ऑडिशनच्या दिवशी हातात मिळालेलं मराठी भाषेतलं स्क्रिप्ट बघून सोनाली म्हणाली…..
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)! खरं तर ती मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी हे नाव लोकप्रिय होतं. पण तिला याचं दडपण आलं नाही, म्हणूनच कदाचित तिने तिचं नावही बदललं नाही. सुरुवातीला मालिका आणि नंतर काही चित्रपट केले, पण तिला खरी ओळख मिळाली ती नटरंग चित्रपटामुळे. या चित्रपटाने तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिलीच त्याचबरोबर तिला एक नवीन नाव मिळालं – ‘अप्सरा!’
सोनाली मूळची पुण्याची. तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झालं. लहानपणापासून सोनाली अभ्यासात हुशार होती. शिवाय आर्मीच्या कडक शिस्तीमध्ये वाढल्यामुळे तिच्यादृष्टीने वेळेला प्रचंड महत्त्व आहे. सोनाली मराठी अतिशय छान बोलते. पण लहानपणापासून तिच्या घरी मराठमोळं वातावरण अजिबातच नव्हतं. आई पंजाबी आणि वडील मराठी. त्यातही दोघंही जण आर्मीमधले. शाळेतही विविध भाषिक मुलं असल्यामुळे मराठीशी तसा संबंध कमीच. आजी-आजोबांशी तोडक्या – मोडक्या मराठी भाषेत बोलायची तेवढाच काय तो मराठीशी संबंध.
शाळेत असतानपासूनच सोनालीला कलाक्षेत्राचं आकर्षण होतं. कोणताही चित्रपट बघून आल्यावर आरशासमोर उभं राहून त्यातले डायलॉग्ज म्हणणं हा तिचा आवडता छंद होता. याचबरोबर तिला सर्वात जास्त आनंद देणारी एक गोष्ट होती ती म्हणजे नृत्य. तिला नृत्य करायला प्रचंड आवडतं. शाळेत असतानाही ती विविध कार्यक्रमात भाग घेत असे. पण तिने नृत्याचं कोणतंही अधिकृत शिक्षण घेतलं नव्हतं. पण असं काहीतरी घडलं की, तिने ‘भरतनाट्यम’ या नृत्यप्रकाराचं अधिकृत शिक्षण घेतलं. (Lesser Known story of Sonalee Kulkarni)
त्यावेळी सोनाली आठवीमध्ये होती. पुढच्या वर्गातील काही मुली कार्यक्रमासाठी नृत्य बसवत होत्या. ते पाहून तिला वाटलं, “मला पण हे करायचं आहे.” परंतु त्यावेळी नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण नसल्यामुळे तिला, “तू हे करू शकत नाहीस कारण तू नृत्याचं कोणतंही अधिकृत शिक्षण घेतलेलं नाहीस”, असं सांगण्यात आलं. यानंतर मात्र सोनालीने नृत्य शिकायचं ठरवलं.
सोनालीने त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या भास्करन् नायर यांच्याकडे भरतनाट्यमचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने अरंगेत्रम पूर्ण केलं. पुढे दहावीनंतर सोनालीने पुण्यातल्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजला सायन्स साईडला ॲडमिशन घेतली. तिला डॉक्टर व्हायचं होतं. पण त्याचवेळी तिचं मन कलाक्षेत्राकडेही ओढ घेत होतं. त्यामुळे तिने बारावीनंतर मास कम्युनिकेशन करायचा निर्णय घेतला. याच दरम्यान तिला ‘हा खेळ संचिताचा’ ही मालिका मिळाली. या मालिकेमध्ये तिची निवड कशी झाली याचाही गमतीशीर किस्सा सोनालीने एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.
सोनालीने त्यावेळी मनोरंजन क्षेत्रात यायचं निश्चित केलं होतं. त्यामुळे ती ऑडिशन्स देत होती. मराठी भाषा फारशी अवगत नसल्यामुळे तिने मराठी मालिका किंवा चित्रपटांचा त्यावेळी विचारच केला नव्हता. असंच एके ठिकाणी एका मालिकेसाठी कत्थक नृत्याची जाण असणारी मुलगी हवी आहे, हे समजल्यावर ती ऑडिशन द्यायला गेली. (Lesser Known story of Sonalee Kulkarni)
ऑडिशनला गेल्यावर तिच्या हातात पानभर स्क्रिप्ट देण्यात आलं. स्क्रिप्ट मराठीमध्ये होतं. त्यामुळे स्क्रिप्ट हातात पडताक्षणी ती म्हणाली, “एवढं मराठी वाचायला मला दोन तास लागतील.” ज्या भूमिकेसाठी सोनाली ऑडिशन देत होती ती भूमिका विक्रम गोखलेंच्या नातीची भूमिका होती आणि मालिकेच्या दिग्दर्शिका होत्या उषा देशपांडे. सोनालीचं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, “काही हरकत नाही. तू हवा तितका वेळ घे. तू दिसायला अगदी विक्रमजींच्या नातीसारखी दिसतेस, शिवाय तुला नृत्यही छान येतं. फक्त मराठीचाच प्रॉब्लेम आहे ना? ते बघू आपण करू काहीतरी.” त्यांच्या शब्दांनी सोनालीला धीर आला. तिने व्यवस्थित तयारी करून ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली.
================
हे ही वाचा: मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
डर: चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हृतिक रोशनने निभावली होती महत्त्वाची भूमिका
=================
‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेनंतर सोनालीने काही मालिका आणि चित्रपट केले. परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ती नटरंग या चित्रपटामुळे. यामधली तिची भूमिका आणि ‘अप्सरा आली…’ हे नृत्य प्रचंड गाजलं. अर्थात या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनतही घेतली होती. मराठी भाषेवर त्यातही गावरान मराठी भाषा हुबेहूब बोलण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. ज्या मुलीला पहिल्या मालिकेच्या ओडिशाच्या वेळी पानभर मराठी वाचणंही कठीण वाटत होतं त्या मुलीने निव्वळ चित्रपटातील भूमिकेसाठी संपूर्ण कादंबरी वाचून काढली. नटरंगच्या यशाने तिच्या या मेहनतीचं चीज झालं.
सोनाली आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरस्थावर झाली आहे. तिला मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांसह पंजाबी भाषाही येते. इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसताना प्रचंड मेहनतीने तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. आजही अप्सरा म्हटल्यावर आपल्यासमोर सोनालीचाच चेहरा येतो.
– भाग्यश्री बर्वे