बॉयकॉट इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ
आज बऱ्याच दिवसांनी एक मित्र भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विषय सिनेमावर आला. मग इकडचा तिकडचा सिनेमा.. मराठी सिनेमा.. दक्षिणेतला सिनेमा.. असा विषय घरंगळत शेवटी अपेक्षेप्रमाणे बॉलिवूडवरही आलाच. साहजिकच विषय होता लालसिंग चड्ढाचा. कारण सध्या त्याच सिनेमाची अशी तशी चर्चा सुरू आहे. (Boycott trend)
मित्र म्हणाला, “लालसिंग बघितलास?” मी म्हटलं, “नाही.” मला म्हणाला, “चांगला आहे. म्हणजे, त्याचं ट्रेलर बघून तितकं इम्प्रेशन पडत नाही. पण सिनेमा चांगला आहे. चांगलं एडाप्टेशन आहे”, असं म्हणत त्याने अतुल कुलकर्णीचंही कौतुक केलं.
त्यानंतर पुढची पाच मिनिटं तो लालसिंगवर बोलत राहिला आणि मी ते ऐकत होतो. अचानक आमच्यात एक शांतता आली आणि त्या शांततेला चिरणारा एक प्रश्न त्यानेच केला की, “बॉयकॉट करून काय मिळालं आपल्याला?” किती महत्वाचा प्रश्न आहे हा.
शेवटी आपण जे काही करत असतो ते कशासाठी करतो आहोत.. हे आपल्याला कळलं की विषय संपतो. पण त्याचा ताळा लागेनासा होतो तेव्हा मात्र काही खरं नाही हे लक्षात येतं. आमीर खानच्या या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आणि अचानक बॉयकॉट आमीरचे नारे लागू लागले. लालसिंगलाच बॉयकॉट करण्याचे प्रकार सुरू झाले. त्याची कॅम्पेन्स डिझाईन करण्यात आली. ही बॉयकॉटची उबळ इतकी जोरात आली की, आमीर खानला येऊन बाबांनो, बॉयकॉट करू नका असं सांगावं लागलं.
मुद्दा तो उरत नाहीच. हा बॉयकॉट कशासाठी? आमीरसाठी? म्हणजे ज्या आमीरने जो जिता.. कयामत से कयामत तक, सरफरोश, लगान, दंगल यांसारख्या सिनेमातून आपलं रंजन केलं.. ज्याने तारे जमींन पर यांसारखा सिनेमा प्रोड्युस केला.. ज्याने अभिनय तर केलाच, पण तेवढ्यापुरतं न थांबता जो माणूस साततत्याने महाराष्ट्रातल्या गावांसाठी पाण्यावर काम करतो आहे.. ज्याने एक मोठी मोहीम राबवली आहे.. त्या आमीर खानबद्दल आपण बॉयकॉटची भाषा करतोय.. बरोबर ना? (Boycott trend)
काय गंमत आहे पहा.. यावर चिडून समजा आमीरने आपण केलेलं रंजन.. ज्या ज्या गावांमध्ये त्याच्या पाणी फौंडेशनने पाणी आणलं त्या गावातलं पाणी.. परत घेतलं तर? चालणार आहे का आपल्याला.. ? काय गंमत असते. बॉयकॉट लालसिंग..चे नारे दिले जात होते तेव्हा आमीर एकटा मीडियाशी बोलत होता. त्याना समजावत होता. पण त्यावेळी आमीरच्या बाजूने भूमिका घेणारे कोणीच नव्हते. फार नंतर अर्जुन कपूरने बॉयकॉटबद्दल स्टेटमेंट दिलं. त्यानंतर आत्ता आत्त काही कलाकार त्यावर बोलू लागले आहेत. पण मुद्दा त्या पलिकडे आहे की या बॉयकॉटने आपण नक्की काय मिळवलं?
हळूहळू हे बॉयकॉटचं प्रकरण वाढत जाणारं आहे. यात इतरही अनेक लोक सापडतील. कदाचित यात करण जोहर असेल.. यात आदित्य चोप्रा असेल.. यात रणवीर सिंगही असूच शकेल. कारण नेपोटिझमपासून पार भावना दुखावलेले अनेक दाखले देत बॉयकॉटच्या घोषणा दिल्या जाऊ शकतात. पण मुद्दा त्यानंतर येतो. यातून साध्य काय होणार आहे?
एकिकडे योगी आदित्यनाथ सिनेसृष्टीला उत्तर प्रदेशात बोलावू लागले आहेत. दक्षिणेतली मंडळी तर आता संपूर्ण भारतात आपल्या चित्रपटांनी थैमान घालू लाागली आहेत. अशावेळी महाराष्ट्रातलं वातावरण अशा पद्धतीने गढूळ होणं हे आपल्याला परवडणारं नाही. याची फार मोठी किंमत येत्या काळात मोजावी लागणार आहे.
अतुल कुलकर्णी म्हणतो तसं लोकांना एकतर सिनेमा आवडतो किंवा आवडत नाही. या पलिकडे काहीच नसतं. मग लोकांना तो सिनेमा आवडला आहे किंवा नाही हे लोक ठरवू देत. मुळात त्यांंना एखादा सिनेमा पाहावा वाटतोय की नाही वाटत हा त्यांचा चॉइस असायला हवा. (Boycott trend)
==============
हे ही वाचा: दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा
सिनेमा एक श्वास ते सिनेमा कोटी कोटीची उड्डाणे…
=============
सोशल मीडियाच्या मदतीने आपण जर अशापद्धतीने जोरजबरदस्ती करणार असू, तर ते फारसं फलदायी नाही. इंडस्ट्रीला आणि त्यात राहणाऱ्या कलाकारांना याचा फार फरक पडत नाही. कारण, त्यांची दुनिया वेगळी आहे. अशा वर्तनाने आपण आपलं भवताल गढूळ करतो.. हे आपल्या लक्षात यायला हवं. ते आलं तर ठीक आहे. नाही आलं लक्षात तर.. आपल्या संस्कृतीचं.. संस्कारांचं आरोग्य धोक्यात आहे असं समजायला चिक्कार वाव आहे. बघा एकदा विचार करून…