अनिकेत विश्वासराव: ‘या’ कारणासाठी घेतला मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय
अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) म्हणजे मराठीमधला चॉकलेट बॉय. मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून घराघरांत पोचलेला हा अभिनेता पक्का मुंबईकर आहे. अर्थात असं असलं तरी त्याचा जन्म मात्र गुजरातमधला आहे आणि त्याला गुजराती पदार्थ प्रचंड प्रिय आहेत.
अनिकेत एका संपन्न आणि एकत्र कुटुंबात जन्माला आला. कुटुंबातला मोठा मुलगा असल्यामुळे सर्वांचाच तो लाडका होता. त्याचं बालपण सुखात गेलं आहे. अगदी लहानपणी त्याने काही अभिनेता वगैरे व्हायचं स्वप्न बघितलं नव्हतं. कॉन्व्हेंट शाळेत शिकत असल्यामुळे तिथे स्पोर्ट्स, डिबेट्सला अशा गोष्टींना जास्त महत्त्व होतं. नाटक, एकांकिका वगैरे गोष्टींना फारसा वाव नव्हता.
अनिकेतची शाळा होती सेंट फ्रान्सिस हायस्कूल, बोरिवली. ही पूर्णपणे मुलांची शाळा होती. शाळेत असताना एका एकांकिकेमध्ये अनिकेतने चक्क मुलीची भूमिका केली होती. याचं कारण होतं त्याचा गोड चेहरा. त्याच्या गोड चेहऱ्यामध्ये शाळेतील गॅदरिंगमध्येही त्याला अनेकदा मुलीची भूमिका दिली जायची आणि तो ती आनंदाने करायचाही!
अनिकेतचं बालपण दहिसरमध्ये गेलं आहे. तिथे गणेशोत्सवासह अनेक सण उत्साहाने साजरे होत. या सणांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असे. त्यामध्ये अनिकेतचे वडील अनेकदा नाटक बसवायचे. त्या नाटकाच्या तालमी घरात होत असत. मुळात अनिकेतच्या वडिलांनी नोकरी सांभाळून व्यवसायिक नाटकांमध्ये काम केलं आहे. या साऱ्यामुळे घरात थोडंफार कलात्मक वातावरण होतंच. अर्थात तरीही अनिकेतने तेव्हा करिअर म्हणून अभिनय किंवा कलाक्षेत्राचा विचार केला नव्हता.
दहावीनंतर अनिकेतने एम.एल.डहाणूकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे पूर्णपणे एकांकिका स्पर्धांसाठी पूरक वातावरण होतं. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने एकांकिका स्पर्धांमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. मोठ मोठे कलाकार तिथे तालमी घ्यायला जात असत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत असे. त्यामुळे अनिकेतच्या अभिनय क्षेत्राकडचा ओढा वाढला. तरीही अजूनही त्याने करिअर म्हणून या क्षेत्राचा विचार केला नव्हता.
एम.एल. डहाणूकर कॉलेजमध्ये शिकत असतानाच अनिकेतने पहिल्याच एकांकिकेमध्ये नथुराम गोडसेंची भूमिका केली होती. ही एकांकिका पुढच्या फेरीत प्रवेश करू शकली नाही. शिवाय त्याचा परफॉर्मन्सही खूप वाईट झाला होता. त्यामुळे ही गोष्ट अनिकेतच्या मनाला लागली. त्यानंतरच्या एकांकिकेमध्ये मात्र त्याने मन लावून काम केलं. त्याच्या मेहनतीचं चीज झालं आणि त्याला पुरस्कारही मिळाला.
कॉलेजमध्ये असतानाच त्याला ‘नायक’ या मालिकेमध्ये ‘लीड रोल’ करायची संधी मिळाली. “कसं जगायचं.. कसं वागायचं… कोणी सांगेल का मला…” असं म्हणत मोठा झालेला ‘रोहन’ म्हणजेच अनिकेत होता. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर अनिकेतला इंडो फ्रेंच प्रॉडक्शनच्या एका फिल्म लीड रोल करायची संधी मिळाली. पुढे त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. यासाठी त्याने ‘फॉरेन ट्रेंड’ च्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. कोर्स सुरु असतानाच त्याच्याकडे नाटकात काम करण्याची संधी चालून आली. पण या संधीचा लाभ घेणं ही त्याच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती.
अनिकेतला नाटकाचा फोबिया होता. त्यात सिलेक्शन करणार होते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले. पण अनिकेतने निराश न होता सकारात्मक विचार केला आणि स्वतःलाच आव्हान द्यायचं ठरवलं. मुळात अनिकेत प्रॅक्टिकल स्वभावाचा असल्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींनी तो भारावून जात नाही. त्याचा हा स्वभाव त्याला इथे कामी आला. अनिकेतने ठरवलं सिलेक्शनचं शिवधनुष्य पेलू शकलो, तर याच क्षेत्रात करिअर करेन. अर्थातच त्याची निवड झाली आणि त्याने अभिनय क्षेत्रात कारकीर्द करणायचा निर्णय घेतला.
अनिकेतने (Aniket Vishwasrao) आत्तापर्यंत कित्येक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण मालिकांच्या बाबतीत बोलायचं तर, त्याने केवळ नायक, ऊन पाऊस आणि कळत नकळत या तीनच मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेता म्हणून त्याची शेवटची मालिका होती २००९ सालची ‘कळत नकळत’. यानंतर मात्र त्याने कोणत्याही मालिकेमध्ये काम केलं नाही.
===============
हे ही वाचा: मीना कुमारी: बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीनची एक सुखद आठवण
वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?
==============
याचं कारण म्हणजे त्याच्या लक्षात आलं होतं की, मालिका किंवा ‘डेली सोप’मध्ये काम करण्यात मजा नाही, इथे त्याचं मन रमत नाही. सलग २ वर्ष एकच भूमिका करण्यात कंटाळवाणी गोष्ट आहे. चित्रपटांमध्ये काम करताना एका चित्रपटानंतर दुसरा चित्रपट लगेच करता येतो. विविधरंगी भूमिका करता येतात. तशीच संधी नाटकांमध्येही असते. अभिनेत्याला नाविन्याची भूक असते आणि ही भूक चित्रपट आणि नाटक पूर्ण करतात. शिवाय यामध्ये विविध दिग्दर्शक व कलाकारांसोबत काम करायला मिळतं. त्यामुळे अनिकेतने मालिकांमध्ये काम थांबवून चित्रपट व नाटकांवर आपलं लक्ष केंद्रित केलं.
आज अनिकेत (Aniket Vishwasrao) मराठी मनोरंजन क्षेत्रामधील एक नामांकित कलाकार आहे. त्याने २० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये, तर काही नाटकांमध्येही काम केलेलं आहे. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती त्याच्या नवीन चित्रपटाची.
– भाग्यश्री बर्वे