‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!
काही गाणी अमरत्वाचा पट्टा घेऊनच जन्माला आलेली असतात. कारण ही गाणी कधीच विसरली जात नाही किंवा कधीच जुनी होत नाही. मराठी भाव संगीताच्या दुनियेतील एक गाणं जे ध्वनिमुद्रित होऊन आज जवळपास ७५ वर्षे झाली आहेत पण या गीताची खुमारी आणि लोकप्रियता आजही अबाधित आहे. हे गाणं कवी पी सावळाराम यांनी लिहिलं होतं. तर त्याला संगीत वसंत प्रभू यांचे होते आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. या भावगीताचे (soul song) बोल होते ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा…’ आपल्या समृध्द संस्कृतीचा इतिहास पुढच्या पिढीकडे तसाच पाठवायचा असतो, त्यामुळे या भावगीताच्या (soul song) निर्मितीचा आणि लोकप्रियतेचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत जावा हा या लेखाचा अंतस्थ हेतू आहे. ख्यातनाम मराठी लेखक चरित्रकार मधु पोतदार यांनी जनकवी पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू यांच्यावर दोन अतिशय दर्जेदार ग्रंथ लिहिले आहे. त्यात या गाण्याचा उल्लेख आहे. हे भावगीत पी सावळाराम यांना कसं सुचलं? याचे उत्तर स्वतः सावळाराम यांनीच एका ठिकाणी दिले आहे.
१९४८ सालच्या मे महिन्यात पुण्याच्या रेल्वे स्टेशन वरून सावळाराम मुंबईला चालले होते. त्यावेळी नुकतेच लग्न झालेली एक नववधू पहिल्यांदाच सासरी जात होती. आपल्या माहेरच्या आठवणीने आईच्या आठवणीने ती सारखे रडत होती. लहान वयातील ही नववधू आपल्या आईकडे पाहून हुंदके देत होती. आपलं माहेर आता दुरावणार ही भावना तिच्या मनात कल्लोळ निर्माण करत होती. तिच्या आईला सुद्धा आसवं अनावर होत होती. तरी तिची आई तिला निरोप देताना म्हणते,” गंगा यमुना कशाला डोळ्यातून काढतेस? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा….” बस याच दोन ओळी सावळाराम यांच्या मनात घर करून गेल्या. आणि यातूनच या महान भावगीतेची (soul song) निर्मिती झाली. लगेच या ओळींना जोडून त्यांनी तीन चार कडवी लिहून काढली. पुढे ते गाणे संगीतकार वसंत प्रभू यांना दाखवले. या गाण्याचा जन्म जसा पुणे रेल्वे स्थानकावर झाला तसेच या गाण्याला संगीत देखील दादर रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लिंबाच्या वखारीत दिले गेले. काटकरांच्या लिंबाच्या वखारीत पी सावळाराम, वसंत प्रभू, दामू अण्णा माळी आणि मारोतराव कीर यांनी एकत्र बसून या गीताला चालवली. सलग तीन दिवस ते सर्वजण खटपट करत होते. शेवटी एक लडीवाळ चाल त्यांना आवडली. हे गाणे घेऊन ते वसंत कामेरकर यांना भेटले आणि कामेरकरांनी लगेच लता मंगेशकर यांना बोलावून हे गाणे रेकॉर्ड करायचे ठरवले! (soul song)
तो मराठी भाव संगीतातील (soul song) मोठा सुवर्णक्षण होता. लता मंगेशकर, वसंत प्रभू आणि पी सावळाराम पहिल्यांदाच या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि यातूनच या अजरामर गाण्याची निर्मिती झाली. रेकोर्डवर त्यावेळी या गाण्याचा सोबत कपलिंग सॉंग म्हणून ‘हसले ग बाई हसले आणि कायमची मी फसले’ हे गाणं घेतलं होतं. कारण त्यावेळी भावगीताच्या दुनियेत हे दुःखी गाणं चालेल की नाही याची शंका त्यांना वाटत होती. म्हणून दुसरं लाईट मूड चे गाणे त्यांनी घेतलं होतं. पहिला ५००० रेकॉर्ड चा लॉट कोलंबिया काढला होता आणि ह्या रेकॉर्ड हातोहात संपल्या. आजच्या काळात पाच हजार आकडा कदाचित छोटा वाटेल परंतु त्या काळातील समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता तो खूप मोठा होता. कारण त्या काळात ग्रामोफोन घरात असणे हीच फार दुर्मिळ गोष्ट होती. परंतु असे असताना देखील हा लॉट हातोहात खपला गेला आणि या गाण्याच्या लोकप्रियतेला प्रमुख कारण ठरले आकाशवाणी! ऑल इंडिया रेडिओवर या गाण्याने अक्षरशः लोकप्रियतेचा कळस गाठला. लोक या गाण्यासाठी रेडिओचे पारायण करू लागले. त्याकाळी रेडिओला लोक पत्र पाठवत असत. असं म्हणतात की आकाशवाणीला रोज इतक्या पत्रांचा पाऊस सुरू झाला की शेवटी आकाशवाणीने जाहीर केले,” कृपया आता पत्र पाठवू नका. आम्ही रोज यावेळेला हे गाणं ऐकवत जाऊ!” या लोकप्रिय सोबतच आणखी काही दंतकथा देखील तयार झाल्या. या गाण्याच्या रेकॉर्ड्स ब्लॅक मध्ये विकल्या जाऊ लागल्या. अडीच रुपयाची रेकॉर्ड आठ ते दहा रुपयाला काळ्या बाजारात विकली जाऊ लागली. त्याच प्रमाणे या गाण्याच्या लोकप्रियतेची दखल बीबीसी रेडियो ने देखील घेतली आणि तिथे देखील हे गाणे प्रसारित केले गेले.(soul song)
=====
हे देखील वाचा : दादा कोंडके यांचे दोन गुरु भालजी आणि बाळासाहेब!
=====
जनसामान्यांनी जशी या गाण्याला पसंती लाभली तशीच मान्यवरांना देखील हे गाणे प्रचंड आवडले. आचार्य अत्रे यांनी तर ,”गंगा जमुना हे गाणे एका पारड्यात आणि उरलेली सर्व भावगीते (soul song) दुसऱ्या पारड्यात टाकली तर गंगा जमुना चे पारडे जड राहील!” असे सांगितले. त्या काळातील लग्नकार्यात हमखास हे गाणे वाजू लागले. आ. अत्रे तेव्हा विनोदाने म्हणाले होते,” एक वेळ लग्नात मंगलाष्टके नसले तरी चालतील पण गंगा जमुना हे गाणे हवेच.!” सावळारामांचे मित्र कथाकार, पटकथाकार दिग्दर्शक दिनकर पाटील म्हणाले,” जोपर्यंत आपल्याकडे लग्न संस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत या गाण्याची गोडी अवीट आहे.” शब्दप्रभू ग दि माडगूळकर यांनी देखील या गाण्याचे कौतुक करताना “ या गाण्याच्या तुलनेत तुझ्यापेक्षा सुंदर गाणे लिहूच शकणार नाही.” असे सांगितले. पुढे अनेक वर्षांनी गदिमा यांनी याच सिच्युएशनवरती ‘ ओटीत घातली मुलगी विहीणबाई सांभाळ करावा हीच विनवणी…’ हे गाणे लिहिले. पण त्याला देखील या गाण्याची लोकप्रियता मिळाली नाही. महाकवी कालिदास यांनी ‘शाकुंतल’ या महाकाव्यात ‘चालली शकुंतला’ हे गीत लिहिले होते त्याच तोडीचे सावळाराम यांचे ‘गंगा जमुना’ हे गीत ठरले. या गीताच्या दोनदा रेकॉर्ड्स निघाल्या होत्या दुसऱ्या वेळेला जेव्हा हे गीत मार्केटमध्ये आले त्यावेळेला कपलिंग सॉंग बदलले गेले होते यावेळी कपलिंग सॉंग होते. ‘तुझे डोळे पाण्याने भरले …’ या वर्षी हे गाणे ७५ वर्ष पूर्ण करत आहे त्या निमित्ताने या गाण्याची ही कहाणी!