दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा बाबूजींनी निशिगंधा वाड यांना चेहऱ्यावरचा मेकअप उतरवायला लावला तेव्हा …
निशिगंधा वाड (Nishigandha Wad)! नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीमधली एक लोकप्रिय अभिनेत्री. मराठी, हिंदी चित्रपट नाटक, व मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अत्यंत हुशार आणि उच्चविद्याविभूषित असणाऱ्या निशिगंधा वाड उत्तम कविताही करतात. यांनी तीन विषयांमध्ये पीएचडी केली असून मराठी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. अर्थात याचं श्रेय काही प्रमाणात त्यांच्या घरातील वातावरणालाही जातं.
एकत्र कुटुंब, वडील आर्मीमध्ये तर, आई शिक्षिका. घरात मनोरंजन क्षेत्राचं वातावरण अजिबात नव्हतं. पण आधुनिक विचार, संस्कृती आणि संस्कारांची उत्तम सांगड असणारं वातावरण असल्यामुळे निशिगंधा आणि त्यांच्या बहिणीला आपलं आवडतं क्षेत्र निवडायचा अधिकार होता आणि त्यासाठी प्रोत्साहनही मिळालं. सहावीमध्ये असताना निशिगंधा यांना अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेकांना अभ्यासाची शिष्यवृत्ती माहिती असते, पण अभिनयाच्या क्षेत्रातही शिष्यवृत्ती मिळते ही गोष्ट मात्र अनेकांसाठी नवीन असेल. ही शिष्यवृत्ती तबला, नृत्य, गायन, वादन अशा विविध कलांसाठी ‘राष्ट्रीय प्रतिभा सांस्कृतिक शोध मंडळा’तर्फे (National Talent Cultural Search Board) देण्यात येते. यासाठीचा अर्ज शाळेतर्फे केला जातो.
अत्यंत संस्कारी कुटुंबात वाढलेल्या निशिगंधा वाड यांच्या कुटुंबातील सर्वजण बोर्डाच्या परीक्षेत मेरिटमध्ये आलेले होते. परंतु निशिगंधा तेव्हा नाटकांमधून काम करत असल्यामुळे त्या बोर्डात येतील असं कोणालाच वाटत नव्हतं. उलट त्या मेरिटमध्ये येणार नाहीत आणि कुटुंबाचा रेकॉर्ड ब्रेक करणार, असंच सर्वांचं मत होतं. पण निशिगंधा हुशार होत्या. त्यांनी नाटक व अभ्यास या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या आणि दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या मेरिटमध्ये आल्या. (Lesser Known story of Nishigandha Wad)
दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या वेळी नेमका पोस्टमन्सचा संप होता. निशिगंधाजी तेव्हा घरात पायरीवर बसून आपल्या निकालाची वाट बघत होत्या. कारण बोर्डात आल्याचं त्यांना आधीच कळलं होतं, पण मग “तार का येत नाही” या विचाराने त्या काहीशा नाराज झाल्या होत्या. नंतर त्यांच्या आईने शाळेत जाऊन त्यांचा निकाल आणला.तेव्हा कुठे त्यांचं टेन्शन दूर झालं. पुढे नाटक सांभाळून त्या बारावीलाही मेरिटमध्ये आल्या. त्यांनतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. निशिगंधाजी प्रचंड हुशार असूनही त्यांना कलाक्षेत्रात येण्यासाठी कुटुंबाकडून कोणतीही आडकाठी करण्यात आली नाही.
बाबूजी म्हणजेच सुधीर फडकेंच्या निशिगंधाजी खूप लाडक्या होत्या. त्यावेळी सुधीर फडके सावरकरांच्या आयुष्यावर आधारित एक नवीन चित्रपट काढण्याच्या तयारीत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते बासू भट्टाचार्य. त्यावेळी बापूजींनी बासूजींना ‘माईंच्या’ भूमिकेसाठी निशिगंधाजींचं नाव सुचवलं. परंतु बासुजी त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांनी निशिगंधाजींना भेटायला बोलावलं.
बापूजींनी निशिगंधा यांना याबद्दल सांगितलं आणि त्यांना म्हणाले, “ तू जाशील तेव्हा तुझ्याबरोबर मी येईन त्यांना भेटायला.” भेटायच्या दिवशी निशिगंधाजींनी छान मेकअप केला आणि आपल्या घरातून -अंधेरीहून बासूजींना भेटायला निघाल्या. बापूजीही दादरहून निघाले त्यांच्या गाडीच्या मागे निशिगंधाजींची गाडी होती. परंतु वाटेत जेव्हा निशिगंधाजींना त्यांनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले, “मला वाटलंच होतं, म्हणून मी म्हटलं, मी येतो बरोबर.” (Lesser Known story of Nishigandha Wad)
निशिगंधाजींना काही कळतच नव्हतं नेमकं काय झालं. तेवढ्यात बापूजी पाण्याची बाटली घेऊन आले आणि ती निशिगंधाजींकडे देत म्हणाले, “चेहरा व्यवस्थित धुवून काढ. चेहरा स्वच्छ दिसला पाहिजे.” यावर निशिगंधाजी म्हणाल्या, “हे काय बापूजी, डोळ्याखालची काळी वर्तुळं दिसतील ना.”
त्यावर बापूजी म्हणाले, “दिसू देत! ‘माई सावरकर’ करायच्या आहेत.” निशिगंधाजींनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि चेहरा स्वच्छ धुवून सगळा मेकअप काढून टाकला. त्यानंतर त्या बासूजींकडे गेल्या. मेकअप काढल्यामुळे आत्मविश्वास गळून गेला होता. तशाच अवस्थेत त्या बासूंजींसमोर बसल्या.
निशिगंधांजींकडे बघून बासूजी म्हणाले, “ये माई दिखही नही सकती!” कारण माई अत्यंत साध्या दिसायच्या. पण सुधीरजीं आत्मविश्वासाने म्हणाले, “दिखेगी, एकदम दिखेगी, यहीच माई दिखेगी!”. दुर्दैवाने चित्रपटाचं जवळपास ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आणि बासू दा यांचं निधन झालं. त्यानंतर असा ८० टक्के चित्रित झालेल्या चित्रपटाचा उर्वरित भाग दिग्दर्शित करण्यास दुसरा दिग्दर्शक तयार होईना. पुढे जेव्हा चित्रपटाचं पुन्हा चित्रीकरण करायचं ठरलं तेव्हा निशिगंधाजी आठ महिन्यांच्या गरोदर होत्या त्यामुळे त्यांना हा चित्रपट करता आला नाही. पुढे या ना त्या कारणाने चित्रपट प्रदर्शित व्हायला खूप उशीर झाला. (Lesser Known story of Nishigandha Wad)
========
हे देखील वाचा – प्रदीप पटवर्धन: एकेकाळी रिझर्व्ह बँकेत केली होती नोकरी पण …
========
कलाकारांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. एखाद्या देवतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायचं भाग्य मिळतं. त्या व्यक्तिरेखेसाठी जीवापाड मेहनत घेऊनही काही कारणाने ती पडद्यावर उभी राहत नाही. त्यावेळी होणारं दुःख कलाकार शब्दात नाही व्यक्त करू शकत.निशिगंधाजींचंही असंच झालं. म्हणूच आज यशस्वी असूनही त्या ‘राहून गेलेल्या भूमिकेचं’ दुःख त्या विसरू शकत नाहीत.
– भाग्यश्री बर्वे