मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
गोल्डीची कमाल पंचमची धमाल
गोल्डी विजय आनंदने दिग्दर्शित केलेला १९६६ चा ’तिसरी मंझिल’ हा सिनेमा भारतीय सिनेतिहासातील एक माईल स्टोन चित्रपट.आपल्या अतिशय हटके अशा संगीतशैलीने चित्रपटसंगीतामधे स्वत:चे पंचमयुग आणणार्या राहुलदेव बर्मनला हा सिनेमा मिळाला कसा याचा किस्सा मनोरंजक आहे.
या सिनेमाचा हिरो आधी देव आनंद होत. पण नासिर हुसेन सोबत वाद झाल्याने देव ने ’तिसरी मंझिल’ मधे आपण काम करणार नाही असे जाहिर केले .नासिरने याआधी शम्मी बरोबर ’तुमसा नही देखा’ केल्यामुळे त्यांची छान जोडी जमली होती. शम्मीचा पर्याय पुढे आला. शम्मीने एस.जे. चा आग्रह करायला सुरुवात केली. पंचमसारख्या नवोदित संगीतकाराबरोबर काम करायची रीस्क तो घ्यायला काही केल्या तयार होईना. याला समजावयाचे कसे असा प्रश्न गोल्डीपुढे पडला आणि हुशार गोल्डीने विचारपूर्वक एक तोडगा काढला.तो शम्मीला भेटला व म्हणाला, ’ हे बघ शम्मी, तू त्याने केलेल्या चाली ऐक, त्या जर तुला नाही आवडल्या तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण एस.जे. ना घेऊयात, मी तुला अडवणार नाही’.
आता खरी पंचमच्या सर्जनशीलतेची कसोटी होती. पंचमने हार्मोनियम पुढ्यात घेऊन त्याला एक चाल ऐकवली. रिदमची आणि संगीताची उत्तम समज असलेल्या शम्मीचे कान ती चाल ऐकून टवकारले गेले. टुणकन उडी मारून तो पुढे आला आणि ते पुन्हा ऐकायची फर्माईश केली. ती ’हटके’ चाल ऐकून तो खुळावला होता आणि ते गाणं होतं – ओ हसीना जुल्फोवाली जाने जहा…’आजा आजा’ ची जगावेगळी चाल ऐकून तर तो वेडाच झाला. एखाद्या गाण्याची चाल अशी कशी असू शकते या विचारात तो पडला होता. त्याच्या आवडत्या पहाडी धुनची फर्माईश त्याने पंचमला केली आणि पंचमने त्याला ऐकवलं – ’दिवाना मुझसा नही…’बस! अलिप्तपणे आणि काहीशा अनिच्छेने भेटीला आलेल्या शम्मीने आनंदाने पंचमला कडकडून मिठी कधी मारली ते त्याला समजले नाही.
पाश्च्यात्त्य संगीतातल्या जॅझ चा सुंदर वापर त्याने केला. ड्रम्स चे अप्रतिम सोलो पीसेस – जे ’आजा आजा’, ’ओ हसिना’, ’तुमने मुझे देखा’ मधे ऐकायला मिळतात. र्हीदम मधील नावीन्यता, ओ हसिना मधला लक्षात राहणारा ट्रॅंगलचा आवाज, याच गाण्यामधे तीन अंतर्यांसाठी शम्मीच्या हातात दिलेली सॅक्सोफोन, ट्रंपेट आणि ट्रंबोन ही तीन वेगळी वाद्ये, अंतर्याला सूर बदलणारी ’तुमने मुझे देखा’ ची अतिशय मेलोडियस आणि अनोखी चाल, गायकाच्या श्वासाची परीक्षा घेणार्या ’आजा आजा’ आणि ’देखिए साहेबो’ अशा जगावेगळ्या चाली…सिनेमा आणि पंचम दोघेही सुपर हिट ठरले.
गीत : ओ हसीना जुल्फोवाली (तिसरी मंझील)
धनंजय कुलकर्णी