या लोकप्रिय अभिनेत्रीचे बारसे मनोज कुमार यांनी केले होते…
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता मनोज कुमार आपल्या भावाला म्हणजेच राजू गोस्वामी यांना आणि आपल्या मेव्हण्याला म्हणजेच अशोक भूषण यांना लॉन्च करण्यासाठी एका चित्रपटाची निर्माण निर्मिती करणार होते. त्यासाठी त्यांनी कथा निश्चित केली होती तसंच पटकथेवरचे काम देखील झालं होतं. फक्त नायिका निवडणे बाकी होते. त्याप्रमाणे सिनेमाच्या नायिकेचा शोध घ्यायला सुरुवात झाली.
त्याकाळात मिस इंडिया कॉन्टेस्टसाठी भारतातून ‘शशिकला’ या अभिनेत्रीची निवड झाली होती. सतरा वर्षांची शशिकाला दक्षिणात्य भागातून आली होती आणि एवढ्या कमी वयात तिची थेट मिस इंडिया साठी निवड झाली. ज्यावेळी मनोज कुमारना ही बातमी समजली त्यावेळी त्यांनी लगेच शशिकलाशी संपर्क साधला आणि आपल्या नवीन चित्रपटाचे प्रपोजल तिच्यासमोर ठेवत या सिनेमातील नायिकेची भूमिका ऑफर केली. त्यावेळी शशिकलाने सांगितले, “मला चित्रपटांमध्ये काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. शिवाय मी यापूर्वी कधी कुठल्या नाटकात देखील काम केलेले नाही. त्यामुळे अभिनयाशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही.” तरी मनोज कुमार यांनी तिला अभिनेत्री बनण्याची गळ घातलीच आणि अखेर शशिकला अभिनेत्री बनायला तयार झाली.
शशिकलाच्या होकारानंतर चित्रीकरण सुरू झाले. आता प्रश्न आला की, ‘शशिकला’ या नावाची भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात आधीच एक अभिनेत्री होती. जी तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी लोकप्रिय होती. त्यामुळे या नवीन अभिनेत्रीचे नाव ‘शशिकला’ ठेवून चालणार नव्हते. मग हे नाव बदलायचे ठरवले. मनोज कुमारला शशिकला मध्ये हेमामालिनीचा भास होत होता. म्हणून त्याने हेमामालिनीचेच रुपेरी पडद्यावरील कुठले तरी नाव या अभिनेत्रीला देण्याचे ठरवले. पुन्हा प्रश्न निर्माण झाला कारण आशा, गीता, बसंती, कम्मो हीच नावे समोर येऊ लागली. अभिनेत्री शशिकलाचे नाव काही फायनल होत नव्हते.
शेवटी मनोज कुमारनी हेमामालिनीने त्याच्यासोबत केलेल्या चित्रपटातील तिची नावं आठवायला सुरुवात केली आणि त्यातून एक नाव निश्चित झाले. जे मनोज कुमार यांच्या ‘क्रांती’ या चित्रपटात हेमामालिनी रुपेरी पडद्यावरील नाव होते. हे नाव होते, मीनाक्षी. अशा प्रकारे ‘शशिकला’ या नव्या अभिनेत्रीचे नाव ‘शशिकला शेषाद्री’ वरून ‘मीनाक्षी शेषाद्री’ झाले.
चित्रपट पूर्ण झाला. या चित्रपटाचे नाव होते ‘पेंटर बाबू’. चित्रपटातील गाणी त्या काळात रेडिओ सिलोन वर खूप चालली. चित्रपट मात्र फ्लॉप झाला. मीनाक्षी शेषाद्री मात्र क्लिक झाली. खरं तर मीनाक्षीने साईन केलेला हा पहिला सिनेमा होता. पण सिनेमाचे चित्रीकरण रेंगाळले. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुभाष घई यांनी मीनाक्षीला ‘हिरो’ चित्रपटासाठी नायिकेची भूमिका ऑफर केली. तिनेही ही ऑफर लगेच स्वीकारली. पुढे हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. पण मीनाक्षीने सर्वात आधी साईन केलेला सिनेमा हा मनोज कुमार यांचा ‘पेंटर बाबू’ हाच होता.
‘पेंटर बाबू’ ची कथा मनोज कुमार यांनी वीस वर्षांपासून सांभाळून ठेवली होती. उत्तम सिंग आणि जगदीश खन्ना यांनी ‘उत्तम – जगदीश’ या नावाने चित्रपटाला संगीत दिले होते. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेली गाणी कदाचित रसिकांना आठवत असतील. “ओ मेरे सजन बरसात में आ….” हे लताचे गाणे खूप सुंदर आहे. कब तलक शम्मा जली याद नही’, ‘जब याद की बदली छाती है’..हि गाणी मस्त जमली होती. पण चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे ही गाणी मागे पडली. जाता जाता एक छोटी आठवण.
================
हे ही वाचा: किशोरदांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे निर्मात्याने घेतली होती कोर्ट ऑर्डर…
‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील
=================
‘पेंटर बाबू’ चित्रपटात नीलिमा नावाची एक अभिनेत्री देखील होती. तिने पुढे सचिनच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटात भूमिका केली होती. अशोक सराफ सोबतचे तिचे गाणे ‘निशाणा तुला कळला ना…’ हे खूप लोकप्रिय ठरले होते. बघा, एकातून दुसरी आणि दुसरीतून तिसरी आठवण निघत जाते.