दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
देवसाहेब— देवा ने झपाटले हो….
स्थळ– आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओ, पाली हिल, वांद्रे
पहिल्या मजल्यावरील देव आनंदच्या केबिनवर मी नॉक करतो, आतून आवाज येतो, कम इन…. आवाजातही खास देव आनंद शैली
मी दरवाजा लोटून आत शिरतो तो समोरच अतिशय कडक इस्रीच्या स्टाईलीश कपड्यात साक्षात देव आनंद… बोलिये… उच्चारात काय काम आहे असा सूर
त्यावर मी बम्बईया हिंदीत बोलतो, मै मराठी न्यूजपेपर नवशक्ती के लिए आपके इंटरव्हयू लेना चाहता हू… आपकी अपाॅईन्मेंट ली है… और मुझे जो टाईम दिया है, मै उसी वक्त आया हू…(देव आनंद कमालीचा वक्तशीर म्हणून ओळखला जायचा, तर मग त्याची आवड जपायला नको का?)
यावर देव आनंद त्याच्या वृत्तीनुसार म्हणाला, मै सिर्फ पाच मिनिटं दूंगा… मै बहुत ही बिझी हू…
अर्थात, फक्त पाचच मिनिटे मोकळा असणारा देव आनंद मग कितीही वेळ बोलण्यास तयारच असतो. देव आनंद असा ‘असामी ‘ होता की तो पडद्यावर असो अथवा प्रत्यक्षात असो, आपण देव आनंद आहोत हे कधीच विसरत नसे. आपण अखंड/प्रचंड/मनसोक्त/मनमुराद बोलत राहावे आणि समोरच्याने ते ऐकत रहावे हे देव आनंदला प्रचंड आवडे, त्यामुळे त्याची मुलाखत घेणे म्हणजे अधेमधे त्याला एकादा प्रश्न करुन आणखीन खुलवणे….
देव आनंदची ही पहिली भेट माझे मित्र अनिल चित्रे यांच्यामुळे झाली. ते हिंदी चित्रपटसृष्टीत काही निर्मिती संस्थांशी संबंधित होते. एकदा ते म्हणाले, ‘सच्चे का बोलबाला’ चित्रपटाच्या निमित्ताने देव आनंदची मुलाखत घेणार का? त्यांचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच मी ‘हो’ कधी म्हणालो हे समजलेच नाही. १९८९ सालची ही गोष्ट. (हिंदी चित्रपटसृष्टीतील असे चांगले संबंध अथवा मित्र खूप उपयोगी पडतात हा माझा सुखद अनुभव आहे.) आणि त्यानेच मला देवसाहेब त्यांच्या स्टाईलनुसार ‘मै सिर्फ पांच मिनिट दूंगा’ असे म्हणतील. पण ते तेवढे सिरियसली घ्यायचे नाही….
तसे तर विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ ( १९६७) मधील देव आनंदचा राजू गाईड वगळता देव आनंदला कधीच कोणी कधी सिरियसली घेतलेच नाही. त्यानेदेखिल आपली इमेज अथवा प्रतिमा ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’ अशीच केली. त्याच प्रतिमेचा प्रत्यय या पहिल्या भेटीत आला.
देव आनंदची ही ‘टुमदार’ केबिन अगदी कलरफुल. एखादा पुरस्कार, एकादा फोटो. पण टेबलावर बरीच मोठी इंग्रजी पुस्तके. एक डायरी, जोडीला पेन (तरी बरं या काळात तो स्वतःच निर्मिती आणि दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटातून भूमिका रंगवत होता. त्यामुळे ‘मेरे पास एक भी डेटस नही…. मेरी डायरी फुल्ल है’ असे म्हणू शकत नव्हता.) देव आनंद दिलखुलास बोलता बोलता तत्वज्ञान कधी सांगू लागला हे मलाही समजले नाही. त्याने कितीही बोलावे अशी माझी अपेक्षा होतीच (रविवार पुरवणीचे अख्खे पान भरायचे होते ना? आणि याक्षणी आमच्या दोघांत तिसरे कोणी नसल्याने दोघानाही मोकळीक होती.)
लहानपणापासून देव आनंदचे चित्रपट पाहत आल्याने ‘आपल्याच धुंदीत रमणारा ‘ अशी त्याची प्रतिमा मनात तयार झाली होती. कॉलेजमध्ये असताना मॅटीनी शोला देव आनंदचे नौ दो ग्यारह, हम दोनो, तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, बाझी, काला पानी, काला बाजार असे अनेक चित्रपट पाहताना त्याच्या व्यक्तीमत्वात इतरांना आकर्षण वाटेल अशा लकबी आहेत हे पटत गेलं. अनेकदा तरी त्या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा नव्हे तर ‘देव आनंद’ दिसत होता. विशेषतः नायिकेवर प्रेम करणारा आणि प्रेम गीतातील ‘देव आनंद ‘ पाहण्यासाठी थिएटरमध्ये वारंवार जाऊ लागलो. जॉनी मेरा नाम, जोशीला, प्रेम पुजारी, हरे राम हरे कृष्ण…. लिस्ट वाढली तरी ‘देव आनंद तोच’! ‘देव आनंद’ चे दुसरे काही नाव असते तर ते पटलेच नसते.
मिडियात आल्यावर मेहबूब स्टुडिओत ‘हम नौजवान ‘ ( १९८६) च्या सेटवर आम्हा काही सिनेपत्रकाराना ‘शूटिंगचा आंखो देखा हाल ‘ पहायला बोलावले तेव्हा ‘मी प्रत्यक्षात या देवाला काही फूटांवरुन’ पाहिले. (मेहबूब स्टुडिओ देव आनंदचा अतिशय आवडता स्टुडिओ…. त्याच्या निधनानंतर याच स्टुडिओत शोकसभा झाली. त्यासाठी हजर राहताना देव आनंदशी झालेली पहिली भेट प्रकर्षाने आठवत होती. तर आपल्या दिग्दर्शनातील प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर देव आनंद मिडियाला हमखास बोलवणार हे काही वर्षातच सरावाचे झाले.) …. आपले प्रश्न संपतील पण देवसाहेब बोलण्यात कंटाळणार नाहीत हे लक्षात आल्यावर ‘शेवटचा प्रश्न’ केला, आपकी पिछली फिल्म कुछ खास नहीं लगी …. तेवढ्यात देवसाहेब म्हणाले, मे हमेशा मेरी आनेवाली फिल्म के बारे मै सोचता हूँ…. जैसे ही वो फिल्म रेडी होगी तब ऐसा हा एक इंटरव्हयू करेंगे… थोडा वक्त निकाल के आ जाना
खुद्द देव आनंद म्हणतोय ‘फिर मिलेंगे’ हा बोनस होता. ऐंशीच्या दशकातील अनेक सिनेपत्रकाराना देव आनंदचा हा असाच अनुभव आला आहे. (गोष्ट छोटी वाटते, पण यालाच माणसं जोडण्याची कुशलता म्हणतात) मिडियातील अनेकांची नावे (निदान चेहरे तरी) ओळखीचे ठेवणे ही देव आनंदची विशेष खासियत होती. माणसे उगीच मोठी होत नसतात, त्यांच्या दीर्घकालीन यशात असे अनेक छोटे छोटे घटक असतातच.
मुलाखत संपल्यावर देव आनंदसोबत फोटो काढायला हवाच. त्यानेच बेल मारुन ऑफिस बॉयला बोलावले आणि फोटो काढला. त्या काळात मी एक छोटासा कॅमेरा जवळ ठेवायचो आणि मध्यमवर्गीय संकोच बाजूला ठेवून कधी कधी असा फोटो काढून घ्यायचो. देव आनंदशी गप्पा संपल्या तेव्हा आपण त्याच्या एकूणच तजेलदार/चैतन्यमय व्यक्तिमत्वाने मंत्रमुग्ध झालोय हे लक्षात आले.(अन्यथा एवढ्या मोठ्या स्टारला भेटायचे कशाला?) …. वळलो आणि दरवाजाच्या आतल्या बाजूला (म्हणजे ज्या दरवाजाकडे पाठमोरा बसलो होतो) पाहिलं तर देव आनंदच्याच दिग्दर्शनातील ‘हीरा पन्ना’तील बिकीनीमधील झीनत अमानची आठवण यावी अशी एका विदेशी ललनेची छबी दिसली. (मुलाखत पूर्ण घ्यायची तर असे आजूबाजूला/सगळीकडे पाहील्यानेच माझे ज्ञानाचे कोठार वाढले बरं का?) देव आनंदच्या दिग्दर्शनातील नायिका बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल का असत याचे उत्तर मला असे मिळाले….
दिलीप ठाकूर