दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लतादीदींनी फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात गायला नकार दिला…
हिंदी सिनेमाचा इतिहासात १९५३ सालापासून फिल्म फेयर अवार्डची (Filmfare Award) सुरुवात झाली. आपल्याकडे याला ऑस्करचा दर्जा दिला गेला. त्यामुळे पहिले पासूनच पुरस्काराला महत्त्व लाभले आहे. नंतरच्या काळामध्ये या पुरस्कारामध्ये बऱ्याच ‘गमती जमती’ होऊ लागल्या ही बाब खरी असली तरीही आजही या पुरस्काराला महत्त्व आहेच. लता मंगेशकर यांचे दोन किस्से या पुरस्कारा बाबतचे खूप लोकप्रिय आहेत. पहिला किस्सा असा आहे की, १९५७ सालचे फिल्मफेअरचे पुरस्कार (Filmfare Award) जाहीर झाले. त्या काळात पुरस्कार आधीच जाहीर होत असत आणि समारंभात ते फक्त प्रदान केले जात. त्या वर्षी संगीतकार शंकर जयकिशन यांना त्यांच्या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘चोरी चोरी’ या चित्रपटासाठी फिल्मफेयरचा (Filmfare Award) सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार जाहीर झाला. या समारंभात लता मंगेशकर यांनी या चित्रपटातील सर्वात लोकप्रिय असे ‘रसिक बलमा…’ हे गाणे गावे अशी विनंती संगीतकार शंकर जय किशन यांना फिल्म फेयरच्या आयोजकांकडून करण्यात आली.
संगीतकार जय किशन खूप आनंदी झाले आणि फिल्मफेयरचा निरोप घेऊन ते लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि त्यांना या कार्यक्रमात ‘रसिक बलमा…’ हे गाणे सादर करण्याची विनंती केली. लता मंगेशकर यांनी शांतपणे सर्व ऐकून घेतले त्यांनी संगीतकार शंकर जय किशन यांचे पुरस्कारासाठी अभिनंदन देखील केले. परंतु या समारंभात गाणे गायला नकार दिला. शंकर जयकिशन यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी लता मंगेशकर यांना विचारले ,” दिदी तुम्हाला आनंद झाला नाही का पुरस्काराचा?” त्यावर लता दीदी म्हणाल्या ,”निश्चितच! मला प्रचंड आनंद झाला. परंतु हा पुरस्कार मला मिळालेला नाही. हा संगीतकाराला मिळालेला आहे. हा पुरस्कार जर गायकाला मिळाला असता तर मी निश्चित गाणे गायले असते. हा पुरस्कार संगीतकार शंकर जयकिशन यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी हे गाणे ऑर्केस्ट्रावर सादर करावे.” लता मंगेशकर यांचा हेतू स्पष्ट होता. कारण तोवर फक्त संगीतकारांनाच पुरस्कार मिळत असे. गायक, गायिका आणि गीतकार यांना कुठलाही स्वतंत्र पुरस्कार मिळत नसे. खरंतर या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच सुंदर गाणे जन्माला येत असते. परंतु सुरुवाती पासून फक्त संगीतकारांनाच हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली गेली.
=======
हे देखील वाचा : ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!
=======
या कार्यक्रमात अर्थातच लता मंगेशकर यांनी गाणे गायले नाही. परंतु फिल्मफेयर (Filmfare Award) आयोजकांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी पुढच्या वर्षीपासून बेस्ट सिंगर ही नवीन कॅटेगिरी पुरस्कारामध्ये सुरुवात केली. पुढच्या वर्षी जेव्हा या नवीन कॅटेगिरी नुसार पुरस्कार देण्याची वेळ आली त्यावेळी पहिले नाव अर्थातच लता मंगेशकर यांचे आले. त्यांना ‘मधुमती’ या चित्रपटातील ‘आजा रे परदेसी…’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार (Filmfare Award) मिळाला. परंतु या कार्यक्रमात देखील थोडी गडबड झाली. लता मंगेशकर पुरस्कार मान्य केला परंतु ती ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. याचे कारण त्यांनी ‘स्त्री वर्गाचा अपमान होईल अशी ट्रॉफी बनवली आहे’ असे सांगितले. कारण फिल्मफेअर पुरस्काराच्याची (Filmfare Award) काळ्या बाहुलीच्या अंगावर कुठलेही वस्त्र नाही, आणि अशी ट्रॉफी तुम्ही गौरवाने आणि अभिमानाने मिरवावे असे लताला वाटले नाही म्हणून तिने पुरस्कार स्वीकारला पण ट्रॉफी घ्यायला नकार दिला. फिल्मफेअर वाल्यांनी मग एका वस्त्रामध्ये लपेटून ही ट्रॉफी लताला प्रदान केली! पुढे लताने तीन वेळा पुरस्कार प्राप्त केला. ती गाणी होती, कही दीप जले कही दिल(बीस साल बाद) तुम्ही मेरे मंदीर तुम्ही मेरी पूजा (खानदान) आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह) नंतर सत्तरच्या दशकात त्यांनी स्वतःच जाहीर केले की, यापुढे कृपया फिल्म पुरस्कारसाठी माझ्या नावाचा विचार करू नये नवीन गायिकांना संधी मिळावी हा याच्या मागचा हेतू होता. १९५८ सालापासून बेस्ट सिंगर हि कॅटेगिरी जरी सुरू केली असल त्यात पुन्हा मेल सिंगर आणि फिमेल सिंगर अशी वेगळी कॅटेगिरी १९६७ साला पासून सुरु झाली!