मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
निगाहो में उलझन दिलोमें उदासी….. तृषार्त कलावंत गुरुदत्त !
भारतीय सिनेमाचा शंभर वर्षाचा लेखाजोखा अभ्यासताना चित्रपट या माध्यमाचा अत्यंत सजगपणे विचार करून अफाट कलात्मक उंचीच्या कलाकृती निर्माण करणाऱ्या प्रतिभावंत कलाकार गुरुदत्त यांचे कर्तृत्व वरच्या श्रेणीत असल्याचे दिसून येते. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम कलात्मक मूल्याच्या चौकटीवर अप्रतिम बनविणार्या गुरुदत्तचं कसब कालातीत होत. तो काळाच्या पुढचं चितारणारा ‘व्हिजनरी आर्टीस्ट’ होता. त्याने निर्माण केलेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फुल’ आणि ‘साहिब बिवी और गुलाम’ या अभिजात चित्रत्रयींचा अभ्यास जगातील सर्व चित्रप्रेमी आजही करत आहेत. काही वर्षापूर्वी ‘टाईम’ मॅगज़िन ने निवडलेल्या जगातील सर्वोत्तम दहा रोमॅंटीक सिनेमाच्या यादीत ‘प्यासा’चा समावेश होता.
उणीपुरी बारा चौदा वर्षाची सिनेमाची कारकीर्द असलेल्या गुरूने फार मोठी कलात्मक उंची गाठली होती. त्याच्या कर्तृत्वा बाबत सत्यजित रे म्हणतात ‘गुरुदत्त यांना असलेली ‘लयी’ ची (सेन्स ऑफ र्हिदम) विलक्षण जाण आणि चित्रपटातून कॅमेर्याच्या हालचालींमध्ये दिसून येणारी सर्वांगीण सहजता (फ्ल्युएडीटी) थक्क करणारी होती. आपल्या ‘आउट लूक’ या नियत कालीकाने २००३ मध्ये एका निवड समिती द्वारा घेतलेल्या मतदानात दहा श्रेष्ठ प्रेरणादायी भारतीय चित्रपटांच्या यादीत गुरुदत्त यांच्या तीन चित्रपटांची निवड केली होती.
विशेष म्हणजे या निवडसमितीचे सर्व सदस्य स्वतः दिग्दर्शक होते. काळ जस जसा पुढे जातो आहे तसे गुरूच्या चित्रपटांचे महत्व वाढत आहे. गुरूच्या चित्र प्रतिमेची त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडलेली दाट छाया, या माध्यमाची त्याला असलेली जाण, सिनेमाच्या निर्मितीमागचा त्याचा विचार आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्याची तळमळ या सर्व बाबींचा आज पन्नास वर्षानंतर ही जगभरातले सिनेमाचे अभ्यासक त्यावर विचार करीत आहेत. मला वाटतं गुरूच्या चित्र कर्तृत्वाचे हे प्रतिक आहे.
गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ चा! मंगलोरच्या एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या गुरुचे खरे नाव होते वसंत शिवशंकर पदुकोन, पण गुरुवारी जन्माला आल्याने नाव गुरूदत्त कायम झाले. प्रसिद्ध बॅले नृत्य कलाकार उदयशंकर यांच्याशी गुरूचा लहानपणीच संपर्क झाला आणि गुरु नृत्यकलेकडे वळाला. अलमोडा इथ जावून त्याने कलेची साधना केली. उदय शंकर यांचा तो लाडका शिष्य बनला. या काळात गुरूला कलेचा अनेक अंगानी परिचय झाला. (तिथल्या ’शॅडो प्ले’ चा तर त्याच्या अंतर्मनावर एवढा प्रभाव झाला की ब्लॅक अॅंड व्हाईट सिनेमातील त्याच्या ’लाईट अॅंड शॅडो’ ची अनोखी शैली साकारता आली.
‘कागज के फुल’ पाहताना ही शैली सिनेमाची आर्टीस्टीक व्हॅल्यू उंचीवर नेताना दिसते.) पुढे प्रभात, पुणे या संस्थेत आल्यावर त्यांना सिनेमाच्या विविध बाबींचा तपशीलाने अभ्यास करता आला. इथेच गुरूला देव आनंद, रेहमान असे जिवाभावाचे मित्र मिळाले. प्रभात च्या बाबुराव पै च्या पाठोपाठ त्यांचा हा ग्रुप ही बाहेर पडला. मुंबईत आल्यावर गुरूने ज्ञान मुखर्जी, अमिया चक्रवर्ती, आदिनाथ बनर्जी यांच्याकडे सहायक दिग्दर्शनाचे धडे गिरवले.
या काळात गुरूला प्रचंड संघर्ष आणि बेकारीचा सामना करावा लागला. या भौतिक जगात सच्चा कलावंताला मोल नाही या निराशावादाने त्याला घेरले आणि त्यातूनच त्याने ‘कश्मकश’ ही कथा लिहिली. (याच कथानकाचा काही भाग पुढे त्यानी ‘प्यासा’करीता वापरला.) गुरूला स्वतंत्र रित्या दिग्दर्शनाचा पहिला ब्रेक देव आनंदने दिला ‘बाजी’ सिनेमात. १५ जून १९५१ ला प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ द्वारा देव / गुरु दोघांनीही सिनेमाची बाजी जिंकली. गुन्हेगारी सिनेमाचे हॉलीवूड स्टाईल चित्रीकरण करून गुरूने छाप पाडली.
त्यानंतर ‘जाल’ (१९५२), ‘बाज’ (१९५३) या सिनेमातून यशाची ध्वजा फडकावीत गुरूने १९५४ साली स्वतः ची गुरुदत्त फिल्म्स ची स्थापना करून ‘आरपार’ बनविला.(दरम्यान २६ मे १९५३ साली गुरुदत्त आणि गीतादत्त यांचे लग्न झाले.) ‘आरपार’ च्या ओ. पी. च्या गाण्यांनी कहर केला. त्याच्यापाठोपाठ आला मि. अॅंड मिसेस ५५, यात रूप सुंदरी मधुबाला होती. ओ पी च्या संगीताने आणि गुरूच्या साँग पिक्चरायजेशन मुळे आजही हा सिनेमा लख्ख आठवतो.
एवढे सगळे असले तरी गुरूच्या तीन मास्टरपीस सिनेमामुळेच त्याचे नाव जगातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पंक्तीत जावून बसले हे खरेच आहे. २२ फेब्रुवारी १९५७ ला प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’ ने इतिहास घडवला. ‘प्यासा’ एक रोमॅंटीक मेलोड्रामा (क्षोभ नाट्य) आहे. प्रेम आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी मानवाची असलेली नैसर्गिक जन्मजात तहान व त्याच सोबत अध्यात्मिक समाधान मिळविण्याची धडपड यात अधोरेखित करण्यात आली आहे.
‘प्यासा’ तील प्रत्येक फ्रेम कलात्मक दृष्ट्या अभिजात आहे. त्याचे दुःख, त्याची वेदना, त्याच्या आर्त भावना0! सारं मनाला खूप अंतर्मुख करणार तर आहेच पण सच्च्या भावनेनं केलेली निर्मिती ही किती अप्रतिम बनू शकते याचा सुंदर नमुना म्हणजे ‘प्यासा’! त्या वर्षी ‘टाईम’ मॅगज़िन ने निवडलेल्या जगातील सर्वोत्तम दहा रोमॅंटीक सिनेमाच्या यादीत ‘प्यासा’चा समावेश होता. या सिनेमाच्या वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी नंतर गुरूने ’कागज के फुल’ च्या निर्मितीचे आव्हान स्वीकारले.
२ ऑक्टोबर १९५९ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात गुरूने आपले सारे कसब पणाला लावले. त्यातील सिनेमाच्या तंत्रात फार मोठी प्रगती दिसली. एक तर हा भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट ठरला. छायाचित्रकार व्ही. के. मूर्ती आणि आर्ट डायरेक्टर एम आर आचरेकर या दोघांच्या करीयर बेस्ट परफोर्मंस मुळे सिनेमाच्या आशयाला मोठी उंची लाभली. (या दोघांनाही त्या वर्षीचे फिल्म फेयर पुरस्कार मिळाले). आज हा सिनेमा इतक्या वर्षानंतर आठवताना त्यातील भावनिक संघर्ष, गाणी (वक्त ने किया क्या हंसी सितम, बिछडे सभी बारी बारी), सिनेमाचा शेवट, त्यातील शोकात्म छाया मनाला आतून ओलावून जातात.
पण गुरूच्या या सार्या मेहनतीवर पाणी पडलं; सिनेमा अपयशी ठरला! गुरु सारखा संवेदनाक्षम कलावंत यामुळे पुरता खचला. पुढचा ’चौदहवी का चांद’ एम सादिक कडे आणि ’साहिब बिवी और गुलाम’ अब्रार अल्वी कडे देवून तो मोकळा झाला. अर्थात असे असले तरी गुरूची या दोनही सिनेमावरील पकड कायम जाणवते. २२ जून १९६२ रोजी साहिब बिवी और गुलाम प्रदर्शित झाला. बिमल मित्र यांच्या कादंबरीवरील या सिनेमातून मीना कुमारी प्रथमच त्यांच्या कॅंपस मध्ये आली.
तिने रंगवलेली छोटी बहु ची भूमिका तिच्या करीयर मधील माईल स्टोन ठरली. खरं तर या सिनेमानंतर गुरु नवीन सिनेमाच्या तयारीत होता (बहारे फिर भी आयेगी) पण कुटुंबातील वाढलेले ताण तणाव, व्यसनाचा वाढलेला अंमल, सिनेमासारख्या बेभरवशाच्या दुनियेत सातत्याने होणारी घुसमट, मानसिक गुंतागुंत या सर्व गोष्टींचा परिपाक १० ऑक्टोबर १९६४ ला झाला. गुरूने आपला सर्व नाश ओढवून घेतला.
आज जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या पंक्तीत बसणारी जगन्मान्य कामगिरी करणार्या या महान कलावंताला त्याच्या हयातीत सन्मानाचे फारसे क्षण लाभले नाहीत. गुरूच्या सिनेमातील गाण्यांचं चित्रण हा एक स्वतंत्र विषय आहे. त्या करीता गीत आणि संगीताच्या योगदानासोबत लयीच्या विलक्षण जाणकारीतून त्यानी निर्मिलेली स्वत:ची अशी चित्रण शैली आजही रसिकांना स्पर्शून जाते. आज ९ जुलै…. गुरुदत्त यांची ९६ वी जयंती. त्या निमित्ताने हे स्मरण!