट रद्द होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. पण ‘बॅटगर्ल’ची गोष्ट वेगळी आहे.
मार्व्हल आणि डीसी यांच्यातली स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे. एकीकडे मार्व्हलने पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात म्हणजे २०२५ पर्यंत आपल्या चित्रपटांची यादीच मोठा गाजावाजा करून जाहीर केली, अशावेळी ‘बॅटगर्ल (Batgirl)’ चित्रपट रद्द होणं हे डीसी भक्तांसाठी खूपच क्लेशदायक आहे.
बरं ‘बॅटगर्ल (Batgirl)’ चित्रपटाचं चित्रीकरण २०१९ सालीच पूर्ण झालं होतं. चित्रीकरणावर ७० मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साडेपाच अब्ज रुपये खर्च झाले होते. पुढे पोस्ट-प्रॉडक्शनवर आणखी २० मिलियन डॉलर्स खर्च झाले. ‘बॅटगर्ल’ झालेल्या लेस्ली ग्रेस या अभिनेत्रीने ‘मी किती प्रचंड उत्सुक आहे’ अशा मुलखाती द्यायलाही सुरुवात केली होती. मायकल कीटन ‘बॅटमॅन’च्या भूमिकेत, ‘बॅटगर्ल’चे वडील कमिशनर गॉर्डनच्या भूमिकेत जे.के.सिमन्स आणि खलनायक फायरफ्लायच्या भूमिकेत ब्रॅंडन फ्रेझर अशी तगडी स्टारकास्ट होती. एवढं सगळं होऊनही आम्ही हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेत आहोत, असं निर्मात्यांनी जाहीर केल्यामुळे कलाकार, दिग्दर्शक, डीसी फॅन्स सगळ्यांनाच धक्का बसला.
खरंतर, २०२२ वर्षाअखेर किंवा पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत चित्रपट प्रदर्शित करता येईल का, यावर विचार सुरु होता. थेट ओटीटीवर (वॉर्नर ब्रदर्सचं ‘एचबीओ मॅक्स’ हे स्वतःचं ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.) प्रदर्शित करावा का, यावरही चर्चा सुरु होती. याच दृष्टीने काही ट्रायल शोज आयोजित करण्यात आले होते. निवडक प्रेक्षक प्रतिनिधी, समीक्षक यांना चित्रपट दाखवण्यात आला. या सर्व शोजमध्ये अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आणि त्यामुळेच ‘बॅटगर्ल’ला ग्रहण लागलं.
‘जेसन किलार आणि ॲन सर्नऑफ’ हे जेव्हा वॉर्नर ब्रदर्सची धुरा सांभाळत होते तेव्हा ‘बॅटगर्ल (Batgirl)’ चित्रपटावर काम सुरु झालं होतं. या दोघांची कारकीर्द कोविड काळात थोडी वादग्रस्त ठरली होती कारण या काळात त्यांचे जेवढे चित्रपट आले ते त्यांनी प्रदर्शित झाल्या झाल्या ‘एचबीओ मॅक्स’ या त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टाकण्याचा निर्णय घेतला. ओटीटी सबस्क्रायबर्स वाढवण्याकडे त्यांचा कल होता, पण त्यामुळे हॉलिवूडमधील क्रिएटिव्ह मंडळी नाराज झाली होती.
त्यानंतर मग वॉर्नर ब्रदर्स आणि डिस्कव्हरी यांचं मर्जर झाल्यावर नव्या कंपनीचे सीईओ झाले डेव्हीड झास्लाव्ह. झास्लाव यांनी सूत्रं हाती घेताच हॉलिवूडमध्ये कंपनीबद्दल जी काही नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला. किलार आणि सर्नऑफ यांनी ‘एचबीओ मॅक्स’ लोकप्रिय करण्यासाठी जे निर्णय घेतले होते ते झास्लाव्ह यांनी बदलले. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणं ही त्यांची प्राथमिकता होती. याचाच फटका ‘बॅटगर्ल’ला बसला.
ट्रायल शोज मधून ज्या प्रतिक्रिया मिळत होत्या त्या बघून ‘बॅटगर्ल’बद्दल त्वरित निर्णय घेणं गरजेचं होतं. झास्लाव्ह सोबत असलेल्या इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ‘बॅटगर्ल (Batgirl)’ हा चित्रपट मोठ्या पडदयावर फार काही करू शकेल असं वाटत नाही आणि त्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे ओटीटी वरही त्याचं फार काही घडणार नाही. तरीही ‘बॅटगर्ल (Batgirl)’ प्रदर्शित करायचं म्हटलं, तर त्यासाठी पुन्हा बरीच रक्कम खर्च करावी लागेल. तेव्हा झाला तेवढा खर्च पुरे झाला, याउप्पर आणखी तोटा सहन करायला नको असा विचार करून चित्रपटाचं प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय झाला.
निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा दिग्दर्शक जोडीला मोठा धक्काच बसला. आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह यांनी यापूर्वी ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ सारखे चित्रपट आणि ‘मिस मार्व्हल’ ही टीव्ही सिरीज दिग्दर्शित केलेली आहे.
===========
हे देखील वाचा – दिग्दर्शक जाफर पनाही यांच्या अटकेचा होतोय जगभरातून निषेध
===========
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, “आम्हाला या बातमीने खूप मोठा धक्का बसलाय. आमचा अजूनही विश्वासच बसत नाहीये. आमचं काम प्रेक्षकांपर्यंत पोचणं हे दिग्दर्शक म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटेल याचाच विचार आम्ही पहिल्या दिवसापर्यंत करत होतो, पण आता जे काही घडलंय ते अतिशय दुर्दैवी आहे.”