‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दिलीप कुमारच्या आठवणीत राहिलेली रमझान ईद; यामागे होते एक खास कारण..
सिनेमाच्या छोट्या छोट्या प्रसंगातून कलावंतांचे मोठेपण नकळतपणे अधोरेखित होत असते आणि याच गोष्टी कलावंतांना आणखी मोठं करत असतात. हा किस्सा तसा जुना आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.
१९४९ सालच्या ‘अंदाज’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक मेहबूब यांनी दिलीप कुमार यांना रणजीत स्टुडिओचे मालक शेठ चंदुलाल शहा यांना भेटण्यासाठी पाठवले. त्यानुसार दिलीप कुमार (Dilip Kumar) दुसऱ्या दिवशी चंदुलाल शहा यांना भेटायला गेले. त्यावेळी शहा यांच्यासोबत तिथे रणजीत स्टुडिओचे दिग्दर्शक जिया सरहदी उपस्थित होते. शेठ चंदुलाल शहा यांनी दिलीप कुमारला सांगितले की, “हे जिया सरहदी तुम्हाला घेऊन एक चित्रपट बनवण्याचा विचार करीत आहेत.”
सरदार चंदुलाल शहा हे त्या काळात खूप मोठं नाव होतं. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेले होते. जिया सरहदी यांनी सिनेमाचे कथानक दिलीप कुमार यांना ऐकवले आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी लगेच चित्रपटात काम करायला होकार दिला. त्यावर सरहदी यांनी त्यांच्या मानधनाबाबत विचारले. त्यावेळी दिलीप कुमार यांनी, “सेठजी जो रकम देंगे उसे हम कबूल कर लेंगे..” असे सांगितले. लगेच शेठ चंदुलाल शहा यांनी ॲग्रीमेंट लेटर तयार केलं आणि सही करण्यासाठी दिले. त्यावेळी दिलीप कुमारला एका चित्रपटात काम मानधन तीस हजार रुपये मिळत होते. पण या ॲग्रीमेंटवर मानधन म्हणून वीस हजार रुपये लिहिले होते. दिलीप कुमार यांनी तात्काळ त्यावर सही केली आणि चित्रपटात काम करायला सुरुवात केली.
हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच रमजान ईदचा सण आला. त्यावेळी शेठ चंदुलाल शहा यांनी दिलीप कुमारला आपल्या घरी ईदच्या निमित्ताने बोलावले. ईदच्या दिवशी अनेक नामवंत जेष्ठ कलावंत शहा यांच्या घरी आले होते. ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर चंदूलाल शहा यांनी दिलीप कुमारला त्यांच्या रूम मध्ये बोलावले.
तिथे गेल्यानंतर चंदूलाल शहा यांनी दिलीप कुमार यांना एक लिफाफा दिला आणि सांगितले, “आपल्याकडे रिवाज आहे मोठ्या व्यक्तींनी छोट्या वयाच्या व्यक्तीला ईदीच्या निमित्ताने ‘ईदी’ देण्याचा. माझ्याकडून ही ईदी तुम्हाला मी देत आहे.” दिलीप (Dilip Kumar) यांनी मोठ्या आस्थेने त्यांच्याकडून ईदी स्वीकारली आणि ते घरी जायला निघाले.
घरी जाताना गाडी त्यांनी तो लिफाफा उघडून पाहिला त्यात त्यांना एक चेक दिसला यावर दहा हजार रुपये अमाऊंट लिहिली होती. दिलीप कुमारला हे खूप विचित्र वाटलं. एवढी मोठी ईदी घेणे प्रशस्त नाही असं त्याला वाटलं. ताबडतोब त्याने ड्रायव्हरला गाडी परत शेठच्या घरी न्यायला सांगितले. तिथे गेल्यानंतर दिलीपनी तो लिफाफा शेठ चंदुलाल शहा यांना परत केला आणि सांगितले, “शेठजी इतनी ईदी नही चाहिये. इसे आप मेरी गुस्ताखी ना समजते हुए कबूल करले..” त्यावर चंदुलाल शहा म्हणाले, “ज्यावेळी मार्केटमध्ये तुम्हाला तीस हजार रुपये मानधन मिळत असताना तुम्ही माझा सिनेमा केवळ वीस हजार रुपयात साइन केला. हा मोठेपणा तुम्ही त्या दिवशी दाखवलात. आज मला ते दहा हजार रुपये द्यायचे आहेत. सिनेमा पूर्ण होत आला आहे. तुम्ही सिनेमाचे पैसे म्हणून स्वीकारणार नाही म्हणून मी ईदी म्हणून तुम्हाला देत आहे. मेरी आपको दिल से गुजारीश है मेरे इस ईद के तोहफे कबूल किजीएगा..”
सेठ चंदूलाल शहा यांचे ते उद्गार ऐकून दिलीप कुमारचे डोळे भरून आले. पुढे आयुष्यभर त्यांनी प्रत्येक ईदच्या दिवशी या प्रसंगाची आठवण ठेवली. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ईदी असा त्यांनी त्याचा उल्लेख केला.
=================
हे ही वाचा: जेव्हा सुनील बर्वे यांनी नोकरी सोडल्याचं होणाऱ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले…
आवर्जून पाहाव्यात अशा सामाजिक घटनांवर आधारित या टॉप 5 वेबसिरीज
==================
९ ऑक्टोबर १९५३ रोजी प्रदर्शित झालेला ‘फुटपाथ’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. समाजाला आरसा दाखवणारा हा चित्रपट होता. या सिनेमाचे संवाद दिग्दर्शक जिया सरहदी यांनीच लिहिले होते. यातील एक डायलॉग काही दिवसापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियावर खूप गाजला होता. हा डायलॉग होता, “जब लोग भूख से मर रहे थे तब तुम उनके हिस्से का अनाज उंचे दाम मे बेचकर तुम्हारे खजाने भर रहे थे, जब शहर मे बिमारी फैली तुमने दवाईया छुपा दी और उनके दाम बढा दिये….”
दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मीनाकुमारी यांचा हा पहिला चित्रपट होता. मजरूर सुलतानपुरी आणि अली सरदार जाफरी यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती. खय्याम यांचे या सिनेमाला संगीत होते. या सिनेमातील तलत मेहमूद यांनी गायलेले, “शाम ए गम की कसम आज गम गी है हम आ भी जा आ भी जा आज मेरे सनम….” हे गाणे आज देखील लोकप्रिय आहे.