’कळीदार कपूरी पान’ तब्बल दहा वर्षांनी रंगले!
काही गाण्यांचा भाग्य उदय होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. किती? तब्बल दहा वर्षे. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील ‘कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनोरमणा….’ ही लावणी सर्व रसिकांच्या चांगल्या परिचयाची आहे. पण तुम्हाला माहिती आहे कां? ही लावणी पूर्वी म्हणजे १९५१ साली एका दुसऱ्याच गायिकेने गायली होती. सुलोचना चव्हाण यांच्या आधी ही लावणी गायली होती कुमुदिनी पेडणेकर यांनी गायली होती. अगदी अनपेक्षितपणे ही लावणी खळे काकां कडे आली आणि अवघ्या वीस मिनिटात त्यांनी चाल लावली आणि पुढच्या तासाभरात मुख्यमंत्र्यांच्या समोर ही लावणी एक जाहीर कार्यक्रमातून सादर झाली! हा एक मोठा विक्रम होता. खरंतर तंत्रज्ञानाच्या बाबत इतकी प्राथमिक अवस्था असताना त्या काळातील कलावंत जो अद्भुत करिश्मा करून दाखवत होते तो आज सर्व टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला असून देखील आपण करू शकत नाही त्यामुळे त्या कलावंतांना खरोखरच मानाचा मुजरा करावा वाटतो. दुर्दैव म्हणजे त्याकाळी या गाण्याचे क्रेडीट देखील खळे यांना मिळाले नाही. पण अखेर मेहनत रंग लाई…. पण त्यासाठी तब्बल दहा वर्षे जावी लागली. या लावणीचा हा भन्नाट किस्सा तुम्हाला नक्कीच आवडेल. (Untold Story)
चित्रपटाच्या फारसं प्रेमात न पडताही ज्यांनी भावगीताच्या दुनियेत स्वतःच एक युग निर्माण केलं असा कलावंत कोण असा जर प्रश्न कुणी केला तर संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या शिवाय इतर कुणाचे नाव ओठावर येणार नाही किंबहुना येऊ नये अशी जबरदस्त, अतुलनीय कामगिरी खळे यांची आहे (Untold Story). खळे यांनी मराठी भावगीताला काय दिले तर संत साहित्यापासून ते थेट गदिमा, पाडगावकर,राजा बढे या प्रतिभा संपन्न कवींच्या काव्याला सुरांच्या द्वारे नवा जन्म दिला. त्यांच्या पहिल्या गीताचा किस्सा खूप वेगळा आहे. खळ्यांना त्यांनी संगीत दिलेल्या या पहिल्या गाण्याचं श्रेय चक्क दहा वर्षानंतर मिळालं होतं!
हा किस्सा आहे १९५०-५१ सालचा. कवी राजा बढें त्या काळी ऑल इंडिया रेडीओ इथे नोकरी करत होते. एकदा त्यांनी अचानकपणे श्रीनिवास खळेंना घाईघाईने आकाशवाणीवर बोलावलं. दुपारी दोन-अडीच वाजल्यापासून खळे काका तिथे जाऊन बसले होते. चार-साडेचार वाजता त्यांची भेट झाली. तेव्हा राजा बढे म्हणाले की,” मुंबईच्या स्काऊट पॅव्हेलियन वर मुख्यमंत्री मोरारजी देसाई येणार आहेत मराठी लोककला त्यांच्यासमोर सादर करायची आहे. तिथे आज संध्याकाळी ७ वाजता एक गाणं प्रसारित करायचं आहे. गाणं लिहून तयार आहे. तुम्ही चाल लावायची आहे. खरं तर संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांच्याशी या गाण्याचा करार झाला होता. ते येऊ शकले नाहीत. म्हणून तुम्हाला तातडीने बोलावलं आहे.’(Untold Story)
प्रसंग बाका होता. मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर कार्यक्रमात ते गाणं लाइव्ह सदर करावयाचे होते. हातात अक्षरश: काही मिनिटे होती. राजा बढे यांनी लिहिलेलं गीत खळे यांच्या त्यांच्या हातात आल्यावर त्यांनी ते एकदा वाचून गुणगुणून पाहिलं. बैठकीच्या लावणीच्या फॉरमेटमध्ये ते चपखल बसत होतं. पुढच्या वीस मिनिटांत गाणं तयार झालं. कुमुदिनी पेडणेकर ते गाणार होत्या. त्या आल्यावर सगळेजण टॅक्सीने स्काऊट पॅव्हेलियन हॉलकडे निघाले. संध्याकाळी सात वाजता तिथूनच त्या गाण्याचं प्रसारण होणार होतं. टॅक्सीतच कुमुदिनी पेडणेकर यांना चाल ऐकवली गेली. तिथे गेल्यावर तबला ,पेटी, बासरी अशी मोजकी वाद्ये आणि वादक घेवून गाण्याची रिहर्सल झाली आणि मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्यासमोर गाणे सादर झाले! गीत होते, ‘कळीदार कपूरी पान..’ या गाण्याआधी निवेदिकेने गीत- राजा बढे, गायिका- कुमुदिनी पेडणेकर आणि संगीत- शंकर राव कुलकर्णी असे जाहीर केले. कारण मूळ करारात त्यांचे नावावर होता. एवढ्या कमी वेळात गाणं तयार करणार्या खळेंना मात्र त्यावेळी काहीच मिळालं नाही. हा सारा करिष्मा संगीतकार श्रीनिवास खळे यांचा होता पण त्यांना या गाण्याचे कुठलेही क्रेडिट मिळाले नाही, कारण या गाण्याचे कॉन्ट्रॅक्ट आधीच संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांच्या नावाने साईन झाले होते. या गाण्याचे मानधन देखील शंकरराव कुलकर्णी यांनाच मिळाले.
=======
हे देखील वाचा : ‘करवा चौथ’ मुळे अभिनेता जितेंद्रचे वाचले प्राण!
=======
पण पुढे १९६० च्या दरम्यान एच.एम.व्ही.ने जेव्हा या गीताची रेकॉर्ड काढली तेव्हा खळेकाकांना या गाण्याचं श्रेय त्यांना मिळालं आणि त्यावेळी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं आणि अफाट गाजलंही. काही गाण्यांचा भाग्य उशिरा उजाडतं हेच खरं!