पु ल देशपांडेचा १९५० सालचा सिनेमा पंचवीस वर्षानंतर चालला!
‘अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे’(P. L. Deshpande) यांच्या नावाशिवाय कुठलाही मराठी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. साहित्याच्या दुनियेत मस्त मुशाफिरी करणारे पु लं देशपांडे चित्रपट सृष्टीत मात्र फारसे रुजले नाहीत. काही काळ त्यांनी जरूर सिनेमाच्या दुनियेत घालवले पण इथे रमले मात्र नाहीत. १९४७ ते १९५३ या काळात त्यांनी काही मराठी सिनेमे केले. १९५४ साली ते आकाशवाणीत रुजू झाले आणि चित्रपटापासून दूर झाले पण या सुरुवातीच्या पाच सहा वर्षाच्या काळात त्यांनी अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिले. ‘गुळाचा गणपती’ हा १९५३ साली आलेला मराठी चित्रपट सबकुछ पु ल असाच होता. पु ल चे (P. L. Deshpande) काही चित्रपट युट्युब वर उपलब्ध आहेत. मंगल पिक्चर्सचा १९५० सालचा राम गबाले यांनी ‘जोहार मायबाप’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात पु लं च्या सोबत सुलोचना बाईंची प्रमुख भूमिका होती. पु ल देशपांडे (P. L. Deshpande) यांनी यात संत चोखा मेळाची भूमिका केली होती. परवा अनपेक्षितपणे हा चित्रपट youtube वर सापडला आणि पाहता आला. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग… या सिनेमाच्या निमित्ताने इसाक मुजावर यांनी सांगितलेली एक आठवण लगेच आठवली. या सिनेमाचे गाणी, पटकथा संवाद ग दि माडगूळकर यांचे होते. दिग्दर्शक राम गबाले यांनी गदिमांना या सिनेमातील दोन अभंगाची सिच्युएशन सांगितली आणि त्यांना लवकरात लवकर लिहून द्यायला सांगितले. तेव्हा गदिमांनी त्यांना विचारले,” अरे पण संत चोखामेळा ची भूमिका कोण करणार आहे?” तेव्हा राम गबाले म्हणाले ,”पी एल देशपांडे!” त्यावर हसत हसत गदिमा म्हणाले,” अरे चष्मा काढल्यानंतर पी एल चोरासारखा दिसतो तो काय चोखामेळा म्हणून शोभणार?” अर्थात हे सर्व गमती जमतीत चाललं होतं.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चित्रपट पूर्ण झाला आणि प्रदर्शित झाला. पु लं नी (P. L. Deshpande) अतिशय सुंदर रित्या संत चोखामेळाची भूमिका साकारली होती. या सिनेमाची ट्रायल पाहिल्यावर पाहिल्यानंतर ग दि माडगूळकर गहिवरून गेले होते ते राम गबाले यांना म्हणाले,” रामा तुझ्या ह्या पी एल ने काय छान काम केले रे. कथा मी लिहिली असली तरी त्याने माझ्या डोळ्यातून पाणी काढलं. त्याच्या आणि सुलोचना बाईंचे काही सीन्स मला पंढरीला घेऊन गेले. मजा आणली गड्यांनो तुम्ही!” गदिमा खुश झाले की आपली मूळची आवडती गावाकडची भाषा बोलतं! या सिनेमाची एक गंमत तुम्हाला सांगायलाच पाहिजे. हा सिनेमा त्या काळात फारसा चालला नाही. नंतर पु ल देशपांडे (P. L. Deshpande) देखील सिनेमाच्या दुनियेतून बाहेर गेले. पण साठच्या दशकामध्ये ते नाटकाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आले. ‘बटाट्याची चाळ’ त्या काळात अफाट गाजत होते. पु लं च्या (P. L. Deshpande) नावाला एक ग्लॅमर आले होते. ही लोकप्रियता कॅश करून घेण्यासाठी रणजीत बुधकर यांनी एक आयडिया केली त्यांनी. १९५० सालच्या ‘जोहार मायबाप’ चे हक्क मंगल पिक्चर्स कडून घेवून हा चित्रपट पुन्हा एकदा सेन्सॉर करून घेतला आणि आता या चित्रपटाचे नाव त्यांनी बदलले ते नाव ठेवले ‘ही वाट पंढरीची…’ चित्रपटाच्या सुरुवातीला टायटल मध्ये त्यांनी संयोजक म्हणून स्वतःची नाव टाकले. पण यामुळे हा चित्रपट चांगल्या पद्धतीने रिस्टोर झाला. (आणि या मुळेच आजही युट्युब वर आपण हा सिनेमा पाहू शकतो) १९७३ साली हा चित्रपट जेंव्हा बुधकर यांनी पुन्हा प्रदर्शित केला तेव्हा हा सिनेमा ग्रामीण भागामध्ये, टुरिंग टॉकीज मध्ये, यात्रा ,,जत्रा उरूस मध्ये प्रचंड चालला. पुढची दहा-पंधरा वर्षे या सिनेमाला प्रचंड मागणी होती. अशा पद्धतीने पुलंचा १९५० सालचा सिनेमा तब्बल पंचवीस वर्षानंतर धो धो चालला. चित्रपटाचं नाव मात्र बदललं होतं ते झालं होतं ही वाट पंढरीची…!
========
हे देखील वाचा : ‘या’ डायलॉगमुळेच राजेश खन्ना चित्रपटासाठी सिलेक्ट झाला…
========
जाता जाता: गंमत म्हणून ‘ही वाट पंढरीची…’ या नावाचा आणखी एक चित्रपट ऐंशीच्या दशकात येणार होता पण या चित्रपटाचे नाव नंतर ‘पंढरीची वारी’ करण्यात आले. या सिनेमाची कथा शरद तळवळकर यांनी लिहिली होती. या सिनेमांमध्ये जयश्री गडकर,बाळ धुरी, राजा गोसावी, अशोक सराफ, राघवेंद्र कडकोळ, दीनानाथ टाकळकर, नंदिनी जोग, बकुळ कवठेकर, अनुप जलोटा यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात खरं तर सुरुवातीला करायचे ठरले तेंव्हा त्यावेळी यात अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती. पण याच सिनेमाच्या बाह्य चित्रीकरणासाठी जात असताना २२ जून १९८४ या दिवशी अरुण सरनाईक यांच्या गाडीचा इस्लामपूर जवळ अपघात झाला आणि या भीषण अपघातात त्यांचा, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा अंत झाला. पुढे हा चित्रपट बंद पडला. नंतर काही वर्षांनी या चित्रपटाची शूटिंग परत सुरू झाले. अरुण सरनाईक यांच्या जागी बाळ धुरी आले आणि ‘पंढरीची वारी’ या नावाने हा चित्रपट आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते. या चित्रपटातील ‘ धरिला पंढरीचा चोर..’ हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गाणे आज देखील लोकप्रिय आहे.