‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘स्टुडिओतील चाळींशी’आजचा प्रेक्षक रिलेट होईल का?
गिरगावात चाळ संस्कृतीत वाढल्याने चाळीचे व्यक्तिमत्व, जीवनशैली, भाषा, सण संस्कृती, शेजारधर्म, ओटीवरच्या गप्पा, नाक्यावरचा टाईमपास, गल्ली चित्रपट, गल्ली क्रिकेट असं बरंच काही अनुभवल्याने आणि माईंडमध्ये फिट्ट असल्याने स्टुडिओतील चित्रपटासाठीचे चाळीचे सेट (Chawl Set) मला ‘कला दिग्दर्शना’चा उत्तम प्रत्यय एवढेच वाटणार ना?
मी आयुष्यातील पहिले शूटिंग खऱ्याखुऱ्या चाळीत पाहिलं हा छान आठवणीतील योगायोग. माझ्या लहानपणीची ही गोष्ट. एके दिवशी सकाळीच आमच्या खोताची वाडीत चाळीचाळीतून बातमी पसरली, खंडेराव ब्लाॅकच्या आतल्या चाळीत ‘मुंबईचा जावई’ या पिक्चरचे शूटिंग आहे. हा एक प्रकारचा आनंद सोहळाच होता. जल्लोष होता. ‘सिनेमा कसा असतो’ हेही माहीत नसल्याच्या वयात ‘शूटिंग पाहायला मिळतेय’ असा आनंद होत असला तरी ‘हे शूटिंग पाहायला झालेल्या गर्दीत फक्त उभे राहून समोर पाहत राहणे’ एवढेच कर्तव्य तेव्हा शक्य होते. काही महिन्यांनी आमच्या गिरगावातीलच मॅजेस्टीक थिएटरला राजा ठाकूर दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा पडद्यावर आपली वाडी किती वेळ आणि कशी दिसते याची असलेली उत्सुकता काही प्रमाणात पूर्ण झाली. तेवढाच आनंद. १९७० सालची ही गोष्ट. (Chawl Set)
कालांतराने मिडियात आल्यावर ‘चाळीचे सेट’ (Chawl Set)पाहायचे काही योग आले. तो अर्थातच माझ्या चौफेर कामाचा एक भागही होताच म्हणा. चित्रपटाचे बहुस्तरीय जग जाणून घेण्याचे त्यात कुतूहलही होते. राहुल रवैल दिग्दर्शित ‘अर्जुन’ साठी परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत लागलेला चाळीचा सेट एकदम भारी वाटला. आजच्या बोली भाषेत ‘डिट्टो’. त्या काळात शूटिंग रिपोर्टींग म्हणजे, सेट (Chawl Set) कसा होता, सेटवर काय काय घडले याचे वर्णन करणे असे. (तेवढ्यासाठी आम्हा सिनेपत्रकारांना हैदराबाद, बंगलोर असे विमानाने नेत. यावरुन अशा सदर लेखनाचे महत्व लक्षात यावे.) राहुल रवैलच्या दिग्दर्शनातील ‘बेताब’ ने सनी देओलने रुपेरी पदार्पण केल्याने त्या दोघांची केमिस्ट्री एकदम साॅलीड जुळल्याचे दिसत असतानाच डिंपलशी सनीशी असलेल्या खास मैत्रीचेही दर्शन सेटवर घडले. ते ओपन सिक्रेट होते, तरी असा आखो देखा हाल एक्स्युझिव्हज होता ना?
ऐंशीच्या दशकातच अंधेरीवरुन चर्चगेटकडे ट्रेन निघताच डाव्या बाजूला बरेच दिवस चाळ दिसे. एका दिवशी त्याकडे नजर टाकताना शूटिंगची लगबग लक्षात आली, तोपर्यंत लोकल ट्रेन पुढे गेली देखील. अधूनमधून तेथे शूटिंग सुरु असल्याचे दिसल्याने या चाळीतच जायचे ठरवले. तेव्हा दिग्दर्शक जे. पी. दत्ता आशा पारेख आणि संजय दत्तवर काही दृश्यांची तयारी करीत असल्याचे दिसले. सेट (Chawl Set) म्हणजे खरीखरी चाळच जणू. अशा वेळी कला दिग्दर्शक रत्नाकर फडके यांना भेटायलाच हवे. जे. पी. दत्ताच्या अनेक चित्रपटांचे ते हुकमी कला दिग्दर्शक. ते म्हणाले, एकाद्या स्टुडिओत अशी चाळ उभारण्यापेक्षा आपण लोकल ट्रेनच्या मार्गालगत ती उभी केली तर त्याचा चांगला परिणाम होईल असे वाटल्याने ही जागा निवडली. आणि बॅकग्राऊंडला पश्चिमेकडच्या मोठ मोठ्या बिल्डिंगही आल्यात. रत्नाकर फडके यांनी सांगितल्याचा प्रत्यय ‘हत्यार’ पडद्यावर आल्यावर दिसलाच यालाच दूरदृष्टी म्हणतात. चाळीच्या या सेटवर बरेच दिवस शूटिंग झाल्यावर तो पाडण्यात आला. मी मूळचा ‘चाळ ‘करी असल्याने ही चाळ लक्षात राहिलीय.
एकदा निर्माता नितीन मनमोहन याच्याकडून ‘पहेचान’ च्या शूटिंग रिपोर्टींगसाठीचे आमंत्रण आल्यानुसार आंबोलीच्या फिल्मालय स्टुडिओत बोलावले असता गेटपासूनच लावलेला सेट एका मध्यमवर्गीय पारंपरिक वस्तीत आल्याचा फिल देत होता. दिग्दर्शक दीपक शिवदासानी म्हणाला, हा सेट (Chawl Set) या चित्रपटात जणू एक व्यक्तीरेखा आहे. याच सेटवर श्रीगणेशोत्सवही असून सैफ अली खान व शिल्पा शिरोडकर यांच्यावर एक गाणेही आहे. फिल्मालय स्टुडिओत त्या काळात अशा सेटसाठी जागाही भरपूर होती.
अशाच शूटिंग रिपोर्टींगच्या निमित्ताने लक्षात राहिला कमालीस्तान स्टुडिओत महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘तेरा मेरा साथ रहे’ या चित्रपटासाठीचा चाळीचा सेट (Chawl Set). कला दिग्दर्शक आर. वर्मन याला यासाठी स्पेसही भरपूर मिळाली होती. मजबूत चाळ होती. पटकथेतील बराचसा भाग येथे चित्रीत होणार असल्याने तसे केले होते. अजय देवगण व सोनाली बेन्द्रे यांच्यावर एक चित्रीकरण सत्र पार पडल्यावर महिनाभराने त्यांच्या तारखा मिळणार होत्या. तोपर्यंत हा सेट असाच उभा राहणार होता आणि निर्मात्याला त्याचे भाडे भरावे लागणार होते. अशातच महेश मांजरेकरमधील व्यवहारी सिनेमावाला जागा झाला. त्याने निर्माता पचीसिया याला सांगितले, या तयार सेटला साजेशी थीम माझ्याकडे आहे. आपण झटपट एक छोटा चित्रपट निर्माण करुया…महेश मांजरेकरचा हा सकारात्मक दृष्टिकोन फळला आणि चित्रपटाचे नाव ठरले, ‘प्राण जाए पर चाॅल ना जाए’. लेखन संजय पवार, पटकथा महेश मांजरेकर, दिग्दर्शन संजय झा. लगेचच चाळीच्या या सेटवर शूटिंगलाही सुरुवात झाली. अमन वर्मा, दिव्या दत्ता, दीया मिर्झा, नम्रता शिरोडकर, शिवाजी साटम वगैरे वगैरे. त्यात दोन नावे खूपच महत्वाची भरत जाधव व मकरंद अनासपुरे. अगदी छोट्या भूमिकेत का असेना पण होते. याचे शूटिंग सुरु असतानाच या चित्रपटाच्या नावातील ‘चाल’ (अथवा हिंदीत चाॅल) मुंबईबाहेरच्या प्रेक्षकांना कसे समजणार असे कोणी तरी म्हणाले आणि त्याऐवजी ‘शान’ झाले. पिक्चर मात्र रंगला नाही. काही असो, चाळीच्या सेटमुळे (Chawl Set) एका चित्रपटाची निर्मिती झाली हे उल्लेखनीय आहे.
======
हे देखील वाचा : सेटवर प्रत्यक्षातही क्रिकेटचा खेळ मेळ…
======
अनेक मराठी व हिंदी चित्रपटात मुंबईतील चाळ (Chawl Set) कमी अधिक प्रमाणात असते. त्याची वेगळी सूची होईल. कधी सगळी ‘कथा’च चाळीत घडते. कधी एकाद्या स्टुडिओत अथवा बाह्यचित्रीकरण स्थळी चाळीचा सेट लागला. कधी प्रत्यक्ष चाळीत ( अनेकदा तरी आमच्या गिरगावात) शूटिंग होतं. शिवडीतील एका चाळीला अनेक दिग्दर्शकांनी पसंती दिली. रामगोपाल वर्माने ‘सत्या’च्या वेळेस आग्रीपाड्यातील एका चाळीत शूटिंग (Chawl Set) करत एक गँगस्टर आणि मध्यमवर्गीय युवती यांच्यातील प्रेमाला वास्तव टच दिला. शूटिंगसाठीचे स्पाॅट निवडताना दिग्दर्शक टच हवाच.
सिनेमा आणि चाळ (कधी फिल्मी, तर कधी रियॅलिटी) यांच्यावर फोकस टाकताना चंद्रकांत कानसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ’ (दोन्ही भाग) या चित्रपटाचा खास उल्लेख हवाच. हा चित्रपट एन्जाॅय करताना त्यात प्रत्यक्षातील ‘दगडी चाळ’ किती व कोणती आणि सेट कोणता यातला फरक लक्षात येत नाही हेच केवढे तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसा १९५० साली दत्तू बांदेकर यांची कथा पटकथा व संवाद असलेला डी. के. काळे निर्मित व दिग्दर्शित ‘चाळीतील शेजारी’ या नावाचा चित्रपट आला होता. तेव्हाच्या एकूणच सामाजिक कौटुंबिक सांस्कृतिक परिस्थितीनुसार तो असावा. अर्थात काळ बदलत असतोच आणि सिनेमाही बदलत राहिला. आजच्या ग्लोबल युगात मल्टीप्लेक्स कल्चरमध्ये हिंदी पिक्चरमध्ये ‘चाळीतील गोष्टीशी’ आजचा प्रेक्षक रिलेट होईल का? मी आजही मनाने गिरगावातील चाळ संस्कृतीत आहे आणि एकाद्या स्टुडिओत बाहेर चाळीचा सेट मला आठवणीत नेणारा ठरेल.