महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
दिलीपकुमार ह्यांनी दिलेली शाबासकी आजही अशोक सराफला आठवते!
अशोक सराफ लहानपणी ग्रॅन्ट रोडच्या चिखलवाडीत राहत असताना सुनील गावसकरसोबत क्रिकेट खेळण्याचा त्याला योग आला हे माहीतेय? इतकेच नव्हे तर एक दोन बालनाट्यात गावसकरसोबत भूमिकाही त्यांनी एकत्रपणे केली आहे. दोघांचेही बालपण चिखलवाडीतील. अगदी एकमेकांच्या समोर रहायचे. आणि त्या वयात आणि त्या काळात “गल्ली क्रिकेट” हा खूपच मोठा फंडा असे. ते दिवस, त्या आठवणी अशोक सराफ आजही आवर्जून सांगतो.
‘संशयकल्लोळ’च्या विशेष प्रयोगाला दिलीपकुमारने दिलेली शाबासकी आजही त्याला आठवतंय. अशोक सराफला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा योग आला त्यामुळे तर त्या शाबासकीची आठवण आणि ओलावा फारच जिव्हाळ्याचा. ही आठवण सांगताना कळत नकळतपणे त्याला आजही तो दिलीपकुमारचा स्पर्श जाणवतोय/सुखावतोय असा त्याचा फिल असतो.
‘पांडू हवालदार ‘च्या यशानंतर महालक्ष्मी एक्प्रेसने कोल्हापूरला जाताना सेकंड क्लासमध्ये दोन खरे हवालदार भेटले तोही त्याचा एक कम्माल अनुभव. पूर्वी मराठी चित्रपट कलाकार एशियाड बसने पुण्याला जात तर महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सेकंड क्लासने कोल्हापूरला ये जा करीत. एक तर त्यात त्यांना अजिबात वावगं असे काही वाटत नव्हते आणि मराठी चित्रपटसृष्टी गरीब असेच मानले जाई.
पण असेच एकदा जात असताना सेकंड क्लासमधील अशोक सराफला पाहून दोन खरे हवालदार चुळबुळ करु लागले. हा ‘पांडू हवालदार’मधील ‘सखाराम हवालदार’ आहे वाटते? एकाने विचारले. दुसरा ‘हो’ म्हणाला आणि हे ऐकून अशोक सराफने डोक्यावर जी चादर घट्ट लपेटून घेतली ती कोल्हापूर स्टेशनला पोचल्यावर काढली…
अशोक सराफच्या अशा असंख्य आठवणी, किस्से, गोष्टी सांगता येतील. याचे कारण सातत्याने होत राहिलेली भेट. अगदी अगणित भेटी आणि प्रत्येक वेळी लहान मोठ्या प्रमाणात गप्पा. या सगळ्यात पहिली भेट केव्हाच मागे पडली. तरी सांगतो. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मी नवशक्ती दैनिकात रुजू झालो. त्यावेळी रविवारच्या अंकात अशोक सराफ वाचकांच्या गंमतीदार प्रश्नांना तिरकस उत्तरे देई.
फार पूर्वी रसरंग साप्ताहिकात शरद तळवळकर, झूम पाक्षिकात निळू फुले, चित्रानंद साप्ताहिकात दादा कोंडके अशी उत्तरे देण्याची सदरे असत (सहज जाता जाता थोडी माहिती), असेच हे सदर होते आणि मी गिरगावात राहत असल्याने मला चिखलवाडीत जाणे जवळ असल्याने एकदा मी ती उत्तरे आणायला गेलो.
अशोक सराफ दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामना पाहण्यात रमला असला तरी त्याने एक नजर त्यावर तर एक नजर माझ्यावर ठेवून माझी छान विचारपूस केली आणि मग कधी मराठी चित्रपटाच्या सेटवर, पार्टीत, कोल्हापूरला वगैरे वगैरे सतत आमच्या भेटी सुरु झाल्या. तसा अशोक सराफ खूपच नेमके अथवा कमी बोलतो. पण एकदा का त्याला त्याचे जुने संदर्भ दिले की तो खुलतो. अर्थात त्याची इतकी चौफेर वाटचाल सुरु आहे की एखादा तपशील मागेपुढे होणारच. असो.
१९७९ साली वर्षातील ३६५ ही दिवस त्याने कोल्हापुरात शूटिंग केले. त्या काळात कोल्हापुरात खूपच मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटाचे शूटिंग होत असे. आणि अशोक सराफ तर नायक, सहनायक, खलनायक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारत होता. सगे सोयरे, गुलछडी, ठकास महाठक, रामराम गंगाराम इत्यादी चित्रपटांचे कोल्हापूरला शूटिंग केले.
‘अशी ही बनवाबनवी’च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमार यांचे आशिर्वाद त्याला लाभले. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्टस रंगला. मीदेखिल तो अनुभवला. अशोक सराफसाठी अतिशय भारावून जाणारा क्षण होता तो. विशेष म्हणजे शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या चित्रपटात अशोक सराफची व्यक्तिरेखा दिलीपकुमारच्या अभिनयाची जबरदस्त चाहता अशी आहे. सतत दिलीपकुमारचे जुने चित्रपट पाहणे, त्याचे कौतुक करणे आणि आपण चित्रपट कलाकार होऊ शकलो नाही याचे दुःख विसरणे अशीच ती व्यक्तिरेखा आहे.
एखाद्या सेलिब्रेटिजच्या सततच्या भेटीगाठी म्हणजे बहुरंगी बहुढंगी अनेक गोष्टी…