‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
लता दीदींच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त काही आठवणी
आज ६ फेब्रुवारी. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. मागच्या वर्षात एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी दिदीचे गाणे ऐकले नाही अथवा आठवण आली नाही. आज लता दीदींच्या एका अप्रतिम गाण्याच्या मेकिंगचा किस्सा. काही गाण्याच्या निर्मितीच्या वेळचे किस्से वाचून आता वाटतं; त्यावेळी जराही थोडं इकडे तिकडे असतं तर संगीत आणि रसिक केवढ्या मोठ्या कलाकृतीपासून वंचित राहिले असते! खळे काकांच्या एका गाण्याच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. तसे श्रीनिवास खळे सिनेमात फारसे रमले नाहीत. मराठी भावगीत विश्वात अनेक गोड चालींच्या स्वररचना देणार्या खळ्यांनी केवळ पाच-सहा चित्रपटांना संगीत दिले.
‘जिव्हाळा’(१९६८) या चित्रपटाला संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं. गाणी गदिमांची होती. ‘चंदाराणी का गं दिसतेस थकल्या वाणी ’ व ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्नात’ ही पहिली दोन गाणी आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातील तिसरे गाणे होते ’या चिमण्यांनो परत फिरा रे…’ या सांज गाण्याचे माडगुळकरांचे शब्द वाचताच त्यांच्या मनात आलं, हे गाणं लतादीदींकडूनच (Lata Mangeshkar) गाऊन घ्यायचं. सांजगीत असल्यामुळे संध्याकाळच्या ‘पूरिया धनश्री’त मुखडा बांधून अंतऱ्यांसाठी संध्याकाळच्याच ‘मारवा’ रागाची जोड दिली आणि धाडसाने त्यांनी लतादीदींना (Lata Mangeshkar) ‘हे गाणं तुम्ही गावं’ अशी विनंती केली. त्या वेळी लतादीदींना (Lata Mangeshkar) अजिबात वेळ नव्हता. त्या म्हणाल्या, ‘अहो आता माझ्याकडे वेळ कुठं आहे ? सर्व तारखा बुक आहेत. तुम्ही दुसऱ्या कोणाकडून घ्या ना!’ यावर संगीतकार श्रीनिवास खळे म्हणाले ” दुसर्या कडून कसे गावून घेणार? कारण हे गीत केवळ तुमच्यासाठी म्हणूनच केलेलं आहे. तुम्ही गाणार नसाल तर मी हे गाणंच कॅन्सल करतो ” दिदीचा आता नाइलाज झाला; त्या म्हणाल्या ’ठिक आहे ऐकवा चाल..’खळ्यांनी हार्मोनिअमवर जवळ ओढला आणि चाल ऐकवली. आणि..आणि दिदी भारावूनच गेल्या. ‘खळे, तुम्ही जरा थांबा,’ असं म्हणत लतादीदी (Lata Mangeshkar) बाहेर जाऊन हृदयनाथना घेऊन आल्या. म्हणाल्या, ‘बाळ! बघ काय सुंदर गाणं केलंय! परत एकदा ऐकवा!’ खळ्यांनी पुन्हा वाजवून दाखवलं आणि लतादीदी गायला तयार झाल्या!
लतादीदी खळ्यांकडे प्रथमच चित्रपट गात होत्या. बाराही सुरांचा वापर असलेली खळ्यांची ही स्वररचना हा अद्वितीय चमत्कार होता. माडगुळकरांच्या शब्दांमधली आर्त भावना खळ्यांनी नेमक्या स्वरकोंदणात बसवून त्यातील करुण भावनेचा उत्तम परिपोष केला होता. ध्वनिमुद्रण झालं. लतादीदींना खळे गाडीपर्यंत सोडायला गेले. ‘जिव्हाळा’ चित्रपटाचे निर्माते आत्माराम (अभिनेता गुरुदत्त यांचे बंधू) त्याच वेळी लतादीदींना एक लिफाफा देता देता म्हणाले, ‘‘दीदी, आप की ‘फी’ तो हम दे नहीं सकते, लेकीन…’ त्यांचं वाक्य मध्येच तोडून लतादीदी म्हणाल्या, ‘देखो, मैंने सिर्फ खळे साबके लिये गाना गाया है, कितना खुबसूरत गाना बनाया है! मैं पैसे नहीं लुंगी,’
या गाण्याच्या चालीची प्रशंसा माडगुळकरांच्या कानावर गेली. त्यांनी खळ्यांना बोलावून घेतलं. खळे यांनी माडगुळकरांना गाणं एक-दोनदा नाही, तर त्यांच्या आग्रहावरून चक्क अकरा वेळा ऐकवलं. “तुझ्या सूरांनी आणि दिदीच्या स्वरांनी माझ्या कवितेतील आर्त भावना काळजात पोचविल्यास….लेका या देहाला आज तू रडवलंस!”
======
हे देखील वाचा : ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!
======
जाता जाता थोडसं या ‘जिव्हाळा’ चित्रपटा बद्दल. गुरुदत्त फिल्म यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट.निर्मिती गुरुदत्त यांचे बंधू आत्माराम यांची होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गबाले यांनी केलं होतं. सिनेमातील गाणी ग दि माडगूळकर यांनी लिहिली होती चित्रपटाची कथा पंडित महादेवशास्त्री जोशी यांची होती आणि पटकथा संवाद गदिमा यांचे होते. चित्रपटाचे कथानक अतिशय भावस्पर्शी होते. चित्रपटात जयश्री गडकर, नारायण भावे ,गुलाब मोकाशी, , परशुराम, मा. राजीव, माई भिडे, वर्षा, वसंत घोरपडे, विवेक, श्रीकांत मोघे, सुमन जगताप यांच्या प्रमुख भूमिका होत्या. देश हीच माता देश जन्म दाता(आशा) लळा जिव्हाळा शब्दच खोटे(सुधीर फडके) हि अप्रतिम गाणी देखील या सिनेमात होती. सर्व काही व्यवस्थित असूनही पिच्चर मात्र साफ कोसळले! ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ हे गाणे हीच आठवण आता शिल्लक आहे.