मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
नृत्यकलेची मनो’भावे’ सेवा
आजच्या घडीला आपण एक अभिनेत्री, एक निवेदिका म्हणून पूर्वी भावे हे नाव ऐकलेलं आहे. पण त्यापलीकडे जाऊन एक उत्तम भरतनाट्यम डान्सर हीसुद्धा पूर्वीची ओळख आहे. आज अभिजात भरतनाट्यम नृत्य तिच्या स्वतःच्या शैलीमध्ये सादर करण्यासाठी ती ओळखली जाते. अधिकाधिक लोकांपर्यंत भरतनाट्यम नृत्य पोहोचावे यासाठी तिचा प्रयत्न आहे. पूर्वी भावे हिच्या या प्रवासाचा जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने घेतलेला मागोवा
शाळेमध्ये असल्यापासून पूर्वीला नृत्याची आवड होती. त्यातच घरामध्ये संगीताचे वातावरण आणि अभिजात कलांचा वारसा होता. पूर्वीची आई सुप्रसिद्ध संगीत मार्गदर्शक आणि शास्त्रीय संगीत गायिका वर्षा भावे. त्यामुळे लहानपणापासूनच कलेचे संस्कार तिच्यावर नकळत होत होते. शाळेत असतानाच आईने पूर्वीला गाणं शिकायचंय कि नृत्य असा पर्याय विचारला होता. त्यावेळीच तिने नृत्य शिकायचं असं मनाशी तिने ठरवलं होत. शाळेतच वयाच्या सातव्या वर्षी डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली.
संध्या पुरेचा यांची ओळख कडक शिस्तीसाठी नेहमीच सांगितली जाते. त्यांच्या तालमीमध्ये पूर्वीने भरतनाट्यमचे धडे गिरवले. संध्या पुरेचा यांचा नाट्यशास्त्रावरील अभ्यास दाणगा आहे. संध्या पुरेचा यांचा भरतनाट्यममधील ग्रंथ, त्यातील बारकावे यांवर अभ्यास प्रचंड आहे. त्यामुळे केवळ नृत्याचेच नाही तर त्यातील संकल्पना, थिअरी याचेही धडे तिला मिळाले. ज्याचा फायदा पाया अधिक पक्का होण्यासाठी झाला. या मेहनतीमुळे संध्या पुरेचा यांच्या संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान तिने संपादन केला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सीसीआरटीची शिष्यवृत्ती नृत्यासाठी तिला प्राप्त झाला.
पुढे महाविद्यालयात असताना तिने भरतनाटयममध्ये अरंगेत्रम पूर्ण केले. मेघदूत हा विषय घेऊन सादरीकरण तिने सादर केले होते. यावेळी जेष्ठ नर्तक आणि संध्या पुरेचा यांचे गुरू पार्वतीकुमार आले होते. त्यांनी सादरीकरण बघून पूर्वीचे कौतुक तर केलेच. त्याशिवाय तिचा ताल अत्यंत चांगला असून पक्का असल्याची दाद तिला दिली. पूर्वीचा संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रवास सुरु आहे. तिला सांस्कृतिक विभाग भारत सरकारची शिष्यवृत्तीसुद्धा प्राप्त झाली आहे. याचबरोबर तिच्या नृत्यातील योगदानासाठी तिला सिगारमणी गिरनार रत्न, पंडित गोपीकृष्ण पुरस्कार आदि मानाचे पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहेत. तिने भरतनाट्यममध्ये एम ए पदवी संपादन केली आहे.
एक व्यावसायिक नृत्यांगना असण्याबरोबरच तिला शिकवण्याचा अनुभव हवा होता. यातूनच छोट्या स्तरावर सुरुवात केल्यानंतर आता हाऊस ऑफ नृत्य या संस्थेचा जन्म गेल्या वर्षी झाला. आत्ता पवई आणि शिवाजी पार्क येथे ती नृत्याचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे.
एक निवेदिका म्हणून विविध कार्यक्रमांचे निवेदन वेगळ्या शैलीत करण्यासाठी पूर्वीची ओळख आहे. मात्र आता ती नृत्यांगना म्हणूनही जाणकार आणि रसिकांसमोर येत आहे. पारंपारिक भरतनाट्यम करण्याची आवड असली तरीही त्याच्या जोडीला वेगळ्या संकल्पनांवर आधारित वेस्टर्न नृत्य, लोकनृत्य सादर करायला पूर्वीला आवडतं. मात्र हे करताना त्याची गुणवत्ता आणि दर्जा याकडे आवर्जून ती लक्ष देते हे विशेष. याचबरोबर भरतनाट्यमचे सोलो सादरीकरण ती अनेक ठिकाणी करत आहे.
युट्युब सिरीजच्या माध्यमातून ती रसिकांसमोर वेगळ्या पद्धतीने भरतनाट्यम सादर करत आहे. पूर्वी ही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती असल्याने मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केलं होतं. पूर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे या मालिकेला मानवंदना दिली होती. शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलंसं वाटावं, हा विचार करून तिने त्यावेळी कंटेम्पररी क्लासिक डान्स मालिका आणली होती. त्यामागील कारणही ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं टायटल साँग निवड्यामागे होतं. युद्ध, पक्षी आणि प्राणी दाखवण्यासाठी खुप छान मुद्रा शास्त्रीय नृत्यात आहेत. ज्याचा वापर तिने भरतनाट्यम या नृत्यशैलीत केला. त्यामुळे तिला या नृत्यशैलीतून ड्रॅगन, व्हाईट वॉकर्स यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडता आल्या होत्या. पूर्वीने हा अनोखा नृत्याविष्कार तेव्हा बांद्रा फोर्टमध्ये सादर केला होता. अशाप्रकारे आपल्या अभिनय आणि नृत्यकलेच्या साथीने पूर्वी भावे नेहमीच काहीतरी वेगळं करून तिच्या चाहत्यांना नृत्याची अनोखी मेजवानी देत असते.
याचप्रमाणे भज गणपती आणि धागा प्रेम का ही गाणीही तिने नृत्यातून मांडली आहेत. ‘धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास ह्यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. ‘प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते’. अशा आशयाचे हे गाणे आहे. गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. गाण्याला पूर्वी भावेची आई आणि शास्त्रीय सुप्रसिध्द गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.
निवेदन आणि अभिनयाचा फायदा नृत्याला होत असल्याचे पूर्वी भावे सांगते. इतर माध्यमांच्या निमित्ताने तुमची ओळख, संपर्क वाढतो, त्यामुळे एक कलाकार म्हणून याचा फायदा नक्कीच होत असल्याचे पूर्वीने सांगितले. अभिनयाचा त्याचबरोबर निवेदनाचा वापर नृत्याची पार्श्वभूमी मांडण्यासाठी होतो असंही तिने सांगितलं. एकंदरच तिन्ही कला या परस्पर पूरक असल्याचे ती म्हणाली.
येत्या काळात वेगवेगळे प्रयोग भरतनाट्यम मध्ये करताना लहान मुलांना घेऊन एक प्रोडक्शन करण्याची पूर्वीची इच्छा आहे त्याचबरोबर ब्रॉडवे स्टाईल एखादी निर्मितीसुद्धा तिला करण्याची इच्छा असल्याचे ती सांगते.
सध्या लॉक डाऊन असल्याने क्लासेस बंद करण्याची वेळ आली आहे तरीही ऑनलाइन माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना ती सध्या मार्गदर्शन करत असल्याचे सांगते. मुंबई बाहेरचे अनेक लोक त्याचबरोबर घरी असणाऱ्या महिला यांनाही भविष्यात या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न असल्याचे पूर्वीने बोलताना सांगितले.
काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेऊन पूर्वीचा प्रवास सुरु आहे. या संपूर्ण प्रवासासाठी आणि तिच्या नृत्याच्या भावी वाटचालीसाठी तिला कलाकृती परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा !
– आदित्य बिवलकर