‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा वर्णद्वेषाचा फटका स्मिता पाटील यांना बसला…. तो ही भारतात!
आपल्या देशात चेहऱ्याच्या, त्वचेच्या रंगाला फार महत्त्व आहे. समाजात गोऱ्या रंगाला ‘स्मार्ट’ समजण्याचा आपल्याकडे चुकीचा ट्रेंड सेट झाला आहे. यामुळे सावळ्या व्यक्तीला कॉम्प्लेक्स येऊ शकतो. हे कधी कोणी विचारात घेतलंच नाही. कित्येक सावळ्या मुलींचे भावविश्व यामुळे कोमेजून तर गेलेच आणि त्या आत्मविश्वास सुध्दा हरवून बसल्या. त्यामुळेच मध्यंतरी काही सामाजिक संघटनांनी ‘ब्लॅक इज ब्युटीफूल’ हे आंदोलन करून सौंदर्यप्रसाधन तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्टचे नाव बदलायला लावले. (Smita Patil)
रंगावरून स्त्रियांना खूप अपमान झेलावे लागतात. हा काळ फार जुना नाही. आपल्याकडील मीडिया आणि जाहिरातीतसुद्धा गोरा रंग म्हणजेच ‘चांगला’ असं इतकं बिंबवलं गेलं की, त्यामुळे सावळ्या व्यक्ती आयुष्यात डिप्रेशन मध्ये गेल्या. आता काळ बदलतोय पण लोकांच्या मनातील मानसिकता मात्र अजूनही तशीच आहे. याचा फटका अभिनेत्री स्मिता पाटीलला देखील बसला होता.
स्मिता पाटील (Smita Patil) अतिशय संवेदनशील अभ्यासू आणि मनस्वी कलावंत होती. अभिनयासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तिची तयारी होती. तिच्या अभिनयातून याची प्रचिती प्रेक्षकांना येत होती. एक बुद्धिजीवी अभिनेत्री म्हणून तिने लौकिक कमावला होता. पण याच स्मिता पाटीलला तिच्या रंगावरून लहानपणापासून खूप टोमणे ऐकून घ्यावे लागते होते. स्मिता सावळी होती, सडपातळ होती, तिचे लुक्स देखील अगदीच चारचौघींसारखेच. ‘हीरोइन’ बनण्याचं ‘सो कॉल्ड मटेरियल’ तिच्यामध्ये नव्हतं.
मुंबई दूरदर्शनवर बातम्या सांगत असताना ती निर्मात्यांच्या नजरेस पडली आणि रुपेरी पडद्यावर तिचे आगमन झाले. १९७४ सालच्या श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ या चित्रपटापासून स्मिता पाटील ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर आली. त्यानंतर अवघ्या दहा ते अकरा वर्षांमध्ये तिने अभिनयाचे शिखर गाठले. अनेक पुरस्कार तिला मिळाले. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले. अभिनय कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ स्मिता पाटीलने (Smita Patil) पुढच्या पिढीसमोर ठेवला.
१९७७ साली आलेल्या ‘भूमिका’ या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेसाठी स्मिताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर स्मिता पाटील आणि पुरस्कार असं एक समीकरणच बनून गेलं. सुरुवातीला कलात्मक तथा समांतर सिनेमात भूमिका करणारी स्मिता ऐंशीच्या दशकात मेन स्ट्रीम सिनेमात देखील दिसू लागली. नमक हलाल, शक्ती, बाजार, अर्थ या सिनेमातून स्मिता कुठेही मिस फिट वाटली नाही.
आता मूळ विषयाकडे येऊया. हा किस्सा आहे १९८० सालचा. त्यावेळी स्मिता पाटीलच्या ‘चक्र’ (दिग्दर्शक: रवींद्र धर्मराज) या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग दिल्लीमध्ये एका फिल्म फेस्टिव्हल मध्ये होणार होते. या कार्यक्रमासाठी स्मिता पाटील (Smita Patil) दिल्लीला जाणार होती. तिच्यासोबत तिची मोठी बहीण अनिता तसंच अभिनेत्री पूनम धिल्लन ह्या देखील होत्या. तिघी दिल्लीला पोहोचल्या आणि कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या. तिथे गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, आपण आपल्याला मिळालेले ‘स्पेशल डेलिगेट पास’ आणायचे विसरलो आहोत.
सिक्युरिटीने या तिघींना अर्थातच अडवले. या तिघींनी हर तऱ्हेने सिक्युरिटीला समजावून सांगायचा प्रयत्न केला की “आम्ही अभिनेत्री आहोत आणि आमच्याकडे असलेले पास आम्ही घरी विसरलेलो आहोत तरी आम्हाला कार्यक्रमाला आत जाऊ द्या.” स्मिता पाटील तर म्हणाली, “आत माझ्याच एका चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू होत आहे. मला आत जाणे गरजेचे आहे.”
तो काळ मोबाईलचा नव्हता त्यामुळे आयोजकांना फोन करून बोलावण्याचा प्रश्नच नव्हता. बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर सिक्युरिटीने पूनम धिल्लन आणि अनिता पाटील यांना आत सोडले. पूनमला हीरोइन म्हणून मानायला तो तयार झाला आणि अनिता पाटील देखील गोऱ्या असल्यामुळे त्यांना आत पाठवले. परंतु स्मिता पाटीलला मात्र तो काही केल्या हीरोइन मानायला तयार नव्हता. एक तर तिच्याकडे रंग रूप नव्हतं. त्या दिवशी ती मेकअप देखील करून गेलेली नव्हती. त्यामुळे एक चारचौघींसारखी दिसणारी साधी मुलगी ‘मी हिरोईन आहे’ म्हणते हे त्याला पटत नव्हते.
त्याला सांगून सांगून स्मिता (Smita Patil) थकली आणि तिथेच बसली. काही केल्या सिक्युरिटी तिला आत सोडायला तयार नव्हता. त्यावेळी पहिल्यांदाच तिला आपली बाह्य रूपावरून आपली परीक्षा केली जाते याची पुन्हा एकदा जाणीव झाली. हा सारा प्रकार पंधरा – वीस मिनिटे चालला. पूनम धिल्लन आत जाऊन सरळ महेश भट यांना भेटली आणि त्यांना सगळा प्रसंग सांगितला.
=========
हे देखील वाचा – भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण
=========
महेश भट यांना तो खूपच भयंकर प्रकार वाटला ते आयोजकांना घेऊन लगेच एन्ट्री गेट जवळ गेले आणि तिथे बसलेल्या स्मिता पाटीलची जाहीर माफी मागून तिला आत घेऊन गेले. तो सिक्युरिटी गार्ड देखील लज्जित झाला आणि स्मिता पाटील यांना त्यांच्या सीटपर्यंत सोडायला गेला.