‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
संगीत क्षेत्रातला ‘दादा’
कमलेश भडकमकर…. खरं तर हे नावच त्याच्या प्रतिभेची आणि कामाची ओळख करून देणार आहे. एक संगीतकार, एक संगीत संयोजक, अत्यंत कल्पक आणि सुपीक कल्पना राबवणारा एक निर्माता, एक सच्चा कलाकार आणि त्यापलीकडे जाऊन एक उत्तम माणुस म्हणून आज सगळेच जण त्याला ओळखतात पण आजही संपूर्ण संगीतविश्वामध्ये त्याची ओळख सगळ्यांचा लाडका कमलेश दादा अशीच आहे… कमलेश भडकमकर यांच्या मनसा या संस्थेला १४ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीला जवळपास २८ वर्ष होत आहेत. हाच संपूर्ण प्रवास उलगडण्याचा एक प्रयत्न.
कमलेश भडकमकर, मराठी संगीतसृष्टीमध्ये हे नाव कोणाला माहिती नसेल असा माणुस सापडणं अवघडच. गेली जवळपास २८ वर्षे हा प्रवास सुरु आहे. मात्र आजपर्यंतचा हा प्रवास रंजकही नक्कीच आहे.
लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड असल्याने आपण या क्षेत्रामध्येच काहीतरी करावं असं कमलेश भडकमकर यांना वाटत होतं. घरच्यांचाही त्यांना याबाबत पाठिंबा मिळाला. अकरावी, बारावीमध्ये असतानाच हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये वादन करून त्यांनी या प्रवासाची सुरुवात केली. झपाटा तसेच इतर काही ऑर्केस्ट्रामध्ये ते किबोर्डवादक म्हणून वाजवत असत. त्यावेळी स्वतःचा किबोर्ड नव्हता, त्यामुळे अंबरनाथला जाऊन भाड्याने तो किबोर्ड ट्रेनने आणायचा, कार्यक्रम सादर करायचा आणि पुन्हा तो किबोर्ड नेऊन द्यायचा अशी तारेवरची कसरत सुरू होती. पुढे यातील गती बघून वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेऊन त्यांना किबोर्ड घेऊन दिला. त्यामुळे या कलेचे मोल त्यांना लहानपणीच कळले होते.
एकदा त्यांचे इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक जी आर शिंदे यांना त्यांच्यातील ही आवड दिसून आली आणि त्यांनी रुपारेलमध्ये डिग्री कॉलेजसाठी जाण्याचा सल्ला दिला आणि तेथे विलास पाटणकर सरांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रुपारेलमध्ये कॉलेज डे ची तयारी सुरू होती. त्यावेळी सरांनी कमलेश भडकमकर यांना काही गाण्यांना साथ करायला सांगितली. गायला होत्या पद्मा मेनन अर्थात आत्ताच्या पद्मा सुरेश वाडकर. एका अर्थी कमलेश भडकमकर यांची ती रुपारेलमधली ऑडिशनच म्हटली पाहिजे. त्या कार्यक्रमानंतर पद्मा ताईंनी पाटणकर सरांना सांगितलं की हा मुलगा आपल्या ग्रुपमध्ये हवाच. सरांचीही तशी खात्री पटली होती. पुढे यथासांग रुपारेलमध्ये कमलेश भडकमकर यांना प्रवेश मिळाला. गंमत म्हणजे रुपारेलमध्ये येण्याआधीच कॉलेज डे मध्ये वादन करून पुढच्या वाटचालीची चुणूक कमलेश भडकमकर यांनी तिथेच दाखवली.
त्यानंतर सुरू झाला एक थक्क करणारा प्रवास. अर्थात या प्रवासात अनेक चढउतारसुद्धा आले. पण मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर कमलेश भडकमकर हे नाव आज वेगळ्या उंचीवर पोहोचू शकलं आहे. रुपारेल कॉलेजचा प्रवास सुरु झाल्यावर तीन वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून कमलेश भडकमकर यांनी कॉलेज गाजवलं. मुळात रुपारेल कॉलेज त्याकाळामध्ये सांस्कृतिक क्षेत्र गाजवणार नाव. एकांकिका स्पर्धा, नाटक, मैफली, युथ फेस्टिव्हल सगळ्यातच रुपारेलचा बोलबाला. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला याचा फायदा कमलेश भडकमकर यांना झाला. त्यावेळी सचित पाटील, दिपक राजाध्यक्ष, उमेश कामत, शर्वरी पाटणकर, आदित्य ओक, शिल्पा पै, कौशल इनामदार, मंदार गोगटे अशी मातब्बर मंडळींची एक गॅंग होती. शिवाय आजी माजी रुपारेलकरांचं मार्गदर्शनसुद्धा मिळायचं. त्यावेळी केतन दातार, आदेश बांदेकर यांचे मार्गदर्शन नाटकासाठी मिळायचे. मंथन वाद्यवृंद, कॉलेजचे वेगवेगळे कार्यक्रम यातून हा प्रवास अधिक खुलत गेला.
त्यावेळी एस. वाय. मध्ये असताना कमलेश यांनी संगीत संयोजन केलेला पहिला म्युजिक अल्बम ‘किताब ए मोहब्बत’ हा रसिकांसमोर आला. याच दरम्यान त्यावेळी कौशल इनामदार यांच्याशी कमलेश भडकमकर यांची गट्टी जमली. गझलकार, लेखक म्हणून कौशल इनामदार यांची ओळख झाली. संगीत संयोजन, हिंदी गाणी यातील अनेक बारकावे कौशल इनामदार यांच्यामुळे कळल्याचे कमलेश भडकमकर सांगतात.
या प्रवासात पाटणकर सर, कौशल भेटले नसते तर आज हा प्रवास शक्यच नसल्याचं कमलेशने सांगितलं. या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याशी झालेली ओळख आणि त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन. स्वरसाधनाद्वारे खळे काकांच्या गाण्यांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रमाला साक्षात खळे काका हजर झाले. सर्व वादकांनी, संगीत संयोजन करत असलेल्या कमलेश भडकमकर यांनी कसाबसा तो कार्यक्रम निभावून नेला. खळे काकांसमोर कार्यक्रम सादर करण्याचे दडपण सगळ्याच कलाकारांवर होते.
कार्यक्रम झाल्यावर पाटणकर सरांनी खळे काकांना यांना काहीतरी शिकवाल का असं सुचवलं. त्यावेळी खळे काकांनी सांगितलं, “मी काही शिकवण्या वगैरे घेत नाही. पण जर हे सगळे कलाकार माझ्याकडे येणार असतील आणि त्यांना जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी येऊ दे.”
यानंतर पुढे १५ वर्ष कमलेश भडकमकर यांना अगदी जवळून श्रीनिवास खळे यांचा सहवास लाभला. खूप जवळून खळे काकांचे काम त्यांना बघायला मिळाले. एवढंच नाही तर मोठे गायक, वादक यांना जवळून अभ्यासता आलं. त्याचबरोबर संयोजन करायला मिळालं. माधव पवार, उल्हास बापट आणि अनेक दिग्गज कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. आज मनसा संस्थेला १४ वर्षे होत असताना, श्रीनिवास खळे यांची ३० अनवट गाणी लोकांसमोर येत आहेत. अशी जवळपास कधीही लोकांसमोर न आलेली आणि उत्तम संयोजन केलेली २२५ गाणी कमलेश भडकमकर यांनी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.
रुपारेल महाविद्यालयातील हा प्रवास चालू असतानाच अमृताचा वसा हा नवीन गाण्यांचा कार्यक्रम एक वेगळा मार्ग घेऊन कमलेश भडकमकर यांच्यासमोर आला. नवीन कविता, गाणी, पूर्णपणे वेगळा संच आणि त्याचं संगीत संयोजन ही खरं जबाबदारी होती पण हे आव्हान यशस्वीरित्या स्वीकारलं. आणि अंतिम वर्षाच्या निकालाच्या दिवशीच संगीत संयोजक म्हणून हा प्रवास सुरु झाला. पुढे या कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी प्रयोग झाले. त्यातूनच दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुलुंडचे महाराष्ट्र सेवा संघ अशा अनेक संस्थांशी हे ऋणानुबंध जोडले गेले.
रुपारेलमधून बाहेर पडल्यावरसुद्धा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रुपारेलमध्ये जाणं येणं असायचं. त्यावेळी एकदा आदेश बांदेकर यांनी एका नवीन प्रोजेक्टसाठी काम करशील का असा प्रश्न विचारला, त्यावेळी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर आदेश बांदेकर यांच्यासोबत कमलेश भडकमकर यांनी दूरदर्शन गाठले. तेथे नीना राऊत यांच्यासमोर त्यांनी टायटल सॉंग करशील का असं विचारलं आणि ताक धिना धिन या संपूर्ण नव्या कार्यक्रमाशी कमलेश भडकमकर जोडले गेले. पुढे जवळपास ५ – ६ वर्ष हा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी १९९६ च्या आसपास १५० रुपये – ३०० रुपये नाईट अशा पद्धतीने कलाकारांना मानधन मिळायचे. त्यातही सर्व कलाकारांना सारखेच मानधन असायचे. आज हा आकडा आपण केवळ ऐकल्यावरसुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल.
एकीकडे ताक धिना धिन सुरू असताना किबोर्डवादक, संगीत संयोजक म्हणून वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम कमलेश यांनी सादर केले. त्यावेळी रविंद्र साठे, आप्पा वढावकर आणि त्यावेळच्या वेगवेगळ्या ज्येष्ठ कलाकारांशी ओळखी वाढायला लागल्या. आज जवळपास १५० – २०० कलाकारांशी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कमलेश भडकमकर जोडलेले आहेत. मोठ्या संचासह वादकांचे संयोजनही नियमितपणे ते करतात. तुमची वागणूक आणि सादरीकरण चांगलं असेल तर कलाकार आपोआपच तुमच्याशी जोडले जातात असं ते सांगतात.
या प्रवासात अल्फा गौरवचे टायटल सॉंग, झी न्यूजचा चॅनल आयडी, मटा सन्मान टायटल सॉंग अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा भाग त्यांना होता आलं. या सगळ्याच कामात त्यांनी स्वतःची छाप सोडल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत हे काम पोचले. याच दरम्यान अल्फा मराठीवर नक्षत्रांचे देणे ही मालिका सुरू करण्याचा निर्णय झाला होता आणि त्यातून श्रीनिवास खळे, शांता शेळके, मंगेश पाडगावकर यांच्यावरील भागासाठी वाद्यवृंदाचा भाग होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी त्यातील संगीत संयोजन, क्यू शीट याचे बारकावे त्यांनी हेरले आणि अनेक गोष्टी शिकून घेतल्या.पुढे एका शूट दरम्यान राजन डांगे यांच्याशी ओळख झाली. डांगे त्यावेळी तांत्रिक बाजू हाताळत होते. त्यांनी संयोजन उत्तम होत असल्याची पावती तर दिलीच पण पुढे जाऊन सारेगमप सुरू होणार होत त्यावेळी झी मराठीसाठी कमलेश भडकमकर यांनी संगीत संयोजन करावे असंही सुचवलं.
सारेगमपशी जोडले जात असतानाचाही असाच रंजक किस्सा आहे. खरं तर संगीत संयोजक असूनही वादक म्हणून कमलेश भडकमकर या कार्यक्रमाचा स्टेजवर भाग असणार नाहीत अशी अट चॅनलकडून घालण्यात आली होती. त्यामुळे ही अट न पटल्याने पहिली मिटिंग फिस्कटली होती. मात्र त्यावेळी रुपेश राऊत आणि राजन डांगे यांनी त्या कार्यक्रमाचं महत्त्व, त्यातील फायदे कमलेश यांना पटवून दिले. आणि पुढे सारेगमपच्या माध्यमातून इतिहास घडला.
मात्र आता जर रंगमंचावर तुम्ही नसाल तर निवड कोणाची करायची हा प्रश्न होता, तुमच्या टीममध्ये तुमच्यापेक्षा चांगली माणसं हवीत या विचाराने सत्यजित प्रभू यांच्याशी ओळख जोडली गेली, बासरी वादक अमर ओक, गिटारवादक मनिष कुलकर्णी, ताकधिनाधिन पासून जोडला गेलेला ढोलकीवादक निलेश परब, तबलावादक आर्चिस लेले असा संच तयार होत गेला. पुढे पुढे एपिसोडनुसार व्हायोलिन, गिटार आणि इतर वाद्य यामध्ये जोडले गेले. अलीकडेच झी गौरवसाठी यातील ५१ वादकांच्या संपूर्ण संचाने वादन सादर केले. याची संकल्पना आणि संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते. चॅनलमध्ये काम करत असताना काय लागत, संयोजनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, चॅनल आणि कलाकार यांच्यातील दुवा होण्यासाठी काय आवश्यक असत असे अनेक पैलू सारेगमपने शिकवल्याचे कमलेश भडकमकर सांगतात.
या संपूर्ण २८ वर्षांच्या प्रवासात मनसा या संस्थेची निर्मिती २००६ मध्ये झाली. वेगवेगळ्या चित्रपट आणि इतर माध्यमांवर काम करत असताना नवीन गाणी पोचत नसल्याचे कमलेश भडकमकर यांच्या लक्षात आले. चित्रपटातील गाणी पोचत असली तरीही नॉन फिल्म म्युजिकला व्यासपीठ मिळत नव्हते. हे व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने त्यांनी मनसा या संस्थेची स्थापना केली. २००६ मध्ये मनसाच्या माध्यमातून ६ चित्रपटातील गाण्यांचा संच एकत्रित रिलीज करण्यात आला. नवीन गाणी टिकावित यासाठी फक्त नवीन गाण्यांवर कार्यक्रम त्यावेळी सादर करण्यात आला. आणि अशी अनेक गाणी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मनसाच्या माध्यमातून नवीन आणि ओरिजिनल गाण्यांसाठी अनेक नवीन सीडीज प्रोड्युस करण्यात आल्या आहेत. शिवाय ८० इतर सीडीजचे मार्केटिंगसुद्धा मनसाच्या माध्यमातून करण्यात आले.
२००८ पासून सुरू झालेलं संगीतकार संमेलन ही अशीच अभिनव कल्पना. संगीतकारांना व्यासपीठ देणारी ही संकल्पना मिथिलेश पाटणकर यांची, त्याला मनसाच्या माध्यमातून कल्पक रूप देण्यात आलं. पुढे दादर माटुंगा कल्चरल सेंटरद्वारे सुरेश खरे, अशोक केळकर यांनी ही संकल्पना उचलून धरली. आणि वेगवेगळ्या शहरामध्ये संगीतकार संमेलन भरवले जाऊ लागले. २०१२ मध्ये याचप्रमाणे तुम्ही तुमची गाणी पोहचवा या उपक्रमाअंतर्गत २०० कलाकारांच्या मदतीने ३०० नवीन गाणी तयार झाली. त्यातून अनेक नवीन कलाकार, वादक लोकांसमोर आणि इंडस्ट्रीसमोर आले. त्याचबरोबर ३०० संगीतकार आणि असंख्य कलाकार एकमेकांशी जोडले गेले. असे अनेक अभिनव प्रयोग मनसाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
तरुण कलाकारांकडून अनवट आणि वेगळ्या धाटणीची गाणी तयारी करून घेण्यासाठी आणि चांगले गायन घडविण्याच्या प्रयत्नातून मनसा युथ फोरमची स्थापना झाली आहे. यातून जवळपास १८ – २० गायकांकडून गाण्यांची उत्तम तयारी करून घेतली जात आहे, त्याचबरोबर चांगली गाणी लोकांसमोर विविध संकल्पनांच्या माध्यमातून मांडली जात आहेत. हासुद्धा एक अभिनव प्रयोगच म्हटला पाहिजे.
बासरी, व्हायोलिन, तबला, किबोर्ड यांच्या माध्यमातून उलगडणारी म्युसिंक ही संकल्पना असेल किंवा संगीताचा प्रवास भव्य वादकांच्या संचासह उलगडणारी सप्तशतक ही संकल्पना अशा हजारो संकल्पना आजपर्यंत कमलेश भडकमकर यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. मात्र हे सगळं करत असताना भविष्यात आणखी मोठी झेप घेण्याची त्यांची इच्छा आहे. अनेक वेगवेगळे प्रकल्प त्यांच्या मनामध्ये आजही तयार आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करत असताना आज आई वडिल आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर येणारा प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असून प्रत्येक संधी ही आपल्यासाठी नवीन संधी असल्याचे ते सांगतात. या प्रवासात भेटलेल्या आणि संपूर्ण प्रवासाचा भाग असलेल्या कलाकारांचे आभार मानायला ते विसरत नाहीत हे विशेष. नवीन कलाकारांनी एका ध्यासाने प्रवास केला पाहिजे आणि मेहनत घेऊन यशस्वी झाले पाहिजे असा सल्ला ते देतात. त्याचबरोबर आजच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक चांगले कलाकार आहेत ज्यांना परफेक्ट कसं काम करायचं हे आज माहिती आहे त्यामुळे रोज अशा वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायला मजा येत असल्याचं ते सांगतात.
आज जगभरात कमलेश भडकमकर या नावाला एक ब्रँड समजले जाते. चॅनल, लाईव्ह शोज, रेकॉर्डिंग अशा सर्व माध्यमांमध्ये एक निर्माता, संगीत संयोजक, आयोजक, वाद्यवृंद संयोजक आणि वादक म्हणून त्यांचा प्रवास सुरु आहे. मात्र असं असतानाही एक कलाकार आणि एक उत्तम माणूस म्हणून त्यांनी स्वतःला जपलंय…..
या बहुढंगी कलाकाराला कलाकृती परिवाराचे अभिवादन!
आदित्य बिवलकर