ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?
आप की नजरोने समझा प्यार के काबील मुझे..
संगीताचा दुनियेत काही संगीतकारांच्या जोड्या प्रतिथयश नायकांसोबत जोडल्या गेल्या होत्या. जसे दिलीपकुमार करीता नौशाद अली, राज कपूर करीता शंकर जयकिशन तर देव करीता सचिनदा असं समीकरण जुळलं गेलं. ज्या संगीतकारांच्या नशीबी असा यशस्वी नायक नसायचा त्यांचा स्ट्रगल आणखी कठीण होत होता. मोठे बॅनर, यशस्वी कलाकार या संगीतकारांना फारसे कधी मिळालेच नाहीत. यातच एक नाव होतं संगीतकार मदनमोहन. त्याला बिचार्याला गुणवत्ता असूनही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सिनेमांना व्यावसायिक यश मिळालं. त्यामुळे मदन मोहनचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! पण तरीही मदनमोहनने फक्त क्वालिटी म्युझिकच दिलं. सिनेमाच्या व्यावसायिक अपयशाचा त्याच्या गुणवत्तेवर काहीच परीणाम झाला नाही.
बॉम्बे टॉकीजच्या व नंतर फिल्मिस्तानच्या राय बहादूर चुनीलाल यांचा सुपुत्र असलेला मदन मोहन सिनेमात येण्यापूर्वी लष्करात होता. पण काही वर्षातच तो सिनेमात आला. ख्यातनाम गझल गायिका बेगम अख्तर यांच्या गायकीचा त्याच्यावर पगडा होता. पुढे मदनने जे गजलांचं साम्राज्य उभं केलं त्याला ही पार्श्वभूमी होती. शास्त्रीय संगीताचा सुरेल वापर आणि अचूक वाद्यांची निवड ही त्यांची खासीयत होती. लताच्या स्वराचा अप्रतिम वापर मदनने फार सुंदर रितीने करून घेतला. ’लता अॅंड मदनमोहन वेअर ऑफकोर्स म्युझिकली मेड फॉर इच अदर’ असं राजू भारतन म्हणतो ते उगाच नाही. १९७३ साली लताने लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल मध्ये जो कार्यक्रम केला होता त्यात मदनच्या संगीतात गायलेल्या ’लग जा गले’ आणि ’खेलो ना मेरे दिल से’ या दोन गाण्यांचा समावेश केला होता. त्या वेळी तिथला म्युझिक कंडक्टर एड वेल्च या गाण्याच्या मेलडी आणि वाद्यांच्या वापराने प्रभावित झाले होते. बेगम अख्तर त्याच्या ’कदर जाने ना मेरा बालम बेदर्दी’ हे गाणे ऐकून एवढ्या खूष झाल्या की लखनौ हून त्यांनी मदनला ट्रंककॉल करून तब्बल २० मिनिटे या गाण्यावर भरभरून बोलल्या. लताच्या स्वरावर त्याची एवढी श्रध्दा होती की एकाच सिनेमातील तीन वेगवेगळ्या नायिकांना (चित्रपट: भाई भाई) लताचाच स्वर वापरला.
’देख कबीरा रोया’ या सिनेमात ‘अश्को से तेरी हमने तसवीर बनाई है, तू प्यार करे या ठुकराये, मेरी वीणा तुम बिन रोये’ या त्रयी गीताचा नवा प्रकार सुरू केला. लता, आशा, मीना आणि उषा या चार मंगेशकर भगीनींना घेवून ’जहांआरा’ या सिनेमासाठी एक कव्वाली बनवली होती पण काही कारणाने सिनेमातून वगळली गेली. याच सिनेमातील सर्व गाणी म. रफीने गावी असा निर्मात्याचा आग्रह होता पण मदनला तलतचा स्वर हवा होता. शेवटी तलतच्या आवाजातच गाणी रेकॉर्ड झाली. ‘तेरी आंख के आंसू पी जाउं, फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, मै तेरी नजर का सुरूर हूं, ऐ सनम आज ये कसम खाले’ ही तलतची अप्रतिम गाणी यात होती. असाच काहिसा प्रकार लैला मजनू (१९७५) च्या वेळी झाला होता. नायक ऋषी कपूर करीता किशोरचा स्वर निर्मात्याला हवा होता पण मदनने गाण्याच्या प्रकृतीला साजेसा रफीचा स्वर घेतला. मदनमोहन प्रयोगशील संगीतकार होता. त्यांच्या गाण्यातील इंटरल्यूड मधील म्युझिक पीसेस अतिशय सुंदर असायचे (आठवा ’हंसते जख्म’ मधील ’तुम जो मिल गये हो’). पारितोषिकांनी मात्र त्याला कायमच हुलकावणी दिली. १९६४ साली ’वो कौन थी’ साठी त्यांना फिल्म फेअरचे नॉमिनेशन मिळाले होते (पण परितोषिक ’दोस्ती’ साठी एल पी ला मिळाले!).१९७१ सालच्या ’दस्तक’ (बैंया ना धरो, माई रे मै कासे कहूं) या सिनेमा साठी मात्र त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या संगीतात उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पं. रामनाराय़ण, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरसिया या दिग्गजांनी हजेरी लावून संगीत आणखी समृध्द केले. आज १४ जुलै मदनमोहन यांचा ४५ वा स्मृती दिन, त्या निमित्ताने या महान कलावंताचे स्मरण!