राजकारणाने ‘या’ अभिनेत्यांची मैत्री कायमची संपली!
राजकारण ही अशी गोष्ट आहे, जी भल्या भल्यांना एकमेकांपासून दूर करते. कित्येकदा एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ देखील राजकारणामुळे विभक्त झालेले दिसतात तर कधी कधी दोन जिवलग मित्र देखील राजकारणाने अलग होतात. असाच काहीसा प्रकार दोन अभिनेत्यांच्या मैत्रीमध्ये झाला होता. सत्तरच्या दशकातील हे दोन लोकप्रिय अभिनेते होते राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा. एकेकाळी चांगले मित्र असलेले हे दोघे राजकारणामुळे एकमेकांपासून दुरावले आणि त्यांच्यातील वैमनस्य (Friendship Break) इतके वाढले की, आयुष्यभर त्यांनी परस्परांशी अबोला धरला. शत्रुघ्न सिन्हाला ही, बाब कायम टोचत राहिली कारण त्याने राजेश खन्ना सोबत पुन्हा मैत्री वाढवण्याचे खूप प्रयत्न त्यांनी केले परंतु राजेश खन्नाने शत्रुघ्न सिन्हाला कधीच माफ केले नाही. राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगितला होता (Friendship Break).
शत्रुघ्न सिन्हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आले त्या वेळेला राजेश खन्ना सुपरस्टार पदावरून पोहोचले होते. बिहारमधील पटना मधून मुंबईत आले होते. त्यांना चार भाऊ होते. त्यांचे वडील भुवनेश्वरी प्रसाद सिन्हा पेशाने डॉक्टर होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्या भावांची नावे होते राम, लक्ष्मण, भरत आणि स्वतः ते शत्रुघ्न होते. वडिलांची इच्छा होती मुलांनी डॉक्टर आणि सायंटिस्ट व्हावे. त्या पद्धतीने त्यांचे थोरले दोन भाऊ डॉक्टर झाले आणखी एक भाऊ सायंटिस्ट झाला परंतु शत्रुघ्न सिन्हाला मात्र अभ्यासासोबतच अभिनयाची देखील आवड होती. त्यामुळे त्यान महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुण्याच्या एफ टी टी आय मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याने एक्टिंगचा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स चालू असतानाच देव आनंद ने त्याला ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटासाठी साईन केले. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाचा रोल एका पाकिस्तानी आर्मी ऑफिसरचा होता. शत्रुघ्नने पहिला चित्रपट ‘प्रेमपुजारी’ जरी साइन केलेला असला तरी त्याचा पहिल्यांदा प्रदर्शित झाला ‘साजन’. सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका करता करता नंतर सत्तरच्या दशकाच्या मध्यापासून तो नायकाच्या भूमिका देखील करू लागला. गुलजार यांच्या पहिल्या दिग्दर्शनातील ‘मेरे अपने’ या चित्रपटात त्याचा रोल जबरदस्त होता. चेहरेपट्टी नायकाला साजेशी नसताना देखील ‘खामोश’ म्हणत बुलंद डायलॉग बाजीने त्याने बॉलीवूड गाजवले. राजेश खन्नासोबत त्याने ऐंशीच्या दशकात काही चित्रपटातून काम केले. पापी पेट का सवाल है, दुश्मन दोस्त, दिल –ए – नादान… सर्व सिनेमे अपयशी ठरले. रुपेरी पडद्यावर हे दोघे एकत्र फारसे चमकले नसले तरी वैयक्तिक जीवनात त्यांची चांगली मैत्री होती. दोघांना एकमेकांबद्दल आदरच होता. परंतु या मैत्रीला सुरुंग लागला १९९२ साली (Friendship Break).
यावर्षी दिल्लीला लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीसाठी राजेश खन्ना यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी देण्यात आली. तर भारतीय जनता पक्षातर्फे शत्रुघ्न सिन्हाला उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक राजेश खन्ना २५ हजार हून अधिक मतांनी जिंकले परंतु आपल्या विरुद्ध शत्रुघ्न सिन्हाने अर्ज भरला ही गोष्ट राजेश खन्नाच्या पचनी पडली नाही (Friendship Break). निवडणूक जिंकल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले परंतु राजेश खन्नाने त्याकडे दुर्लक्ष केले. शत्रुघ्नने, “मी ही निवडणूक तुझ्या विरुध्द लढलोच नाही. ही निवडणूक दोन राजकीय पक्षांमधील होती. आपण फक्त त्यांचे प्रतिनिधी होतो. त्यामुळे वैयक्तिक मतभेद असल्याचे कारण नाही. अब गिले शिकवे मिटाते है और फिर से दोस्त बन जाते है…” असे म्हणत दोस्तीचा हात पुढे केला. हर तऱ्हेने समजून सांगितले. परंतु राजेश खन्नाचा गुस्सा सातवे आसमान पर होता. त्यांनी शत्रुघ्न माफ केलेच नाही. शत्रुघ्न सिन्हाने आपल्या कॉमन फ्रेंड्सच्याद्वारे मीडियामधील मुलाखतींच्याद्वारे हा अबोला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु राजेश खन्नाने त्याला प्रतिसाद दिला नाही. २०१२ साली जेव्हा राजेश खन्ना दवाखान्यात ऍडमिट झाले. त्यावेळेला शत्रुघन सिन्हाला वाटले की, जाऊन त्यांना कडकडून मिठी मारावी आणि माफी पुन्हा मागावी परंतु ही संधी त्यांना मिळालीच नाही. १८ जुलै २०१२ ला राजेश खन्ना यांचे निधन झाले. एका पोटनिवडणुकीने त्यांच्या मैत्रीचा बळी (Friendship Break) घेतला. शत्रुघ्नला ही गोष्ट कायम टोचत राहते. त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे. या निवडणुकीमुळे आमच्या दोघांच्या मैत्रीत कटुता आली याचा मला खेद वाटतो, असे मत नोंदवले आहे.
=====
हे देखील वाचा : कुठे गायब झाला ऐश्वर्या रॉयचा हा हँडसम हिरो?
=====
जाता जाता थोडंस १९९२ च्या दिल्लीच्या त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल! १९९१ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण अडवाणी दोन मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. गांधीनगर आणि दिल्ली. दिल्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध कॉंग्रेसच्या वतीने राजेश खन्ना यांना उमेदवारी देण्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी दोन्ही ठिकाणी जिंकून आले. नंतर त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यायचा होता (Friendship Break). त्यांनी दिल्लीच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि तिथे पोट निवडणूक लागली. या पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसने तिथले पराभूत उमेदवार राजेश खन्ना यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि तिथेच त्यांना तुल्यबळ म्हणून भारतीय जनता पक्षाने शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत तब्बल १२५ हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात एक नाव खूप इंटरेस्टिंग होते. ते होते फूलन देवीचे! दरोडेखोरीमुळे फेमस झालेल्या फूलन देवीने इथे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत राजेश खन्ना यांचा २५००० हून अधिक मतांनी विजय झाला. आज शत्रुघ्न सिन्हा भाजप सोडून टी एम सी त दाखल झाले आहेत. पण राजेश सोबतची मैत्री निवडणुकीच्या राजकारणाने संपली याचे त्यांना आजही दु:ख आहे!