‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गोल्डीच्या प्रत्येक सिनेमाची जातकुळी एकमेकांपासून भिन्न! ‘तिसरी मंझिल’, ‘तेरे घर के सामने’, ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘जाॅनी मेरा नाम’…..
नौ दो ग्यारह, गाईड, तिसरी मंझिल, तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने…..
प्रत्येक सिनेमाची जातकुळी एकमेकांपासून भिन्न! ‘गाईड’ राजू गाईड (देव आनंद) आणि विवाहित रोझी (वहिदा रहेमान) यांच्या अनोख्या नातेसंबंधाची धाडसी कथा तर ‘ज्वेल थीफ’ च्या नावातच ‘चोरीची गोष्ट’ दडलीय. ‘जॉनी मेरा नाम’ एका बाजूला लहानपणी दोन हरवलेले भाऊ मोठेपणी योगायोगाने भेटतात याची ‘स्टोरी’ तर त्याचवेळी मुंबई ते नेपाळ असे विणलेले गुन्हेगारी जाळे आणि ते तोडण्यासाठी सज्ज असलेले मुंबईचे पोलीस. नायिका हेमा मालिनीच्या रॅकेटमध्ये किंमती हीरे आणि तिला पोलिसांपासून वाचवण्याचा देव आनंदचा प्रयत्न. या जोडीने अनेक प्रकारचा मसाला खच्चून भरलेला. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट पटकथेत ‘ जॉनी मेरा नाम’चा समावेश होतो. ती के. ए. नारायण यांची आहे. (उर्वरित दोन म्हणजे, ‘शोले’ आणि ‘डॉन’ या चित्रपटांच्या सलिम जावेद यांच्या पटकथा! चांगला पटकथा लेखक होण्यासाठी हे तीन चित्रपट अभ्यासावेत.)
एकीकडे थीमचे वेगळेपण तर दुसरीकडे या प्रत्येक चित्रपटातील गाणी पटकथेत चपखल बसणारी आणि त्यांचे टेकिंग अप्रतिम. ‘तेरे घर के सामने’ चे दिल का भंवर करे पुकार हे कुतुबमिनारची एकेक पायरी उतरत देव आनंद गातोय आणि केवळ नजरेनेच नूतन बोलतेय…. याच चित्रपटातील ‘एक घर बनाऊंगा’ या गाण्यात देव आनंदला दारुच्या ग्लासात नूतन दिसते आणि ज्यावेळी त्या ग्लासात रशिद खान बर्फ टाकतो तेव्हा ती कुडकुडते, म्हणून देव आनंद चिमट्याने बर्फ काढतो….
साठच्या दशकातील चित्रपट रसिकांना विजय आनंद अर्थात गोल्डीने आपल्या चित्रपटातून केवढी तरी विविधता दिली. सर्वच चित्रपटांची नावे द्यायची गरजच नाही. सत्तरच्या दशकातील रसिकांना ही मागची पिढी आवर्जून सांगे, मॅटीनी शोला गोल्डीचे चित्रपट पाहायला मिळाले तर नक्कीच बघ. त्यात देव आनंद हा ‘मॅटीनी आयडॉल’ म्हणून ओळखला जाई. त्यामुळे हे चित्रपट पाहता येऊ लागले. राहिलेली कसर अथवा हेच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्यास ‘गल्ली चित्रपट’ आणि दूरदर्शनवरचा रविवार संध्याकाळचा चित्रपट चांगली सपोर्ट सिस्टीम असे.
पण या काळात ब्लॅक मेल, छुपा रुस्तम, मग रजपूत अशा चित्रपटात गोल्डी टच दिसत नव्हता. अभिनेता म्हणून तो अधूनमधून काही चित्रपटात (कोरा कागज, डबल क्रॉस, मै तुलसी तेरे आंगन की इत्यादी) दिसत असला तरी ‘गोल्डी म्हणजे दिग्दर्शक’ हे नाते घट्ट होते. देव आनंदच्या वैशिष्ट्ये आणि मर्यादा या दोन्हीचा खुबीने वापर करणारा नवकेतन फिल्मचा आधार ही ओळख पक्की होती. निर्माते नासिर हुसेनसाठी ‘तिसरी मंझिल’ दिग्दर्शित करताना शम्मी कपूर आणि आशा पारेख या जोडीला प्रत्येक गीत संगीत व नृत्यात खुलवले.
गोल्डी स्वतः सस्पेन्स फिल्म छान खुलवतो तरी त्याने रामसेबंधूंच्या ‘घुंघरु की आवाज’ मध्ये गोल्डीने भूमिका का स्वीकारली असेल, यावर आम्ही मित्र कॉलेजच्या कॅटीनमध्ये सतत ‘चिंता व्यक्त करत चर्चा’ करीत असतानाच वेगळे गॉसिप्स रंगले, त्याच वेळेस तो दिग्दर्शित करीत असलेल्या ‘राम बलराम’ च्या सेटवर शिस्तबद्ध गोल्डी आणि लहरी रेखा यांचे कशावरून तरी बिनसले आणि दोन्ही चित्रपट निर्मितीवस्थेत फारच रखडत रखडत एकदाचे पूर्ण झाले आणि पडद्यावर आल्या आल्याच पडले…
मिडियात आल्यावर ‘मागील पिढीतील दिग्दर्शकांना आवर्जून भेटून जमेल तितकी जुनी माहिती/आठवणी/किस्से जाणून घेणे’ हे माझे टार्गेट मी एकेक दिग्दर्शक करीत पूर्ण करीत असतानाच विजय आनंद दिग्दर्शित ‘मै तेरे लिए’ या चित्रपटाच्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताचे आमंत्रण माझ्या हाती आले आणि मी सुखावलो. गोल्डीच्या भेटीसाठीचे हे पहिले पाऊल ठरले. देवपुत्र सुनील आनंद आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट फार रखडला. मीनाक्षी शेषाद्री इतर अनेक चित्रपटांत बिझी झाली आणि गोल्डीला तर प्रत्येक स्टारच्या सलग अनेक तारखा घेऊन शूटिंग करण्याची जुनी सवय. दर्जेदार कलाकृती अशा अनेक गोष्टीतून घडत असतात.
याउलट हा चित्रपट कसाबसा पूर्ण झाल्यावर खारच्या केतनव डबिंग थिएटरमधील गोल्डीच्या ऑफिसमध्येच त्याची ‘पहिली भेट’ झाली तेव्हा नेमकी कुठून सुरुवात करु असा माझ्यापुढे प्रश्न पडला. त्याचे चित्रपट, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील गाणी सगळे डोळ्यासमोर आणि डोक्यात होते. मी गोंधळून गेल्याचे गोल्डीच्या लक्षात येताच त्याने ‘गाईड’ आणि ‘हीरा पन्ना’ (याचे दिग्दर्शन देव आनंदचे आहे इतकेच) या दोन चित्रपटांची बुकलेट मला भेट म्हणून दिली, माझं एक्प्रेशन बदलले आणि मग मला हळूहळू सूर सापडला. आपल्या आवडत्या दिग्दर्शकाची पहिल्यांदा भेट घेताना असे व्हावे याचे मला आश्चर्य वाटले नाही. महत्वाचे म्हणजे, ही बुकलेट आजही माझ्या कलेक्शनमधे आहेत….
त्यानंतर गोल्डीच्या भेटीचे छोटे मोठे योग येत राहिले. त्याने अविनाश वाधवान, काजोल आणि वर्षा उसगावकर अशा स्टार कास्टचा ‘पल पल दिल के पास’ नावाच्या चित्रपटासाठी एका गाण्याचे रेकॉर्डिंग करुन मुहूर्त केला, त्या निमीत्ताने पाली हिलवर एका बंगल्यावर जोरदार पार्टीही झाली. पण त्याच्या नंतरच्या काळातील अनेक चित्रपटांप्रमाणेच तो तेथेच बंद पडला….