‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सावळाच रंग तुझा…
१६ मे १९२६ चा त्यांचा जन्म दिवस. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखत ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, “तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती? “लग्नाला खूप वर्षे झाली होती. माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहून पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फूर्तपणे मोठ्यानं म्हणाले, “अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट ठेवुस रे बाबा!” असाच एक जुना किस्सा माणिक वर्मांची मुलगी अभिनेत्री भारती आचरेकर यांच्याकडून ऐकलेला. लेखक व गीतकार अमर वर्मा यांच्याशी माणिकचे लग्न ठरले असे कळाल्यावर पु ल म्हणाले ’अरे हिने तर ’वर्मा’वरच घाव घातला.!’
माणिक वर्मा यांच्या पहिल्या व अत्यंत गाजलेल्या ’सावळाच रंग तुझा’ या गाण्याचा एक किस्सा मशहूर आहे. गदीमांच्या या गीताला स्वरबध्द सुधीर फडके यांनी केलं होतं. सुधीर फडके माणिक ताईं कडून दोन महिने कसून मेहनत घेत होते. बाबू्जींचा शब्दोच्चारावर खूप भर असे. त्यांच पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते ध्वनीमुद्रणाची परवानगी देत नसे. गाणं पुरतं बसल्यावर ते एच एम व्ही त रेकॉर्डींगला गेले. गाणं रेकॉर्ड होत असताना तिथल्या रेकॉर्डीस्टला का कोण जाणे माणिक ताईंचा आवाज थोडा लो पीच चा वाटला. गाणं मध्यावर आलं असताना तो म्हणाला ’नाही नाही, हे गाणं रेकॉर्ड नाही होवू शकत! गाणं आणखी हाय पीचचे हवे.’ सुधीर फडके म्हणाले ’अहो असं कसं म्हणता तुम्ही. मी स्वत: त्यांची मागची दोन महिने रिहर्सल घेतोय. ती बरोबर गातेय व गाण्याच्या स्वभाव धर्मानुसार हा पीच योग्य आहे.’ तो रेकॉर्डीस्ट काही ऐकायल तयार होईना. माणिक ताई तर रडकुंडीला आल्या. शेवटी फडक्यांनी तोडगा काढला ते म्हणाले’ आपण गाणं तर रेकॉर्ड करू. जर खराब वाटले तर बाद करू.’ मग कुठे गाण्याचं ध्वनी मुद्रण झालं. एच एम व्ही च्या वरीष्ठांना गाणं योग्य वाटलं. रेकॉर्ड बाजारात आली आणि घराघरात पोचली. कुठेही जा सर्वत्र ’सावळाच रंग तुझा’ ऐकू येत होतं! काळी रेकॉर्ड अक्षरश: पांढरी होइपर्यंत रसिकांनी ऐकली! पुलं विनोदाने म्हणाले ’माणे तुझी रेकॉर्ड इतक्यांदा ऐकून ऐकून घासली गेली कि त्यातून आता मागचं गाणं ऐकायला येतयं!!’
शुध्द शास्त्रीय संगीत असो, भावगीत असो, नाट्यगीत असो वा भक्ती गीत असो माणिक वर्मांचा स्वर सर्वत्र बाजी मारून जात असे. मराठी मनाला साद घालणारी घननीळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा, निघाले आज तिकडच्या घरी, विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, कौसल्येचा राम बाई, अनंता अंत नको पाहू या गीतांनी मराठी रसिक भाव चिंब झाले. आज त्यांचा जन्मदिनी त्यांच्या गीतांची आठवण जोजवूयात. १० नोव्हेंबर १९९६ ला दिवाळीच्या दिवशी माणिक वर्मा यांचे निधन झाले.