कुठे गायब झाला ऐश्वर्या रॉयचा हा हँडसम हिरो?
सिनेमाची दुनिया मोठी झाली जालीम असते. इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो मावळतीच्या सूर्याची इथे फारशी कुणी दखल कोणी घेत नाही. अभिनयाची यात्रा चालू असताना अनपेक्षितपणे अचानकमध्ये मोठा ब्रेक आला तर त्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे करिअर अक्षरशः चौपट होऊन जाते! एका क्षणात होत्याचे नव्हते होवून जाते. काल सलाम करणारी आज ओळख देखील देत नाही. याला नशिबाचा फेराच म्हणायचा दुसरं काय? नव्वदच्या दशकामधील एका अभिनेत्याच्या बाबत असंच घडलं होतं. खरंतर अतिशय देखणा आणि प्रॉमिसिंग असणारा हा कलाकार हिंदी सिनेमांमध्ये ‘लंबी रेस का घोडा असेल’ असं अनेकांना वाटत होतं परंतु अचानकपणे त्याच्या आयुष्यात आलेल्या एका घटनेमुळे त्याचं सगळं जीवनच बदलून गेलं आणि आज तो अक्षरशः या मायानगरी पासून दूर फेकला गेला. कोण होता हा कलाकार? असं काय घडलं होतं; त्याच्या आयुष्यात की ज्याने त्याचं करिअर संपुष्टात आले?
हा कलाकार होता चंद्रचूड सिंग. नव्वदच्या दशकामध्ये अनेक तरुण चेहरे रुपेरी पडद्यावर चमकत होते. त्यापैकी हा होता. परंतु याने पदार्पणातच सलग चार सुपरहिट सिनेमे दिल्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अतिशय हँडसम, उंच पुरा, स्वप्नाळू डोळे असलेला हा कलाकार चॉकलेट हिरो (Hero) म्हणून तरुणाई मध्ये लोकप्रिय झाला होता. नव्वदच्या दशकातील कॉलेजच्या पोरींचा तो पहिला ‘क्रश’ होता. पण नशीबाचे फासे उलटे पडले. आणि आयुष्य वेगळ्याच वळणावर जाऊन पोचले. काय घडलं? घटना क्रम कसा होता? गंमत म्हणजे त्याला एक तर हिरो (Hero) व्हायचं होतं किंवा आयएएस ऑफिसर! अशा दोन भिन्न आवडी असलेला हा चंद्रचूड सिंग होता. एका अति संपन्न घरांमध्ये त्याचा जन्म झाला होता.(जन्म ११ ऑक्टोबर १९६८) त्यामुळे सहाजिकच डून स्कूल सारख्या उच्चभ्रूच्या शाळेमध्ये त्याने प्रवेश घेतला. मोठमोठ्या राजकारण्यांची, उद्योगपतींची आणि सेलिब्रिटींची मुलं या शाळांमधून शिकत होती. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पुढे ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी दिल्लीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१९८८ साली डिग्री घेतल्यानंतर त्याने आपले पहिले पॅशन सिनेमात काम करण्यासाठी तो मुंबईला आला.जन्माने तो मोठ्या घरातील असल्यामुळे सिनेमातील मातब्बर मंडळींचा त्यांचा परिचय होताच. त्यामुळे त्याने सुरुवातीला महेश भट यांच्याकडे शागिर्दी केली. महेश भट यांनी त्याला असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले. सिनेमाचे तंत्र शिकायला त्याला मदत झाली. याच काळात गायिका अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिच्यासोबत त्याला नायकाची भूमिका मिळाली. चित्रपटाचं नाव होत ‘जब प्यार किसी से होता है’ चंद्रचूड सिंग मोठा खुश झाला होता. परंतु दुर्दैवाने हा सिनेमा निम्म्याहून अधिक झाला त्यावेळेला बजेटचा प्रश्न निर्माण झाला आणि सिनेमा डब्यात गेला! याच वर्षी शोमन सुभाष घई एक चित्रपट निर्माण करत होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि राजकुमार बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार होते या सिनेमाचा नायक म्हणून मनीषा कोइराला च्या समोर चंद्रचूड सिंग यांची निवड झाली. मोठ्या कलाकारांसोबत काम मिळते आहे हे पाहून चंद्रचूड खूप आनंदी झाला परंतु ही खुशी त्याची फार काळ टिकली नाही. कारण ऐनवेळी काहीतरी वेगळीच चक्रे फिरली आणि चंद्रचूड सिंग च्या जागी विवेक मुश्रम यांची निवड झाली. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. यातील नायकाची भूमिका खरंतर चंद्रचूड सिंगला आधी ऑफर झाली होती पण दुर्दैवाने त्याच्या हातून ती भूमिका केली. असाच तिसरा फटका त्याला काजोल सोबत ‘बेखुदी’ या चित्रपटाच्या वेळी बसला. दिग्दर्शक राहुल रवैल यांनी काजोल सोबत चंद्रचूड सिंग यांचे नायक म्हणून निवडले होते. परंतु पुन्हा नशिबाचे फासे उलटे पडले आणि ऐनवेळी चंद्रचूड ला काढून तिथे कमल सदाना याची निवड झाली आणि हा देखील सिनेमा त्याच्या हातातून निसटला. लागोपाठ तीन सिनेमे हातातून गेल्यामुळे तो भयंकर नाराज झाला आणि बोरिया बिस्तर आवरून तो पुन्हा दिल्लीला गेला. तिथे त्याने म्युझिक क्लासेस सुरू केले आणि त्याच वेळेला त्याचे दुसरे पॅशन आय ए एस बनण्यासाठीचे यूपीएससीचे क्लासेस त्याने जॉईन केले. (Hero)
एक दिवस तो क्लास मध्ये शिकवत असताना १९९५ साली त्याला एक फोन आला. तो फोन घेण्यासाठी गेला. तेव्हा समोरून जया बच्चन बोलत होत्या. त्यांनी चंद्रचूडला सांगितले ,”आमच्या एबीसीएल कंपनीच्या वतीने आम्ही पहिला चित्रपट बनवत आहोत. त्यात तू लिड रोल करशील का?” तो फोन ऐकून चंद्रचूड सिंग हरखून गेला. तो ताबडतोब मुंबईला गेला. तिथे त्याची स्क्रीन टेस्ट घेतली गेली आणि त्याची या चित्रपटासाठी निवड झाली. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्षद वारसी हा अभिनेता देखील होता. सिनेमा होता ‘तेरे मेरे सपने’ पदार्पणातील हा सिनेमा काही चालला नाही. पण यातील ‘आंख मारे वो लडकी आंख मारे’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.( हेच गाणं अलीकडे ‘सिम्बा’ सिनेमात पुन्हा एकदा घेतले गेले) याच काळात गुलजार दहशतवादी कृत्यात अडकलेल्या तरुणांच्या मानसिकतेवर एक सिनेमा बनवत होते. चंद्रचूड सिंग याला त्यांनी आपल्या ‘माचिस’ या चित्रपटासाठी घेर्तले. गुलजार यांचा हा चित्रपट नितांत सुंदर बनला होता. यात चंद्रचूड ची नायिका तब्बू होती. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे लोकप्रिय गाणं या चित्रपटातीलच! हा चित्रपट आणि चंद्रचूड सिंग तमाम प्रेक्षकांना आवडून गेला. या भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर चे बेस्ट डेब्यू ॲक्टर हा पुरस्कार मिळाला. आता चंद्रचूड सिंग चा पुढचा मार्ग प्रशस्त झाला. या पाठोपाठ १९९९ साली संजय दत्त सोबत त्याचा ‘दाग: द फायर’ आला. या चित्रपटाला देखील चांगले यश मिळाले. २००० साली त्याचा महत्त्वपूर्ण चित्रपट ‘जोश’ झळकला. या चित्रपटात त्याची नायिका ऐश्वर्या रॉय होती. ऐश्वर्या रॉय आणि चंद्रचूड सिंग ही जोडी या चित्रपटात प्रचंड गाजली. ‘मेरे खयालो की मलिका….’ हे गाणं आज देखील रसिकांच्या लक्षात असेल. या चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका शाहरुख खान यांनी केली होती. यानंतर याच वर्षी ‘क्या कहना’ या चित्रपटात चंद्रचूड सिंग याने प्रीती झिंटा सोबत काम केले होते. ‘जोश’ आणि ‘क्या कहना’ या दोन्ही सिनेमासाठी त्याला फिल्म फेअर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर चे नॉमिनेशन मिळाले होते. यानंतर २००१ साली त्याचा ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ हा एक मसाला चित्रपट त्याने केला होता. सलग चार सुपर हिट सिनेमाने त्याचा भाव वधारला होता. हरेक निर्माता त्याला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होता. त्याच्या अभिनयाची आणि लोकप्रियतेची गाडी सुसाट चालू असताना एक घटना अशी घडली ज्यामुळे त्याच्या करिअर ला अच्घानक ग्रहण लागले.(Hero)
======
हे देखील वाचा : अवघ्या पंधरा मिनिटात चाल लावून अशोक पत्की यांनी बनवलं हे अजरामर गीत!
======
२००१ साली तो गोव्याला मित्रांसोबत मौज मस्ती करण्यासाठी गेला होता. तिथे समुद्रामध्ये काही एडवेंचर स्पोर्टस करत असताना अचानक त्याच्या खांद्याला मोठी दुखापत झाली. त्याचा डावा खांदा अक्षरशः निखळला गेला. तो मुंबईला परत आला आणि त्याचा हा जीव घेणा आजार प्रचंड वाढला. अनेक प्रकारचे उपचार झाले. फिजिओथेरपी झाली. पण काही केल्या आराम मिळत नव्हता. भरपूर औषधोपचार आणि स्टीरॉईडस घेतल्याने त्याची जाडी देखील वाढत होती. नंतर २००६ साली त्याने शोल्डर चे ऑपरेशन देखील केले परंतु ते देखील फारसे सक्सेसफुल झाले नाही. नंतर त्याने पुन्हा एकदा सिनेमात येण्याचा प्रयत्न केला परंतु आता त्याची प्रकृती त्याला साथ देत नव्हती. तो डान्स स्टेप करू शकत नव्हता. ॲक्शन करू शकत नव्हता. कारण काही जरी हालचाल केली की त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे सहाजिकच निर्मात्यांनी त्याला सिनेमातून काढून टाकायला सुरुवात केली. पुढे २०१२ साली ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा पुन्हा पुनरागमन करायचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न देखील यशस्वी ठरला. कारण त्याला ओळखणारी पिढी बदलली होती. या दहा वर्षात सिनेमा खूप पुढे निघून गेला होता. लागोपाठ चार सुपरहिट सिनेमे देणारा कलाकार एका अपघातातून जायबंदी झाला. आणि त्याचे संपूर्ण कारकीर्दच यामुळे बाधित झाली. यानंतर त्याने टीव्हीवर काही शो केले. अलीकडे काही वेब सिरीज मधून आपण त्याला बघितला असेल. पण एक हसरा गोड अभिनेता (Hero) त्या जीव घेण्या अपघातातून वाचला खरा पण आपलं करिअर हरवून बसला हेच खरे!