डर: चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हृतिक रोशनने निभावली होती महत्त्वाची भूमिका
बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहेत ज्यामध्ये नायकांपेक्षा खलनायकाच्या भूमिका जास्त लोकप्रिय झाल्या. यापैकीच एक चित्रपट म्हणजे डर! सनी देओल, जुही चावला आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या यशाचा सर्वात जास्त फायदा झाला तो शाहरुख खानला. (Unknown facts about Darr)
खरंतर त्या काळात सनी देओल शाहरुख खानपेक्षा अधिक लोकप्रिय होता. जुही चावलाचं करिअर तेव्हा नुकतंच बहरायला लागलं होतं. तर शाहरुख खान इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी धडपडत होता. या अगोदर बाजीगर चित्रपटामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. अशा परिस्थिती डर चित्रपटामध्ये पुन्हा नकारार्थी भूमिका स्वीकारणं त्याच्या करिअरसाठी ‘रिस्की’ ठरणारं होतं. पण तरीही शाहरुखने ही भूमिका स्वीकारली. आणि या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला दिशा दिली.
सुनील आणि किरणच्या सुखी आयुष्यात एक वादळ येतं. किरणवर जीवापाड एकतर्फी प्रेम करणारा राहुल तिला मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. अगदी किरण आणि सुनीलचं लग्न झाल्यावरही राहुल हार मानत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील आणि किरणला आपल्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण करणारी व्यक्ती राहुल आहे याची सुतरामही कल्पना नसते. उलट दोघंही राहुलला आपला जवळचा मित्र समजत असतात. मात्र म्हणतात ना सत्य फार काळ लपून राहत नाही. अगदी तसंच होतं आणि सुनीलला राहुलवर संशय यायला सुरुवात होते. अखेर राहुलचा ‘पर्दाफाश’ होऊन चित्रपटाचा शेवट गोड होतो.
तसं बघायला गेलं तर, कथानकामध्ये विशेष दम नव्हता. याआधी आलेल्या अनेक चित्रपटांमधून अशा प्रकारचं कथानक दाखवण्यात आलं होतं. पण तरीही डर वेगळा ठरला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी. दिग्दर्शक यश चोप्रा आणि सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंग यांनी एका साध्या कथानकाला आकर्षक पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर केलं. आणि त्यावर चांगल्या गाण्यांचा तडका मारल्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला.
चित्रपटाबद्दल एवढं सारं लिहीत असताना चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सिन’ घडलेल्या काही गोष्टींबद्दल आवर्जून लिहायलाच हवं. जाणून घेऊया त्याबद्दलच थोडंसं (Unknown facts about Darr)-
१ राहुलच्या भूमिकेसाठी शाहरुखचा विचारच झाला नव्हता
आता हे तर ‘ओपन सिक्रेट’ आहे की, ‘डर’मधली शाहरुखची भूमिका आधी आमिर खानला ऑफर झाली होती. परंतु आमिरही या भूमिकेसाठी ‘फर्स्ट चॉईस’ नव्हता. तर या भूमिकेसाठी ‘फर्स्ट चॉईस’ होता अजय देवगण. परंतु अजय त्यावेळी उटीला दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने नकार दिला. IMDB नुसार या भूमिकेसाठी संजय दत्त आणि सुदेश बेरीच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. परंतु संजय दत्त त्यावेळी जेलमध्ये गेल्यामुळे तो हा चित्रपट करू शकत नव्हता.
२. आमिरने नकार दिलाच नव्हता
डर चित्रपटाला दिलेला नकार ही आमिरच्या आयुष्यातली मोठी चूक समजली जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र आमिरने हा चित्रपट करण्यात रुची दाखवली होती. आमिर खानने चित्रपट समीक्षक राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्याशी झालेल्या चॅटमध्ये यासंदर्भांत खुलासा केला होता की, त्याने डर मधील राहुलच्या भूमिकेला नकार दिला नव्हता. परंतु त्याने या स्क्रिप्टमध्ये बरच बदल करून मागितल्यामुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. (संदर्भ: https://indianexpress.com/)
३. किरणच्या भूमिकेसाठी जुही होती तिसरी पसंती
जेव्हा स्क्रिप्ट लिहिण्यात आलं तेव्हा या भूमिकेसाठी सनी देओल, दिव्या भारती आणि आमिर खान या तीन नावांचा विचार करण्यात आला होता. परंतु, आमिर खानने दिव्या भारती सोबत काम करण्यास नकार दिल्याने किरणची भूमिका रविना टंडनला ऑफर करण्यात आली होती. परंतु तिनेही नकार दिल्यामुळे ही भूमिका जुहीला मिळाली आणि तिच्या खात्यात अजून एका हिटची भर पडली.
४. ऋषी कपूरच्या नावाचाही विचार झाला होता
आमिर खानला चित्रपटातून काढल्यावर यश चोप्रांनी सनी देओलला सुनील किंवा राहुल यापैकी कोणतीही एक भूमिका स्वीकारण्याची मुभा दिली होती. तसेच यश चोप्रांच्या डोक्यात ऋषी कपूरचं नावही घोळत होतं. त्यामुळे या दोन्ही भूमिकांसाठी त्यांनी ऋषी कपूरलाही विचारलं. परंतु ऋषी कपूर इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने नकार दिला आणि राहुलच्या भूमिकेसाठी शाहरुखचं नाव सुचवलं. अखेर ऋषी कपूरने नाव सुचवल्यामुळे राहुलची भूमिका शाहरुखला मिळाली.
=======
हे देखील वाचा – आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
=======
५. हृतिक रोशनची महत्वाची भूमिका
आदित्य चोप्रा यांना उदय चोप्रा आणि हृतिक रोशनने ‘डेड कॅम’ हा ऑस्ट्रेलियन रोमँटिक थ्रिलर चित्रपट जबरदस्तीने पाहायला लावला होता. (या चित्रपटात निकोल किडमन आणि सॅम यांच्या प्रमुख भूमिका होत्या.) परंतु नाईलाजाने पाहिलेल्या या चित्रपटावरूनच त्यांना रोमँटिक थ्रिलर चित्रपट बनविण्याची प्रेरणा मिळाली आणि डर चित्रपटाची कल्पना सुचली.
६. चित्रपटाचे आधीचं नाव होतं ‘किरण’
चित्रपटासाठी ‘किरण’ हे नाव आधी निश्चित करण्यात आलं होतं. परंतु नंतर हृतिक रोशनच्या सांगण्यावरून चित्रपटाचे नाव ‘डर’ असं ठेवण्यात आलं.