दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आर. के. स्टुडिओतील “शिनाख्त”चा मुहूर्त
पिक्चरची घोषणा झाली, स्क्रीनमध्ये पानभर जाहिरात दिली आणि तेथेच तो बंद पडला. पिक्चरचा दणदणीत मुहूर्त झाला, त्याची जोरशोरसे चर्चा रंगली, तरी त्याची पुढची पावले पडलीच नाहीत.पिक्चरचे पाच, सात जाऊ देत, अगदी पंधरा, सोळा रिळांचे शूटिंगही झाले. तरीही प्रगती खुंटली. अहो, चक्क पिक्चर पूर्ण झाला, पब्लिसिटीही पूर्ण झाली आणि तरीही तो दुर्दैवाने प्रदर्शित झाला नाही. काहीही चित्रपटाच्या जगात घडू शकते. अगदी कुंडली मांडून एकाद्या ज्योतिषाकडून चांगला मुहूर्त काढूनही असे घडत असते. सहज कधी अशा पडद्यावर न आलेल्या चित्रपटांची आठवण येते तेव्हा अशा चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टीग डोळ्यासमोर येते आणि मनात विचार येतो, यातील काही चित्रपट जरी पडद्यावर आले असते तरी ‘सिनेमाचा इतिहास’ नक्कीच बदलला असता. बदलायला हवाही होता. असाच एक चित्रपट म्हणजे, टीनू आनंद दिग्दर्शित ‘शिनाख्त'(Shanakht) ( १९८९).
आर. के. स्टुडिओत एका संध्याकाळी याचा मुहूर्त असल्याचे आमंत्रण हाती येताच एका विशेष गोष्टीने लक्ष वेधून घेतलेच, पण मनात घरही केले. अमिताभ बच्चन व माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत ही ती इंटरेस्टिंग रंजक गोष्ट होती. अहो, तेव्हा एक प्रकारे ही ब्रेकिंग न्यूज होती. अमिताभने खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यात विशेष रस घेतल्याने त्याच्या ‘हम’ , ‘अग्निपथ’, ‘रुद्र’, ‘खुदा गवाह’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘आलिशान ‘,’बंधुया ‘, ‘राम की सीता श्याम की गीता’, तुफान’, ‘लव कुश’ अशा नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताची आमंत्रणे आता सतत येत होती. काय दिवस होते हो ते आणि अमिताभचा त्या काळात मिडियावर बहिष्कार असल्याने त्याच्या या चित्रपटांच्या मुहूर्ताना आवर्जून हजर राहण्यात आम्ही सिनेपत्रकार विशेष रस घेत होतो. अक्षरश: धावत होतो. त्यातील काही चित्रपट बनलेच नाहीत ही वेगळीच स्टोरी… अहो, अमिताभला प्रत्यक्ष पाहायला मिळतेय हा आनंद शब्दात सांगता न येणारा. तो अनुभवायलाच हवा. आणि तो त्याच शब्दात मांडल्याने हुकमी रिडरशीप. ‘शिनाख्त'(Shanakht) मध्ये अमिताभच्या जोडीला माधुरी हे मला भारी वाटत होते. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब ‘ (१९८८), सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन’ ( १९८९), राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव ‘ ( १९८९) या यशाच्या हॅटट्रीकने माधुरी स्टार झाली होती. यशच असते हो सगळे काही. अशातच विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा ‘ ( १९८९) ऐन दिवाळीत रिलीज झाला आणि त्याच सुमारास अशातच ‘शिनाख्त’चा मुहूर्त!
माधुरी दीक्षितसाठी हा झक्कास टेक ऑफ होता. काही योग यावे लागतात हेच खरे. नशीबापेक्षा ते जास्तच महत्वाचे. टीनू आनंद व अमिताभ हे तर मित्रच..टीनू आनंद दिग्दर्शित ‘कालीया ‘ ( १९८१), ‘शहेनशाह ‘ ( १९८८) नंतर पुन्हा अमिताभसोबतचा चित्रपट हा योग छान होता. अशा अनेक गोष्टींवर ‘फोकस ‘ टाकण्याची उत्तम संधी असा विचार करतच आर. के. स्टुडिओत पोहचलो. नवीन पिक्चरचा मुहूर्त म्हणजे, एका भव्य स्टेजवर भला मोठा सेट आणि त्यावर जोरदार संवादाचे दृश्य या हिट समिकरणाची सवय असल्याने आता हा मुहूर्त कधी होतोय आणि त्यासाठी सेटवरचा पडदा कधी उघडतोय याची वाट पहाणे आवश्यक होते. प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत फिल्डवर्कवर दीर्घकाळ वावरल्याने जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहण्याची सवय ( खरं तर चिकाटी) असल्याने यावेळच्या तासभर उशीराचे एवढे ते काय?
पटकथा लेखक वसंत साठेसाहेबांनी मुहूर्त क्लॅप देताच समोरचा पडदा बाजूला होताच मालगाडीचा भला मोठा सेट दिसतोय , गाडी सुरु असल्याच्या फिलने हलतोय तोच भल्या मोठ्या साखळदंडाला जखमी अवस्थेत बांधलेला अमिताभला पाहतोय तोच माधुरी दीक्षित येऊन त्याला बिलगली. आणि दोघांनी व्हीलन मंडळींचा खातमा करण्याची शपथ घेतली. बॅकग्राऊंडचा माल ट्रेन चालण्याचा आवाज कमी कमी होत गेला आणि सर्वांनीच टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. यावेळी अमिताभसोबतचा चित्रपट मिळाल्याने अतिशय मनोमन सुखावलेल्या माधुरीचे एक्प्रेशन आजही मला लख्ख आठवतयं. कॅमेर्याच्या आगेमागे अनुभवलं/ पाहिलं ते हेच. ते जास्त महत्वाचे. अतिशय निरागस आनंद होता तो. अहो, त्या काळात अमिताभची नायिका बनण्याची बातमी येणेही बहुत कुछ होते, नायिका बनण्याचा फंडा म्हणजे, उत्तुंग यश. आणि तो लाभ माधुरीला झाल्याचे तिच्या भरभरुन मनसोक्त बोलण्यात जाणवले. माधुरी स्टार होती तरी त्या काळात सेटवर भटकंती करणाऱ्या आम्हा तीन चार महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांशी ती उत्तम मराठीत बोले. हे आम्ही सिनेपत्रकार आवर्जून प्रेमाने लिहायचो बरं का? माधवी, सुजाता मेहता एव्हाना समोर आल्या आणि चित्रपटाची स्टार कास्ट समजली. अमिताभ अर्थातच मुहूर्त दृश्याचे फोटो सेशन होताच निघून गेला. वसंत साठेसाहेबांशी गप्पांत अनेक तरी जुन्या आठवणी, दुर्मिळ माहिती मिळते याचा पूर्वानुभव असल्याने यावेळीही तेच कर्तव्य पार पाडले.
======
हे देखील वाचा : मेहबूब स्टुडिओ आणि देव आनंदचे घट्ट नाते…
======
‘शिनाख्त’ (Shanakht) म्हणजे चेहऱ्याची ओळख. एकाद्याचा तपास करणे या अर्थाने हा शब्द वापरला जातो. अमिताभ असल्याने काही भारी पाह्यला मिळेल असे या मुहूर्तापासूनच वेध. पण कसचं काय हो? हा चित्रपट बंद कधी पडला हे समजलेच नाही. असे होतच असते, हादेखील चित्रपट निर्मितीमधील एक भाग आहे असे कितीही खरे असले तरी ‘शिनाख्त’ (Shanakht) पडद्यावर यायला हवा होता. घोषणेपासून काही रिळांच्या शूटिंगपर्यंत अमिताभच्या बंद पडलेल्या चित्रपटांची संख्या पस्तीस चाळीसपर्यंत जात असली तरी ‘शिनाख्त’ (Shanakht) वेगळा अनुभव ठरला असता. ( त्या अपूर्ण अमिताभपटावर एकदा फोटोसह फोकस टाकणार आहेच.) माधुरी दीक्षितला या चित्रपटाच्या न बनण्याने काय वाटले असेल विचार करा. माधुरीचा अमिताभसोबतचा हाच हुकमाचा एक्का खेळला गेला नाही असे नव्हे तर इंद्रकुमार दिग्दर्शित ‘रिश्ता’ ( १९९४) या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन, आमिर खान व माधुरी दीक्षित अशी जबरा स्टार कास्ट जमली, अंधेरीतील एका पंचतारांकित हाॅटेलमधील मुहूर्त पार्टीत जोरदार धमाका झाला आणि हाही चित्रपट या पार्टीतील खाद्यपदार्थांची चव जिभेवर असतानाच हा चित्रपटही बंद पडला.
चेंबूरच्या आर. के. स्टुडिओतील माझ्या आठवणी बहुस्तरीय आहेत, खूप आहेत. रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ ( १९९१) च्या या स्टुडिओतील मिनी थिएटरमधील आम्हा समिक्षकांच्या प्रेस शोपासून कालांतराने हा स्टुडिओ विकला गेल्यावर तो पाडला तेव्हा त्याला भेट दिली यापर्यंत माझ्या अनेक आठवणी आहेत. ‘शिनाख्त’ची आठवण त्यात वेगळीच.