‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलिवूडचे यशस्वी गायक…… अल्ला के बंदे…
मेरठमधील एका पंडिताच्या घरी 7 जुलै रोजी कैलास खेर यांचा जन्म झाला. पारंपारिक संगिताचा वारसा जपणा-या कुटुंबातल्या या मुलाने पुढे गाणं शिकण्यासाठी अवघ्या तेराव्या वर्षी घर सोडलं… गाण्यासाठी तो कुठे कुठे फिरला… अगदी ऋषिकेषच्या साधूंबरोबर राहीला… अत्यंत कठिण संघर्षानंतर त्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली…
अल्ला के बंदे….
उत्तर प्रदेशमधील मेरठ मध्ये एका पंडित कुटुंबात कैलास खेर यांचा जन्म झाला. हे कुटुंब काश्मिरी पंडित. घरात गाण्याचा वारसा. वडील मेहर सिंह खेर हे पुजारी. त्यांना लोकगीतं गाण्याची आवड होती. त्यांनी कैलास यांना घरीच गाण्याची शिकवणी सुरु केली. तेव्हा लहानग्या कैलासला बॉलिवूड संगितामध्ये स्वारस्य नव्हतं. लोकगितांमध्ये तो रमून जायचा. मात्र पुढे हाच मुलगा बॉलिवूडमध्ये आपल्या खास लहेजा असलेल्या आवाजासह प्रसिद्ध होइल हे कोणाला माहित नव्हते.
खेर कुटुंबात होणा-या घरगुती कार्यक्रमात नेहमी पारंपारिक गाण्यांची बैठक होत असे. वडिलधा-यांसोबत लहानगा कैलासही आपला गळा साफ करुन घ्यायचा. यातून गाणं शिकायचा त्यांनी निश्चय केला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कैलास गाणं शिकण्यासाठी दिल्लीला आले. त्यांच्या कुटुंबाचा या छोट्याला दिल्लीला पाठवायला विरोध होता. पण गाणं शिकण्यासाठी त्यांनी कुटुंबाविरोधात जाऊन हा निर्णय घेतला. दिल्लीत रहाणं सोप्प नव्हतं. हातात पैसे नसतांना तर ते अधिक कठिण होतं. त्यामुळे कैलास गाणं शिकण्याबरोबर कामही करायचे. विदेशी नागरिकांना गाणं शिकवायचे. त्यातून आलेल्या पैशातून स्वतः गाणं शिकायचे. दिल्लीत त्यांनी आपल्या एका परिचिताबरोबर व्यवसायही सुरु केला होता. पण या व्यवसायात त्यांना जबर नुकसान सोसावं लागलं. हाती आलेला सर्व पैसा गेला. निराश झालेल्या कैलास यांनी आत्महत्येचा विचार केला. कमालीच्या डिप्रेशनमध्ये ते गेले होते. शेवटी सिंगापूर आणि थायलैंडमध्ये त्यांना काम मिळालं. तिथे सहा महिने राहून ते परत भारतात परतले. ते गेले थेट ऋषिकेशमध्ये. तिथे साधू मंडळींसोबत राहू लागले. या साधूंना कैलास गाणी गावून दाखवायचे. त्यांच्या गाण्यांनी हे साधू आनंदी व्हायचे…. ऋषिकेशच्या साधू मंडळींमध्ये कैलास प्रसिद्ध झाले. इथे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत आला. मग गायक होण्यासाठी कैलास थेट मुंबईला आले.
मुंबईला कैलास एका चाळीत रहायचे. कारण जवळ फार पैसे नव्हते. तुटलेली चप्पल दुरुस्त करायलाही पैसे नव्हते. स्टुडीओमध्ये ते चकरा मारायचे… पण त्यांना संधी मिळत नव्हती. राम संपत यांनी त्यांना एका जाहीरातीची जिंगल गाण्याची संधी दिली. त्यासाठी कैलास यांना 5000 रुपये मिळाले. ही रक्कम तेव्हा त्यांना लाखो रुपयांसारखी भासली. पुढे अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या अंदाज या चित्रपटात त्यांना रब्बा इश्क ना होवे हे गाणं मिळालं. या गाण्यामुळे कैलास खेर या गायकाची बॉलिवूडमध्ये नोंद घेण्यात आली. त्यानंतर वैसा भी होता है हा चित्रपट आला. चित्रपट फार चालला नसला तरी त्यातलं अल्ला के बंदे… हे गाणं आयकॉन ठरलं. कैलास यांचा ठसा बॉलिवूडवर उमटला.
प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांना कैलास प्रेरणास्थानी मानतात. त्यांची गाण्याची शैलीही सुफी गाण्यासारखी आहे. कैलास यांनी आतापर्यंत कन्नड, तेलगूसहा अठरा भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 300 हून अधिक गाणी त्यांच्या नावावर जमा आहेत.
शिवभक्त असणा-या कैलास खेर यांनी शिवशंकरावरही अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये ते आता यशस्वी झाले असले तरी आपला संघर्ष विसरले नाहीत. त्यामुळे अत्यंत साधी रहाणी त्यांना आवडते. या गुणी गायकाला वाढदिवसाच्या कलाकृती मिडीयातर्फे अनेक शुभेच्छा…